esakal | 'लोकांना दाखवण्यासाठी नाही तर..'; 'परश्या'चं चाहत्यांना आवाहन

बोलून बातमी शोधा

Akash Thosar
'लोकांना दाखवण्यासाठी नाही तर..'; 'परश्या'चं चाहत्यांना आवाहन
sakal_logo
By
स्वाती वेमूल

देशभरात कोरोनाचा फैलाव वेगाने होत असताना आपापल्या परीने मदत करण्याचं आवाहन बॉलिवूड आणि मराठी सेलिब्रिटींकडून केलं जात आहे. त्याचप्रमाणे अनेक कलाकार मदतीचा हात पुढे करत आहेत. 'सैराट' या चित्रपटातून प्रकाशझोतात आलेला अभिनेता आकाश ठोसर याने नुकतंच रक्तदान केलं. त्याचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत त्याने चाहत्यांनाही रक्तदान करण्याचं आवाहन केलं.

आकाश ठोसरची पोस्ट:

'आपल्या प्रत्येकाला वाटत असतं की देशासाठी काहीतरी करावं, उपयोगी पडावं. मला लहानपणी पोलीस किंवा आर्मीमध्ये भरती होऊन देशसेवा करायची होती. पण ते शक्य झालं नाही. आज कोरोनाच्या लढ्यात वेगवेगळ्या क्षेत्रातले अनेक लोक आपल्यासाठी झटत आहेत, ते देशसेवाच करत आहेत. मग आपल्यालाही काय करता येईल? कोरोनामुळे आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण आला आहे. त्यातच रक्ताचाही तुटवडा भासतोय. १ मे पासून तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला सुरुवात होत आहे. या काळात १८ वर्षांवरील सर्वांना लस घेता येणार आहे. पण एकदा लस घेतल्यानंतर पुढील ६० दिवस म्हणजेच दोन महिने रक्तदान करता येणार नाही. त्यामुळे या तिसऱ्या टप्प्यात लस घेणाऱ्यांनी आधी रक्तदान करणं गरजेचं आहे. कोरोनातून बरे झालेल्यांनी प्लाझ्मा दान आणि बाकीच्यांनी रक्तदान. सगळ्यांना आवाहन करूयातच पण आता सर्वात आधी आपल्या स्वतःलाच आवाहन करणं गरजेचं आहे. म्हणजे मग एक साखळी तयार होईल. लोकांना दाखवण्यासाठी नाही तर एकमेकांना प्रेरणा मिळावी हा शुद्ध हेतू ठेऊयात. एकमेकांना मदत करून, जमेल तसा एकमेकांना आधार देऊन आपलं 'रक्ताचं' नातं अजून घट्ट करूयात,' अशी पोस्ट आकाशने लिहिली.

हेही वाचा : अभिनेते बिक्रमजीत कंवरपाल यांचे कोरोनाने निधन

कोरोना व्यतिरिक्त इतर अनेक आजारांच्या रुग्णांवर उपचार करताना रक्ताचा तुटवडा जाणवतो. त्यामुळे निरोगी व्यक्तींनी रक्तदानासाठी पुढे यावे, असं आवाहन सतत डॉक्टर आणि सेलिब्रिटींकडून केलं जात आहे.