घाणेकरांनी गाजवलेला "लाल्या' 28 वर्षे केला - रमेश भाटकर

मकरंद पटवर्धन
गुरुवार, 18 जानेवारी 2018

पंतांनी माझी निवड केली आणि 28 वर्षे "लाल्या' केला. लाल्याचे नाटकातील वय 19 होते पण मी पन्नाशीपर्यंत नाटक करत होतो, अशा शब्दांत सुप्रसिद्ध अभिनेते रमेश भाटकर यांनी आपला कलाप्रवास उलगडला. 

रत्नागिरी - अश्रूंची झाली फुले, इथे ओशळला मृत्यू आदी नाटके काही काळ बंद होती. "अश्रूंची'मधील "लाल्या' काशिनाथ घाणेकरांना गाजवला. त्यांच्या जागेवर नवा कोण असा प्रश्‍न पणशीकरांसमोर होता. समीक्षक पंडित मांडके यांनी माझे नाव सुचवले. पंतांनी माझी निवड केली आणि 28 वर्षे "लाल्या' केला. लाल्याचे नाटकातील वय 19 होते पण मी पन्नाशीपर्यंत नाटक करत होतो, अशा शब्दांत सुप्रसिद्ध अभिनेते रमेश भाटकर यांनी आपला कलाप्रवास उलगडला. 

अ. भा. नाट्य परिषद रत्नागिरी शाखा व पालिकेतर्फे आयोजित एकांकिका स्पर्धेवेळी भाटकर यांनी कलाकारांना मार्गदर्शन केले. 
भाटकर म्हणाले की, एकांकिकेतून कलाकार घडतात, संस्कार होतात. पुण्यात सुहास वाळुंजकर या मित्राने माझ्या मागे लागून लागून नाटक, एकांकिकेत काम करायचा आग्रह केला आणि नाटक करू लागलो. औद्योगिक नाट्य स्पर्धेत पहिले बक्षीस मिळाले. मग उत्साह वाढला. कलोपासक संस्थेतून कालाय तस्मै नमः केले. बक्षीस मिळाले नाही पण नटवर्य शंकर घाणेकर यांनी माझ्या वडिलांकडे माझे खूप कौतुक केले.'' 

एकांकिकेत काम करून पाया भक्कम होतो. बक्षीस मिळाले नाही म्हणून नाराज होऊ नका बक्षीसासाठी प्रयत्न करा, प्रगती करा, मोहन जोशी, रवींद्र मंकणी असे अनेक कलाकार अशा स्पर्धेतूनच घडले. या क्षेत्रात करिअर नाही केले, तरी व्यक्तिमत्त्व विकास होतो. टीम वर्क, चालण्याबोलण्याचे तंत्रही कळते. टेल्कोमध्ये नोकरीत असताना "दिवा जळू दे..' या नाटकात माझ्यासोबत रोहिणी हट्टंगडी होती. त्या वेळी मला सेटवर चालण्याचे तंत्र तिने शिकवले. माझा आवाजही त्या वेळी वेगळा होता. बाळ मोघे, विकास पंडित मला म्हणायचे कसा बोलतोस तू. पण एकांकिका, नाटकामुळे आवाज भारदस्त झाला. सतीश दुभाषी यांच्याकडून संवादफेक अशा अनेक गोष्टी सहकलाकारांकडून शिकलो, असेही भाटकर यांनी सांगितले. 

एकांकिकेला पालिकेचा "राजाश्रय' 

एकांकिका स्पर्धेला रत्नागिरी पालिकेने राजाश्रय दिला आहे. याबद्दल भाटकर यांनी राहुल पंडित यांचे विशेष कौतुक केले. परीक्षक आनंद म्हसवेकर यांनी सांगितले की, 1996 मध्ये रत्नागिरी पालिकेचा पहिला नगराध्यक्ष एकांकिका चषक आम्ही जिंकला. 11 हजार रुपयांचे बक्षीस होते. त्या वेळच्या नगराध्यक्षांनी आम्हाला रात्री 12.30 वाजता नेऊन फणसाचे गरे दिले होते. तेव्हा पुलंचे शब्द आठवले कोकणी माणूस बाहेरून काटेरी व आतून गोड. तेव्हापासून रत्नागिरीशी नाळ जुळली. 22 वर्षांपूर्वी स्पर्धक होतो आज परीक्षक आहे. 
 

Web Title: Ratnagiri New Ramesh Bhatkar comment