चांगल्या कथानकाला संगीताची उत्तम जोड... Raundal Movie Review | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Raundal Movie Review

Raundal Movie Review: चांगल्या कथानकाला संगीताची उत्तम जोड...

मराठी चित्रपटसृष्टीत वेगवेगळ्या विषयांवरचे चित्रपट बनत असतात. त्यातील काही विषय असे असतात की ते मनाला चांगलेच भिडतात. प्रेक्षक अशा विषयांवरील चित्रपटांचे चांगले स्वागत करतात.

रौंदळ हा मराठी चित्रपट त्याच पठडीत बसणारा आहे. शेतकऱ्यांच्या पिकाला मिळणारा कमी भाव, त्यातच ठेकेदारांचा मनमानी कारभार, त्यांना असलेला राजकीय आश्रय. त्यामुळे शेतकरी कमालीचा हवालदिल होतो. अपार कष्ट आणि मेहनत घेऊनदेखील त्याच्या वाट्याला दुःख आणि गरिबीच येते. मग अशा वेळी एखादा रांगडा तरुण त्याविरोधात आवाज उठवितो. रौंदळ हा मराठी चित्रपट याच कथानकाभोवती फिरणारा आहे. या चांगल्या कथानकाला कलाकारांच्या अभिनयाची उत्तम साथ लाभली आहे. त्याचबरोबर चित्रपटाचे कर्णमधुर संगीत, पार्श्वसंगीत, सुंदर सुंदर लोकेशन्स अशा सगळ्याच बाबी या चित्रपटामध्ये छान जुळलेल्या आहेत.

भूमिका फिल्म्स अ‍ॅण्ड एंटरटेन्मेंट या निर्मिती संस्थेअंतर्गत बाळासाहेब शिंदे, डॉ. पुरुषोत्तम भापकर, प्रमोद चौधरी, भाऊ शिंदे आणि राईज बिझनेस ग्रुप यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. गजानन नाना पडोळ यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची बाजू सांभाळली आहे.

शिवा जाधव (भाऊसाहेब शिंदे) हा आपले आई-वडील आणि आजोबांसह राहात असतो. शेती हेच त्यांच्या उत्पन्नाचे साधन असते. शिवाला सैन्यामध्ये भरती व्हायचे असते. त्याकरिता तो प्रयत्नदेखील करतो. परंतु त्यामध्ये त्याला अपयश येते. त्यामुळे तो हताश आणि निराश होतो. त्याच वेळी त्याचे आजोबा (संजय लकडे) त्याला एक कानमंत्र देतात. शेती करूनही देशसेवा होऊ शकते असे ते त्याला सांगतात. त्यामुळे त्याच्यामध्ये नव्याने उर्जा निर्माण होते आणि तो शेतीकडे वळतो. त्यानंतर शेतकऱ्यांच्या मालाला मिळणारा कमी भाव, ठेकेदारांचा चाललेला मनमानी कारभार, त्यांना असलेला राजकीय पाठिंबा आणि त्यामध्ये शेतकऱ्यांची होणारी ससेहोलपट तो पाहतो.

साहजिकच तो त्याविरोधात रुद्रावतार धारण करतो आणि त्यानंतर कशा आणि कोणत्या घडामोडी घडतात हे प्रत्यक्ष पडद्यावर पाहिलेले बरे. दिग्दर्शक गजानन नाना पडोळ यांनी शेतकऱ्यांवर होणारा अन्याय, या अन्यायाला वाचा फोडणारा नायक, त्यातच नायक आणि नायिकेची फुलणारी प्रेमकहाणी, ठेकेदार-कारखानदार यांची दादागिरी.

त्याच्या विरोधात नायकाचा चाललेला संघर्ष वगैरे बाबी या चित्रपटात छान पद्धतीने रेखाटल्या आहेत. ख्वाडा आणि बबन या चित्रपटानंतर भाऊसाहेब शिंदे यांनी या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. शिवा या रांगड्या तरुणाच्या भूमिकेचे बेअरिंग भाऊसाहेब शिंदे यांनी छान पकडले आहे. शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाची चीड आणि राग असे विविध भाव त्यांनी पडद्यावर छान रेखाटले आहेत.

त्याचबरोबर नेहा सोनावणे या नवोदित नायिकेची कामगिरीदेखील उत्तम झाली आहे. त्याचबरोबर संजय लकडे, यशराज डिंबाळे, सुरेखा डिंबाळे, शिवराज वाळवेकर, गणेश देशमुख, सागर लोखंडे आदी कलाकारांनी आपापली भूमिका चोख बजावली आहे. आजोबांच्या भूमिकेतील संजय लकडे कमालीचे भाव खाऊन गेले आहेत.

राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या महावीर साबन्नावरनं सिंक साऊंड आणि डिझाईनचे काम उत्तम केले आहे. संगीत आणि लोकेशन्स हीदेखील या चित्रपटाची जमेची बाजू आहे. संगीतकार आणि गायक हर्षित अभिराजचे यासाठी कौतुक करावे लागेल. सुरेख आणि सुंदर अशा चाली आणि संगीत त्याने दिले आहे. भलरी... हे लोकगीत आणि मन बहरलं व ढगानं आभाळ ही गाणी सुंदर आहेतच त्याचबरोबर ती छान चित्रित करण्यात आली आहेत.

अनिकेत खंडागळे यांच्या कॅमेऱ्याची कामगिरीही दमदार झाली आहे. चित्रपटाचा क्लायमॅक्स सिक्वेल येईल असे सुचित करणारा आहे. चित्रपटाची लांबी ही काहीशी खटकणारी बाब आहे. चित्रपटातील रोमान्सची दृश्ये काही कमी करता आली असती असे वाटते. तसेच चित्रपटाची सुरुवात संथ झाली आहे. मात्र चांगल्या कथानकाला उत्तम संगीताची जोड मिळाल्यामुळे चित्रपट छान जमलेला आहे.