esakal | ड्रग्ज प्रकरणात नवऱ्याच्या धडाकेबाज कारवाईवर अभिनेत्री क्रांती रेडकर म्हणाली..
sakal

बोलून बातमी शोधा

Sameer Wankhede Kranti Redkar

'मला समीरचा अभिमान'; ड्रग्ज कारवाईवर पत्नी क्रांती रेडकरची प्रतिक्रिया

sakal_logo
By
स्वाती वेमूल

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर बॉलिवूडचं ड्रग्ज कनेक्शन समोर आणणारे केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाचे (एनसीबी) विभागीय संचालक समीर वानखेडे Sameer Wankhede सध्या खूप चर्चेत आहेत. समीर वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या टीमने कॉर्डेलिया क्रूझवरील ड्रग्ज पार्टीचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी त्यांनी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यनला अटक केली. समीर हे मराठी अभिनेत्री क्रांती रेडकरचे Kranti Redkar पती आहेत. त्यांच्या कामगिरीवर क्रांतीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत प्रतिक्रिया दिली आहे. "देशासाठी तो त्याचं वैयक्तिक आयुष्य, मुलं आणि कुटुंबीय यांच्याशी तडजोड करतोय, मला त्याच्यावर खूप अभिमान आहे," असं क्रांती म्हणाली.

'टाइम्स ऑफ इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली, "समीर आधीपासूनच खूप मेहनती आहे. तो याआधीही निष्ठेनेच काम करत होता. मात्र आता बॉलिवूडशी संबंधित ड्रग्ज प्रकरणं समोर आल्याने तो प्रकाशझोतात आला आहे. त्याच्या कामाशी संबंधित मी कोणताच प्रश्न विचारत नाही. घरातील इतर जबाबदाऱ्या मी पार पाडते. जेणेकरून तो त्याच्या कामावर पूर्ण लक्ष केंद्रीत करू शकेल."

हेही वाचा: वर्ल्ड कप ट्रॉफी अडवण्यापासून आर्यनच्या अटकेपर्यंत..समीर वानखेडे यांची कामगिरी

ड्रग्ज प्रकरणांची कोणतीच माहिती समीर कुटुंबीयांना सांगत नसल्याचं क्रांतीने स्पष्ट केलं. "कामाचा व्याप इतका असतो की अनेकदा त्याची पुरेशी झोपसुद्धा होत नाही. तो २४ तास काम करत असतो. फक्त दोन तासांची झोप त्याला मिळते. त्याच्या कामात मी कधीच दखल देत नाही. दररोज त्याचे सिक्रेट ऑपरेशन्स असतात आणि त्याबद्दल तो कुटुंबीयांना कोणतीच माहिती देऊ शकत नाही. त्याच्या कामाबाबत माझी कोणतीच तक्रार नाही", असं तिने सांगितलं.

हेही वाचा: Drugs: NCB बॉलिवूड सेलिब्रिटींना लक्ष्य करतेय का? समीर वानखेडेंचं सडेतोड उत्तर

क्रांती आणि समीर यांना तीन वर्षांची जुळी मुलं आहेत. "कुटुंबीयांची आणि मुलांची काळजी घेण्यासाठी मी घरी आहे, त्यामुळे तो निश्चिंत आहे. देशासाठी तो त्याचं वैयक्तिक आयुष्य, मुलं आणि कुटुंबीय यांच्याशी तडजोड करतोय, मला त्याच्यावर खूप अभिमान आहे. जो जसा आहे तसाच मला आवडतो आणि मी त्याच्या कामाचा खूप आदर करते", अशा शब्दांत क्रांतीने भावना व्यक्त केल्या.

loading image
go to top