वादळी 'स्कॅम'ची चित्तरकथा

संतोष शाळिग्राम
Friday, 23 October 2020

हर्षद मेहता म्हणेल त्या कंपनीच्या शेअरची किंमत गगनाला भिडत राहते. या अनाकलनीय घडमोडींचे औत्सुक्‍य त्या वेळी प्रत्येकालाच होते. पण, यश आले की हितशत्रूदेखील वाढू लागतात.

बाबरी मशीद, राम मंदिर आणि रथयात्रा यांवरून देश ढवळून निघाला होता. अनेक घडामोडी घडत होत्या. याच काळात मुंबईतील शेअर बाजारातही वादळ घोंघावत होतं. सन १९९२ च्या एप्रिल महिन्यात एका वृत्तपत्रानं कोंडी फोडली आणि हर्षद मेहता नावाच्या ‘इतिहासा’ला घरघर लागली. ‘मैं हिस्टरी बनाना चाहता हूँ’ असा निश्‍चिय करून अवघा शेअर बाजार ताब्यात घेणारा एक सटोडिया कायद्याच्या कचाट्यात सापडला. सीबीआय, सक्तवसुली संचालनालय, पोलिस यंत्रणा त्यांचे कर्तव्य बजावू लागल्या. तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांनी एक कोटी रुपये घेतल्याचा आरोप झाला. राजकीय आणि बॅंकिंग क्षेत्रात प्रचंड खळबळ माजली आणि पुन्हा एकदा ‘इतिहास’ घडला. पाच हजार कोटी रुपयांचा गैरव्यवहार उघडकीस आला. या सगळ्या घटनांचं सुरेख चित्रण म्हणजे ‘सोनी लिव्ह’ या ओटीटीवरील ‘द स्कॅम १९९२ : द हर्षद मेहता स्टोरी.’

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सुमारे तीन दशकांपूर्वीची ही कथा. आजच्या काळात ती दंतकथा वाटावी एवढी विलक्षण. शांतीलाल मेहता या अपयशी व्यावसायिकाचा एक मुलगा वेगवेगळे व्यवसाय, नोकरी करून आई-वडील आणि भावाच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होता. या स्थितीतही मोठं काहीतरी करण्याची इच्छा मनात घेऊन तो वावरत होता. अशात त्याला शेअर बाजाराचा रस्ता सापडतो आणि त्याचं आयुष्य बदलून जातं. या बाजारात ठाण मांडून बसलेल्या अनेक सटोडियांचा निकाल लावत हर्षद मेहता उंच भरारी घेऊ लागतो. श्रीमंतांच्या पैशांकडून बॅंकांच्या गंगाजळीकडे वळतो. ती अनधिकृतपणे वापरू लागतो. ‘रिस्क है, तो इश्‍क है’ म्हणत प्रचंड पैसा, नाव आणि प्रतिष्ठा कमावतो. हर्षद मेहता म्हणेल त्या कंपनीच्या शेअरची किंमत गगनाला भिडत राहते. या अनाकलनीय घडमोडींचे औत्सुक्‍य त्या वेळी प्रत्येकालाच होते. पण, यश आले की हितशत्रूदेखील वाढू लागतात. असाच एक हितशत्रू सुचेता दलाल या पत्रकाराला माहिती पुरवितो. स्टेट बॅंकेच्या पाचशे कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराची बातमी झळकते आणि हर्षद मेहताच्या विश्‍वाला ग्रहण लागते. शेअर बाजार कोसळतो, असंख्य लोक क्षणार्धात कफल्लक होतात... या वादळाच्या अंतापर्यंतचं यथार्थ वर्णन ही वेब सीरिज आपल्याला दाखवते. 

दिग्दर्शक हंसल मेहता यांनी सुचेता दलाल यांच्याच पुस्तकाचा आधार घेऊन हर्षद मेहता नावाचा इतिहास चितारला आहे. ऐंशीच्या दशकातील वातावरण, शेअर बाजार, मेहता कुटुंबीयांची श्रीमंती, गाड्या हे सारं प्रेक्षकाला त्या काळात घेऊन जातं. भक्कम पटकथेमुळे ही कथा उत्कंठा वाढवत राहते. सीरिजचं सर्वांत मोठं बलस्थान म्हणजे अभिनय. हर्षद मेहता यांच्यासारखी ना शरीरयष्टी आणि चेहरा-मोहरा; तरीही प्रतीक गांधी आपल्याला हर्षद मेहता वाटू लागतो. गुजराती रंगभूमीवरच्या या कलाकारानं हर्षद साकारताना कमाल केली आहे. अख्खी सीरिज तो व्यापून टाकतो. त्याचा भाऊ अश्‍विनची भूमिका साकारणारा हेमंत खेर, त्याचा मित्र भूषण भट, चिराग व्होरा, सुचेता दलालच्या भूमिकेत श्रेया धन्वंतरी, सीबीआयचा अधिकारी रजत कपूर यांनी या सीरिजचं गुणात्मक मूल्य कित्येक पटींनी वाढवलं आहे. ऐंशीच्या दशकापासून पुढं दोन दशकं धुमसणारा हा ‘इतिहास’ प्रत्येकानं पाहावा असाच आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: santosh shaligram writes article about scam 1992