'धावपळीच्या जीवनात वीकएण्ड खूप महत्त्वाचा वाटतो'

ऋतुजा बागवे, अभिनेत्री 
Friday, 13 November 2020

अभिनेत्री म्हणून काम करत असताना बऱ्याच वेळेस वीकएण्डची मजा घेता येत नाही. शूटिंगच्या तारखा मॅनेज करणे खूपच अवघड जाते; पण वेळ मिळल्यावर मी खूप मजा करते.

वीकएण्ड म्हटलं, की येतो तो आराम आणि कुटुंबीयांबरोबर घालवायला मिळणारा क्वालिटी टाइम. धावपळीच्या जीवनात वीकएण्ड खूप महत्त्वाचा वाटतो. अभिनेत्री म्हणून काम करत असताना बऱ्याच वेळेस वीकएण्डची मजा घेता येत नाही. शूटिंगच्या तारखा मॅनेज करणे खूपच अवघड जाते; पण वेळ मिळल्यावर मी खूप मजा करते. रोज सकाळी लवकर उठा आणि उशिरा घरी या, हे रुटिन सोडून सुट्टीच्या दिवशी मी छान मनसोक्त आराम करते. त्या दिवशी थोडं उशिरा उठणं, आरामात सगळं आवरणं सुरू असतं. शूटिंगच्या बिझी शेड्युलमुळे मला आवडणाऱ्या अनेक गोष्टी आहेत- ज्या मला फक्त वीकएण्डमध्येच करायला मिळतात.

सेलिब्रिटी वीकएण्ड - मित्र मैत्रिणींशी दंगा आणि मस्ती....

मला नवनवीन पदार्थ बनवायला आवडतात, आई- बाबांबरोबर, बहिणीबरोबर गप्पा मारायला आवडतात. माझ्या घरच्यांना माझ्या हातचं जेवण फार आवडतं. चिकन आणि विविध प्रकारचे भात हे माझी स्पेशालिटी आहे. त्यामुळे घरी असल्यावर एक वेळचं तरी जेवण आणि छान काहीतरी इव्हिनिंग स्नॅक्स मी आवर्जून बनवते. यासोबतच मला बागकाम करायची आवड आहे. आमचा टेरेस फ्लॅट आहे, त्यामुळे आमच्या घरी भरपूर वेगवेगळी झाडं आहेत. त्यांची निगा राखणं, त्यांना पाणी घालणं हे करायला मला मनापासून आवडतं. ते करत असताना वेळ कसा जातो हे कळतच नाही. मग सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळी चहा किंवा कॉफी पित टेरेसमध्ये बसायलाही मला खूप आवडतं. 

सेलिब्रिटी वीकएण्ड : आनंददायी ‘फॅमिली टाइम’

शूटिंगच्या हेक्टिक वेळापत्रकामुळे असे अनेक चित्रपट किंवा सिरीज असतात- ज्या बघायच्या राहून गेलेल्या असतात त्या मी बघते. मला वाचनाची आवड आहे लहानपणीपासूनच, त्यामुळे शूटिंग असो वा नसो मला वेळ मिळेल तेव्हा माझं काही ना काही वाचन सुरू असतं. त्यामुळे वीकएण्डला मुद्दाम वाचनासाठी वेळ काढावा लागत नाही. शिवाय मी नियमित योगा करणारी मुलगी आहे. घरी असल्यावर काही वेळ तरी मी योगा किंवा मेडिटेशनला देते. मला मुळातच माणसांची खूप आवड आहे आणि त्यामुळे मला खूप मित्र मैत्रिणी आहेत आणि आमचे भेटायचे काही ठरलेले कट्टे आहेत. हल्ली त्यांना वेळ देणं खूप कमी वेळा शक्य होतं. गेल्या वर्षीपर्यंत आम्ही बऱ्याच वेळा भेटायचो. आताही भेटतो; पण ते फक्त व्हिडिओ कॉलवर. एकदा ग्रुप व्हिडिओ कॉल केला, की आमचे गप्पांचे फड रंगतात. असा छान आनंदात दिवस गेल्यावर मी पुन्हा एकदा ठरलेलं रुटीन फॉलो करायला एकदम रिफ्रेश झालेली असते. 

(शब्दांकन : राजसी वैद्य ) 

मनोरंजन


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rutuja Bagwe TV actor says Weekends are very important in a busy life