esakal | 'सांगलीमध्ये बघण्यासारखं काय आहे?' सई ताम्हणकरच्या घराविषयीची पोस्ट चर्चेत

बोलून बातमी शोधा

Sai Tamhankar

'सांगलीमध्ये बघण्यासारखं काय आहे?' सई ताम्हणकरच्या घराविषयीची पोस्ट चर्चेत

sakal_logo
By
स्वाती वेमूल

मराठीतील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये सई ताम्हणकरचं नाव आवर्जून घेतलं जातं. ग्लॅमरस आणि बोल्ड अभिनेत्री म्हणून सईने तिची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. मूळची सांगलीची असलेल्या सईने मालिकांमध्ये छोट्यामोठ्या भूमिका साकारत चित्रपटांपर्यंतचा प्रवास गाठला. मराठीसोबतच तिने हिंदीतही काही भूमिका साकारल्या. अशा या सईने महाराष्ट्राच्या घराघरात आपलं नाव पोहोचवलं. सईने नुकतंच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. सिनेसमीक्षक अमोल उदगीरकर यांनी ही पोस्ट लिहिली आहे. सांगलीत एका शूटिंगदरम्यान त्यांना आलेल्या अनुभवाबद्दल त्यांनी त्या पोस्टमध्ये लिहिलंय.

अमोल उदगीरकर यांची पोस्ट

'मी सांगलीला शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलला गेलो होतो. तिथं माझ्यासोबत एक स्थानिग पोरगा होता फिरायला. त्याला मी विचारलं की, 'सांगलीमध्ये काय आहे बघण्यासारखं?' तर तो मला एका घरासमोर घेऊन गेला आणि अभिमानाने सांगितलं, 'हे सई ताम्हणकरचं घर आहे.' मराठी सिनेमाविषयक चर्चा ऐकल्या की मला सगळ्यात आधी तो पोरगा आठवतो', अशी पोस्ट त्यांनी लिहिली.

हेही वाचा : 'लागीरं झालं जी' मालिकेतील 'शीतली'ला कोरोना

हेही वाचा : "फक्त राजकारण्यांना नाव ठेऊन काय उपयोग?"; राष्ट्रवादीचं तेजस्विनीला उत्तर

सईने हीच पोस्ट शेअर करत कृतज्ञतेची भावना व्यक्त केली. त्याचप्रमाणे सांगलीत फिरण्यासाठी इतरही काही ठिकाणं असल्याचं तिने कॅप्शनमध्ये लिहिलं. सईच्या या पोस्टवर प्रार्थना बेहरे, स्पृहा जोशी, अमृता खानविलकर यांसारख्या सेलिब्रिटींनी कमेंट्स करत तिचं कौतुक केलं आहे. तर नेटकऱ्यांनीही कमेंट्समध्ये सईचे गुणगान गायले आहेत.