..अन् लेकीसाठी अमृता-सैफच्या डोळ्यात आलं पाणी | Sara Ali Khan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Amrita, Sara, Saif

..अन् लेकीसाठी अमृता-सैफच्या डोळ्यात आलं पाणी

अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) बॉलिवूडमध्ये आपली स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण करू पाहतेय. सारा ही अमृता सिंग (Amrita Singh) आणि सैफ अली खान (Saif Ali Khan) यांची मुलगी आहे. 'केदारनाथ' या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. अगदी पहिल्याच चित्रपटापासून साराने तिचा चाहतावर्ग निर्माण केला. नुकताच तिचा 'अतरंगी रे' (Atrangi Re) हा चित्रपट प्रदर्शित झाला. हा चित्रपट पाहिल्यानंतर आईवडिलांची काय प्रतिक्रिया होती, याबद्दल तिने सांगितलं. माझ्या 'अतरंगी रे' चित्रपटाने आई अमृता आणि वडील सैफ यांच्या डोळ्यात पाणी आणलं, असं सारा म्हणाली. आनंद एल. राय दिग्दर्शित या चित्रपटात सारासोबत अक्षय कुमार आणि धनुष यांच्या मुख्य भूमिका आहेत. रिंकू (सारा), विशू (धनुष) आणि सज्जाद (अक्षय) यांच्यातील प्रेमाचा त्रिकोण या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. २४ डिसेंबर रोजी हा चित्रपट डिस्ने प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला.

'इंडिया टुडे'ला दिलेल्या मुलाखतीत सारा म्हणाली, "माझ्या आईचा स्वभाव खूप भावूक आहे आणि ती नेहमीच तशी राहील. माझे वडील मात्र लवकर भावूक होत नाहीत किंवा त्या पद्धतीने ते आमच्यासमोर व्यक्त होत नाहीत. पण माझ्या चित्रपटाने दोघांच्याही डोळ्यांत पाणी आणलं. माझ्यासाठी ते एकप्रकारचं कौतुकच आहे. त्यांना माझ्यावर अभिमान आहे, हे त्यांच्या डोळ्यात दिसतंय."

हेही वाचा: बिग बॉसची ट्रॉफी जिंकल्यामुळे नाही तर 'या' कारणामुळे होतंय विशालचं कौतुक

भाऊ इब्राहिमची काय प्रतिक्रिया होती असा प्रश्न विचारला असता ती पुढे म्हणाली, "आम्ही नेहमीच एकमेकांची मस्करी करत असतो, खिल्ली उडवत असतो, टेर खेचत असतो. कॉलेजपासून आतापर्यंत मी त्याच्यासाठी त्याची गोलूमोलू बहीणच आहे. पण तोसुद्धा म्हणाला की त्याला माझ्यावर अभिमान आहे आणि तो इतरांनाही हे सांगतोय. हे सर्व पाहून मी खूप खूश आहे."

'अतरंगी रे' हा साराच्या करिअरमधील पाचवा चित्रपट आहे. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचं खूप कौतुक होत आहे. तिने आतापर्यंत 'केदारनाथ', 'सिम्बा', 'लव्ह आज कल' आणि 'कूली नंबर १' या चित्रपटांमध्ये काम केलंय.