पुण्याच्या ऋतुजा जुन्नरकर आणि कोरिओग्राफर आशीष पाटीलचा इंडियाज बेस्ट डान्सरमध्ये गौरव

सकाळ ऑनलाईन टीम
Sunday, 25 October 2020

शास्त्रीय नृत्य शैलीवर विशेष भर असलेल्या ऋतुजाच्या  हावभावांचे परीक्षकांनी कौतुक केले. परीक्षकांच्या प्रतिक्रियेवर तिला रडू आले. याविषयी गीता कपूर म्हणाल्या, “ऋतुजाचा अॅक्ट मला आवडला. तिच्या नृत्यातील प्रत्येक मूव्ह अप्रतिम होती.

मुंबई - इंडियाज बेस्ट डान्सर हा शो सध्या प्रेक्षकांच्या पसंतीला उतरत आहे. या वीकएंडला डान्सर-अभिनेत्री नोरा फतेही या शोमध्ये पाहुणी म्हणून आली होती. तिने यावेळी स्पर्धकांचा उत्साह वाढविला. स्पर्धेत सहभाग घेतलेल्या सर्वच खेळांडूनी उत्कृष्ठ सादरीकरण केले. मात्र त्यात स्पर्धक ऋतुजा जुन्नरकर आणि कोरिओग्राफर आशीष पाटील यांचा अॅक्ट विशेष लक्षवेधी ठरला. परीक्षकांना त्यांनी सादर केलेले ‘होठों में ऐसी बात’ तर आवडलेच पण तो परफॉर्मन्स पाहून त्यांना  प्रख्यात नृत्यांगणा वैजयंती मालाची आठवण झाली.

शास्त्रीय नृत्य शैलीवर विशेष भर असलेल्या ऋतुजाच्या  हावभावांचे परीक्षकांनी कौतुक केले. परीक्षकांच्या प्रतिक्रियेवर तिला रडू आले. याविषयी गीता कपूर म्हणाल्या, “ऋतुजाचा अॅक्ट मला आवडला. तिच्या नृत्यातील प्रत्येक मूव्ह अप्रतिम होती. हे देखील फार सुंदर आहे. त्याला ऋतुजाच्या नृत्याची साथ लाभली. आशीषचेही सादरीकरण अप्रतिम होते. मला ऋतुजाला अंतिम फेरीत पाहायचे आहे. प्रेक्षकांसमोर आम्हाला जे आणायचे होते, ते तुझ्या रूपात आम्हाला सापडले आहे.”अशीही भावना कपूर यांनी व्यक्त केली. 
 
टेरेन्स म्हणाला, “ऋतुजा आणि आशीष, तुमची जोडी मस्त आहे. डान्समध्ये आत्मविश्वास हा महत्वाचा असतो. तुमच्या नृत्यात तो मला दिसून आला. प्रख्यात नृत्यदिग्दर्शक सरोजजींनी मला या गाण्याविषयी सांगितले होते की, ते केवळ एका टेकमध्ये शूट झाले. ज्वेल थीफ चित्रपटातले हे गीत ज्यांनी कोरिओग्राफ केले, त्या त्यावेळी सोहनलालजींच्या साहाय्यक होत्या. वैजयंतीमाला जेव्हा दक्षिणेतून या चित्रपटउद्योगात आल्या, तेव्हा त्या उत्कृष्ट नृत्यांगना होत्या. नंतर त्या अभिनेत्री झाल्या.

कोणत्याही स्टेप्स त्या पटकन उचलायच्या. सराव करण्याची गरज त्यांना लागत नसे. त्यांचे नृत्यही डौलदार होते.  त्यांनी जेव्हा सरोजजींना या गाण्याची कोरिओग्राफी दाखवायला सांगितले, तेव्हा त्यांचा डान्स पाहून वैजयंतीमालाने लागलीच पॅक अप करण्याच्या सूचना दिल्या कारण सरोजजींनंतर त्यांना डान्स करायचा नव्हता कारण त्या उत्कृष्ट डान्सनंतर आपल्याला तसे जमणार नाही, त्यापूर्वी तालिम करावी लागेल हे त्यांना जाणवले. व त्यांनी दुसर्‍या दिवशी गाणे शूट केले. अशा प्रकारे अखेरीस हे  सुंदर गाणे जन्माला आले.  
 
 मलाइकानेही या स्पर्धकांचे कौतूक केले. ती  म्हणाली, “तुझ्या डान्समध्ये जी सहजता होती ती मला अधिक भावली. मी यापूर्वी कधीही असे नृत्य पाहिलेलं नाही. मी अनेक अॅक्ट पाहिले आहेत, पण हा त्या सगळ्यात उठावदार होता. मला वाटते सगळ्या शक्यतांवर तुम्ही बारकाईने विचार केला होता. आणि  आशिषला श्रेय द्यावे लागेल. ऋतुजाने अॅक्टमध्ये केलेले बदल दखल घेण्यासारखे आहेत.

 या कार्य़क्रमाला खास परीक्षक लाभलेल्या  नोरा फतेही म्हणाली, तुम्ही दोघेही दमदार परफॉर्मर आहात. मी जेव्हा तुम्हा दोघांना पाहते, तेव्हा एखादा जादुई बॉलीवूड चित्रपट पाहात असल्यासारखे वाटते. तुमचा अॅक्ट म्हणजे एकप्रकारची पर्वणीच होती.” या वीकएंडला प्रेक्षकांना काही मंत्रमुग्ध करणारे परफॉर्मन्स बघायला मिळणार आहेत आणि ऋतुजाचा परफॉर्मन्स त्यात नक्कीच आघाडीवर आहे.
 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rutuja junnarkars act reminds the judges of superstar