स्वतःला मोठ्या पडद्यावर पाहून अवाक्‌ 

संतोष भिंगार्डे 
मंगळवार, 2 मे 2017

"सैराट'प्रसिद्ध रिंकू राजगुरू हिने जागवल्या आठवणी 

मुंबई : आमच्यासाठी 29 एप्रिलची रात्र अविस्मरणीय होती. त्या दिवशी आम्ही सर्व जण अर्थात मी, आकाश, तानाजी, अनुजा आणि अरबाज चित्रपट पाहत होतो. मोठ्या पडद्यावर पहिल्यांदाच स्वतःला पाहताना आम्हाला खूप आश्‍चर्य आणि कुतूहल वाटले. आम्ही सगळे खूप भावूक झालो होतो. आम्ही कुठे होतो आणि कुठे आलो, असे वाटत होते, अशा शब्दांत "सैराट'प्रसिद्ध आर्ची अर्थात रिंकू राजगुरू हिने आपल्या भावना व्यक्त केल्या. 

नागराज मंजुळे दिग्दर्शित "सैराट' हा चित्रपट 29 एप्रिल 2016 रोजी सगळीकडे प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीत उत्पन्नाचा विक्रम केला. सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट म्हणून या चित्रपटाची नोंद झाली आहे.

शनिवारी (ता. 29 ) या चित्रपटाला एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्त या चित्रपटात आर्चीची भूमिका साकारणाऱ्या रिंकू राजगुरूशी संपर्क साधला असता ती बोलत होती. ती म्हणाली की, 29 एप्रिलला पुण्यात "सैराट'चा भव्य प्रीमियर झाला तेव्हा आम्ही तो चित्रपट पाहिला. तो दिवस आणि ती रात्र माझ्यासाठी तसेच अन्य कलाकारांसाठी टर्निंग पॉइंट ठरली. चित्रपट पाहिल्यानंतर दुसऱ्या दिवसापासूनच आमच्यावर कौतुकाचा वर्षाव सुरू झाला. सगळीकडून अभिनंदन होत होते. चित्रपटाचे आणि आमच्या कामाचे कौतुक होत होते. आमचे आयुष्य बदलून टाकणारा हा चित्रपट ठरला. या चित्रपटाच्या अनेक आठवणी आहेत. या चित्रपटाला एक वर्ष झाले आहे असे मला वाटतच नाही. 

रिंकूने दहावीची परीक्षा दिली आहे. आता ती निकालाची वाट पाहत आहे. तिला पेपर सोपे गेले आहेत. अत्यंत कमी कालावधीत तिने अभ्यास केला आहे. ती म्हणाली की, निकालाबाबत मला उत्सुकता लागली आहे आणि चिंताही आहे. पाहूया काय होते ते. एक गोष्ट नक्की आहे की यापुढे मी शिक्षण आणि ऍक्‍टिंग या दोन गोष्टी करणार आहे. 

आकाश ठोसरला शुभेच्छा 
आकाश ठोसर याचा "एफ यू' हा चित्रपट आता येत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर मी नुकताच पाहिला. मला तो खूप आवडला. आकाशला माझ्या शुभेच्छा आहेत. त्याचा हाच चित्रपट नाही तर शंभरावा चित्रपटही पाहण्यास मी उत्सुक आहे, असेही रिंकू म्हणाली.

Web Title: Rinku rajguru sairat fame