
Satish Kaushik : मुलाच्या मृत्युनंतर सतीश कौशिक यांना नेहमीच...
Satish Kaushik Passed Away : नियती एखाद्या सोबत किती क्रुर खेळ खेळू शकते याचा प्रत्यय बॉलीवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक सतीश कौशिक यांच्याकडे पाहिल्यावर कळून येते. हदयविकाराच्या धक्क्यानं मृत्यु झालेल्या कौशिक यांच्या आय़ुष्यात वादळांची, संकटांची काही कमी नव्हती. या कलाकारानं आपल्या हदयातील वेदना कधीही बोलून न दाखवता चाहत्यांना नेहमीच हसत ठेवले.
प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांनी कौशिक यांच्या निधनाविषयी माहिती सोशल मीडियावर दिल्यानंतर चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला. सर्वांना हसवणारे, खूप काही शिकवणारे, वेळप्रसंगी मदतीचा हात पुढे करणारे कौशिक यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनानंतर बॉलीवूडमधील अनेकांनी त्यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला. सुपरस्टार पासून ते नवख्या कलाकारासोबत देखील तितक्याच उत्साहानं आणि प्रेमानं काम करणाऱ्या या कलाकाराच्या जाण्यानं मनोरंजन क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे.
Also Read - परदेशातही वापरता येणार युपीआय सुविधा...वाचा सविस्तर
वयाच्या अवघ्या ६३ व्या वर्षी कौशिक यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचा जन्म १३ एप्रिल १९६५ रोजी हरियाणामध्ये झाला होता. दिग्दर्शक, निर्माता, अभिनेता म्हणून त्यांनी प्रेक्षकांचे गेल्या तीन दशकांहून अधिक काळ मनोरंजन केले होते. विनोदी भूमिकांमधून चाहत्यांना मनमुराद हसवणाऱ्या कौशिक यांच्या वैयक्तिक आयुष्यात जी वादळं आली त्याला त्यांनी ज्याप्रकारे तोंड दिले ते कौतूकास्पद म्हणावे लागेल. त्यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर कौशिक यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयीच्या त्या गोष्टींविषयी बोलले जात आहे.
१९८३ मध्ये कौशिक यांनी बॉलीवूडमध्ये पाऊल ठेवले. त्यानंतर दोन वर्षांनी त्यांचे शशि यांच्याशी लग्न झाले. मात्र लग्नानंतर काही काळानंतर त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. त्यांच्या दोन वर्षाच्या मुलाचे निधन झाले. त्यानंतर कौशिक हादरुन गेले. १९९६ मध्ये त्यांच्या दोन वर्षाच्या मुलाचे निधन झाले. त्या धक्क्यातून त्यांना बाहेर येण्यासाठी खूप काळ जाऊ द्यावा लागला.
वयाच्या ५६ व्या वर्षी कौशिक यांच्या घरी गोड बातमी आली. त्यांच्या घरी सोनपावलांनी वंशिका आली. तिच्या जन्मानंतर घर आनंदून गेले होते.सरोगसीच्या माध्यमातून झालेल्या वंशिकाच्या आगमानंतर कौशिक यांनी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये आपण फार आनंदात असल्याचे म्हटले होते. कौशिक यांनी जवळपास शंभराहून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. साजन चले ससुराल या चित्रपटासाठी त्यांना सर्वश्रेष्ठ हास्य अभिनेत्याचा फिल्मफेयर पुरस्कारही मिळाला होता.