अभिनेता संदीप नाहरच्या मृत्यूप्रकरणी पत्नी व सासू अडचणीत; गुन्हा दाखल

स्वाती वेमूल
Thursday, 18 February 2021

संदीप नाहरने सुशांत सिंह राजपूतच्या 'एम. एस. धोनी' आणि अक्षय कुमारच्या 'केसरी' चित्रपटात काम केलं होतं.

अभिनेता संदीप नाहरच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी त्याची पत्नी कंचन शर्मा व सासूविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत्यूपूर्वी संदीपने फेसबुकवर व्हिडीओ पोस्ट करत पत्नी व सासूवर बरेच आरोप केले होते. आता गोरेगाव पोलिसांनी कलम ३०६ अंतर्गत (आत्महत्येला प्रवृत्त) पत्नी कंचन आणि सासूविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 'संदीपच्या वडिलांनी तक्रार दाखल केल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू आहे', अशी माहिती पोलिसांनी 'एएनआय'शी बोलताना दिली. 

संदीप नाहरने सुशांत सिंह राजपूतच्या 'एम. एस. धोनी' आणि अक्षय कुमारच्या 'केसरी' चित्रपटात काम केलं होतं. १५ फेब्रुवारी रोजी मुंबईतल्या राहत्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळला. त्यापूर्वी त्याने फेसबुकवर व्हिडीओ पोस्ट करत पत्नीवर भांडणाचे व मानसिक त्रासाचे आरोप केले होते. 

पोलिसांची प्राथमिक माहिती
संदीपने त्याच्या बेडरुमचं दार आतून बंद केलं होतं. पत्नीने वारंवार दार ठोठावूनही आतून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. तेव्हा तिने घरमालक व त्याच्या मित्रांना फोन करून बोलावून घेतलं. ते आल्यानंतर दार उघडण्यात आला, तेव्हा पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत संदीप आढळला. संदीपला ताबडतोब रुग्णालयात दाखल केले असता त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केलं. 

हेही वाचा : PM मोदी की राहुल गांधी ? पोल घेऊन फसला रणवीर शौरी

हेही वाचा : "माझी मुलगी अजूनही स्ट्रगल करतेय"; घराणेशाहीच्या वादावर सुप्रिया पिळगावकर 

काय आहे प्रकरण?
संदीपने मृत्यूपूर्वी फेसबुकवर व्हिडीओ पोस्ट करत पत्नीसोबत असणारे मतभेद सांगितले होते. "मी सध्या मानसिकदृष्ट्या स्थिर नाही आणि याला कारणीभूत माझी पत्नी आहे. गेल्या दीड-दोन वर्षांपासून मी हा त्रास सहन करतोय. आमची सतत भांडण होतात आणि ती माझ्यावर संशय घेते. आता हे सर्व माझ्या सहनशक्तीपलीकडे गेलंय", असं तो या व्हिडीओत म्हणाला होता. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sandeep Nahar death case A case registered against his wife and mother in law