'या' अंत्यसंस्काराला न जाणाऱ्या कलाकारांवर ऋषी कपूर नाराज

वृत्तसंस्था
शुक्रवार, 28 एप्रिल 2017

चमचे लोक

प्रियांका चोप्राच्या कार्यक्रमाला काल रात्री अनेक चमचे लोक मला भेटले. परंतु, त्यातील केवळ काही लोकच विनोद यांना निरोप द्यायला आले होते. ही चमचेगिरी आरपार दिसते. मला त्यांचा खूप राग येत आहे, असे ऋषी कपूर यांनी म्हटले आहे. 

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांच्या निधनाबद्दल विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवरांनी शोक व्यक्त करीत श्रद्धांजली वाहिली. मात्र, नव्या पिढीतील अभिनेते, कलाकार खन्ना यांच्या अंत्यसंस्कारांना उपस्थित राहिले नाहीत त्याबद्दल ऋषी कपूर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. हे अभिनेते प्रियांका चोप्राच्या कार्यक्रमाला हजेरी लावतात, मात्र विनोद खन्नांना श्रद्धांजली वाहायला येत नाहीत याबद्दल त्यांनी राग व्यक्त केला आहे.

अमर अकर अँथनी, कुर्बानी आणि दबंग अशा चित्रपटांतून प्रेक्षकांच्या लक्षात राहिलेले ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांचे गुरुवारी निधन झाले. राजकारण, क्रिकेट आणि चित्रपट क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी ट्विटरवरून विनोद खन्ना यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. तसेच, अनेक स्टार कलाकार त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी उपस्थित होते. 

"हे लज्जास्पद आहे. या पिढीतील एकही अभिनेता विनोद खन्ना यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित नव्हता. या नव्या कलाकारांसोबत विनोद खन्ना यांनी कामही केले आहे. या लोकांनी आदर करायला शिकलं पाहिजे," अशा शब्दांत ऋषी कपूर यांनी ट्विटरवरून जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. 

प्रियांका चोप्राच्या कार्यक्रमाला काल (गुरुवारी) रात्री अनेक चमचे लोक मला भेटले. परंतु, त्यातील केवळ काही लोकच विनोद यांना निरोप द्यायला आले होते. ही चमचेगिरी आरपार दिसते. मला त्यांचा खूप राग येत आहे, असे ऋषी कपूर यांनी म्हटले आहे. 
 

Web Title: rishi kapoor angry with new actors for not attending vinod khanna's funeral