"बाहेरच्या सेलिब्रिटींनी ट्विट केल्यावर जाग आली का?", अजित पवारांचा बॉलिवूडकरांना सवाल

स्वाती वेमूल
Friday, 5 February 2021

दोन-तीन महिन्यांपासून शेतकरी राजधानी दिल्लीच्या सीमेवर थंडी-वाऱ्यात बसले आहेत, त्यावेळी सेलिब्रिटींना आठवलं नाही का?

दोन-तीन महिन्यांपासून शेतकरी राजधानी दिल्लीच्या सीमेवर थंडी-वाऱ्यात बसले आहेत, त्यावेळी सेलिब्रिटींना आठवलं नाही का, बाहेरच्या सेलिब्रिटींनी ट्विट केल्यावरच तुम्हाला जाग आली का, असा सवाल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी शेतकरी आंदोलनाबाबत वक्तव्य केलं. विख्यात अमेरिकी पॉप गायिका रिहाना, पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग यांनी आंदोलनाला पाठिंबा दिल्यानंतर ट्विटरवर सेलिब्रिटींची ट्विट मालिकाच सुरू झाली. ग्लोबल सेलिब्रिटींच्या विरोधात बॉलिवूड सेलिब्रिटी असे दोन गट ट्विटरवर तयार झाले. या सर्व घटनांबाबत अजित पवारांनी वक्तव्य केलं. 

"दोन-तीन महिन्यांपासून शेतकरी आंदोलनाला बसलेत, तेव्हा या सेलिब्रिटींना आठवलं नाही का? प्रत्येकाला मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. आता बाहेरच्या सेलिब्रिटींनी मत व्यक्त केल्यावरच तुम्हाला जाग आली का? जगात कुठेही माणुसकीला अडचणीत आणणारी गोष्ट घडली की आपणही ट्विट करतोच. अशा घटनांविरोधात आपणही आवाज उठवतो. त्यांनीसुद्धा तेच केलंय. पण इतक्या दिवसांपासून शेतकरी थंडी-वाऱ्यात आंदोलनाला बसले आहेत, हे आतापर्यंत इथल्या सेलिब्रिटींना दिसलं नाही का", असा सवाल अजित पवारांनी केला. 

हेही वाचा : 'बिग बॉस मराठी' फेम हिना पांचाळचं सडेतोड प्रत्युत्तर; 'ज्यांनी माझी खिल्ली उडवली..'

रिहाना, ग्रेटा, अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस यांची पुतणी मीना हॅरिस यांच्यासह अनेक नामवंतांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा व्यक्त केला. तर भारताने केलेले तीन नवे कृषी कायदे हे सुधारणांसाठी टाकलेले महत्त्वाचे पाऊल असल्याचे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने म्हटले आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनावर अमेरिकेने प्रथमच भाष्य केले. शांततापूर्ण आंदोलन आणि इंटरनेट वापराचा अधिकार हे अभिव्यक्तीस्वातंत्र्यासाठी महत्त्वाचे असून ते सुदृढ लोकशाहीचे लक्षण आहे. त्यामुळे संवादातून तोडगा काढाला, असा सल्ला अमेरिकेने भारताला दिला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ajit pawar on celebrity twitter war on farmers protest