
Renuka Shahane: 'हम आप के है कौन' नंतर अडचणीत सापडलं होतं रेणूका शहाणेचं करिअर..अनेक वर्षांनी केला खुलासा
Renuka Shahane: 90 च्या दशकात छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत ज्या सिनेमानं वेड लावलं होतं त्या 'हम आपके है कौन' मध्ये सलमान खान आणि रेणुका शहाणे ही वहिनी आणि दीराची जोडी भरपूर गाजली होती. सिनेमात दाखवलेलं या दोघांचे बॉन्डिंग पाहून घराघरातील वहिनी आणि दीर असं वागण्याचा किमान प्रयत्न करताना दिसू लागले होते.
आज हाच सिनेमा जेव्हा टी.व्ही वर दाखवला जातो तेव्हा तितक्याच उत्सुकतेनं कालच्या अन् आजच्या पिढीतील प्रेक्षकवर्ग तो पाहतो. आता काही दिवसांपूर्वीच रेणुका शहाणे यांनी सिनेमाशी संबंधित एक किस्सा शेअर केला आहे. जो ऐकून भले-भले हैराण झालेले दिसून आले.
रेणुका शहाणे म्हणाल्या की, ''जेव्हा राजकुमार बडजात्यानं(सूरज बडजात्यांचे वडील) त्यांना या सिनेमासाठी साइन केलं होतं त्याआधी त्यांना इशारा वजा सूचना केली होती. ते म्हणाले होते की हिंदी सिनेमातील हिरोईन म्हणून करिअर करायचं स्वप्न असेल तर ते आताच विसरुन जा...''
''कारण या सिनेमानंतर तू कधी हिरोईन म्हणून पडद्यावर येणार नाहीस. तू कायम एक सहाय्यक अभिनेत्री म्हणूनच रुपेरी पडद्यावर दिसशील. आणि पहा..जे राजकुमार बडजात्या बोलले ते खरंही झालं''.(Renuka Shahane Hum aapke hain kaun actress revealed rajkumar barjatya warned her about her career)
एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत रेणुका शहाणे म्हणाली,''सूरज बडजात्या यांचे वडील राजकुमार बडजात्या यांनी 'हम आप के है कौन' मधील ती भूमिका स्विकारायच्या आधी सांगितलं होतं की तू या इंडस्ट्रीत कायम सेकंड लीड म्हणून काम करशील''.
''म्हणजे कोणाची बहिण किंवा कोणाची पत्नी अशा भूमिका तुला ऑफर होतील. त्यामुळे हिंदी फिल्म इंडस्ट्रीत हिरोईन बनायचं स्वप्न घेऊन आली आहेस ते विसरून जा. तू आता टाइपकास्ट होशील''.
''खरंतर मी एक न्यूकमर होती. आणि जेव्हा त्यांनी मला ती गोष्ट सांगितली तेव्हा त्यामागचं कारणही सांगितलं. आणि मला त्यात काहीच चूकीचं वाटलं नाही. कारण मी कोणतंच मोठं स्वप्न घेऊन इंडस्ट्रीत आली नव्हती''.
''मला काम करुन गोष्टी शिकायच्या होत्या. एन्जॉय करायच्या होत्या. राजकुमार बडजात्या यांनी मला माझ्या करिअरमध्ये खूप चांगलं मार्गदर्शन केलं''.
रेणुका शहाणे पुढे म्हणाल्या की,'' कितीतरी वेळा मला काही असे रोल्स ऑफर झाले ,जिथे माझ्या भूमिकेला तसूभरही महत्त्व नव्हतं,कधीकधी तर नावही ठरलेलं नसायचं. म्हणायचे हिरोइनच्या बहिणीची भूमिका आहे, नाव अजून ठरलं नाहीय''.
''मासूम सिनेमात मी एका छोट्या मुलाच्या विधवा आईची भूमिका साकारली होती. ती एक अशी भूमिका होती जी माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग होती. मी टी.व्ही इंडस्ट्रीत खूप काम केलं.तिथे मला चांगल्या भूमिका साकारायला मिळाल्या पण सिनेमातून टी.व्ही इंडस्ट्रीत काम करायला येण्याच्या काळात खूप अंतर होतं''.
'' मध्यंतरीच्या काळात मला वाटू लागलं होतं की काही भूमिका माझ्यासाठी बनल्याच नाहीयत. मी कायम सेकंड लीड म्हणजे सहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसेल. आणि यात मला आनंदही होता''.
रेणुका शहाणेसाठी राजकुमार बडजात्यांच्या प्रॉडक्शन हाऊससोबत काम करण्याचा निर्णय एकदम योग्य राहिला. अर्थात सिनेमा बॉक्सऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला होता. पण रेणुका शहाणे कधी कोणत्याही सिनेमाची मुख्य अभिनेत्री बनताना हिंदीत तरी दिसली नाही.