Girlfriend Movie Review : टवटवीत अन्‌ झक्कास 'गर्लफ्रेंड'! 

review of Girlfriend Marathi Movie
review of Girlfriend Marathi Movie

नवा चित्रपट : गर्लफ्रेंड 

मराठी चित्रपटसृष्टीत विविध विषय हाताळले जात आहेत आणि प्रेक्षक अशा विषयांचे चांगले स्वागत करीत आहेत. विशेष म्हणजे तरुण दिग्दर्शकांची नवी फळी येत आहे आणि नावीन्यपूर्ण विषय ते हाताळत आहेत. त्यांच्या कथा-कल्पना नवनवीन आहेत आणि त्याची मांडणीही सुरेख आहे. काहीसे हटके विषय आणि अगदी मन फ्रेश करणारे. दिग्दर्शक उपेंद्र सिधयेचा "गर्लफ्रेंड चा विषयही असाच फ्रेश आणि तजेलदार आहे. 

चित्रपट दिग्दर्शित करण्याचा उपेंद्र सिधयेंचा पहिलाच प्रयत्न आहे आणि या पहिल्याच प्रयत्नात तो उत्तीर्ण झाला आहे. मुळात तो एक पटकथा व संवादलेखक. त्यामुळे विषयाची नेमकी मांडणी कशी करावी, त्याला खणखणीत संवादांची जोड कशी द्यावी, हे त्याला माहीत असल्याने त्याने या विषयाला चांगला न्याय दिला आहे. कलाकारांनीही कसदार आणि कौशल्यपूर्ण अभिनयाने त्याला उत्तम साथ दिली आहे. या चित्रपटातील संवाद आजच्या पिढीची भाषा बोलणारे आहेत. ही एक प्रेमकथा आहे आणि ती हटके आहे. 

नचिकेत प्रधान (अमेय वाघ) हा सरळ-साध्या स्वभावाचा तरुण. तो एका कंपनीत ग्राफिक डिझायनर म्हणून काम करीत असतो. त्याचे दोन जिवलग मित्र, सॅंडी (सुयोग गोऱ्हे) आणि आदित्य (उदय नेने). ते कॉलेजचे मित्र. परंतु आता आपापल्या कामात ते बिझी असतात. त्याच्या दोन्ही मित्रांना गर्लफ्रेंड असते. परंतु नचिकेतला काही गर्लफ्रेंड नसते. त्यामुळे त्याचे मित्र; तसेच ऑफिसातील सहकारी, बॉस, आई-वडील आणि लहान भाऊ त्याची थट्टामस्करी करीत असतात. व्हॅलेंटाईनच्या दिवशी नचिकेतचा वाढदिवस असतो आणि आपल्या वाढदिवशीच तो "रिलेशनशिप'मध्ये असल्याचे जाहीर करतो. आलिशा (सई ताम्हणकर) असे गर्लफ्रेंडचे नाव सांगतो. मग ती कुठून येते आणि ती आल्यानंतर कोणत्या कोणत्या गमतीजमती घडतात हे पडद्यावरच पाहिलेले बरे. 

सई ताम्हणकर आणि अमेय वाघ ही जोडी पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर एकत्र आली आहे आणि दोघांनीही छान अभिनय केला आहे. नचिकेत या भाबड्या आणि प्रामाणिक तरुणाच्या भूमिकेचे बेअरिंग त्याने उत्तम पकडले आहे. सई ताम्हणकरने या चित्रपटातील भूमिकेमध्ये चांगलीच कमाल केली आहे. नटखट आणि टवटवीत अशी ही भूमिका तिने झक्‍कास साकारली आहे. रसिका सुनील आणि ईशा केसकर यांनीही मोलाची कामगिरी केली आहे. कविता लाड, यतीन कार्येकर, सुयोग गोऱ्हे, सागर देशमुख या कलाकारांनीही चांगली साथ दिली आहे. अनिश जोग आणि रणजीत गुगळे यांची निर्मिती आहे. 

उपेंद्र सिधयेचे दिग्दर्शन, त्याला कलाकारांची उत्तम साथ, दमदार संवाद आणि संगीत... सगळी भट्टी चांगली जमलेली आहे. मात्र चित्रपटाची लांबी खूप आहे. त्याबाबतीत काहीसा विचार होणे अपेक्षित होते. परंतु एकूणच चित्रपट टवटवीत आणि मनाला आनंद देणारा असाच आहे. कारण प्रेमकथेवर चित्रपट कित्येक आले आणि गेले. अजूनही कित्येक येतील; परंतु उपेंद्र सिधयेने ही निवडलेली कथा आणि त्याला दिलेली ट्रीटमेंट उत्तम. 

साडेतीन स्टार 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com