अभिनेता जॅकी श्रॉफने दाखवला मनाचा मोठेपणा; गरजू कलाकार आणि तंत्रज्ञांना केली मदत...

संतोष भिंगार्डे
गुरुवार, 9 जुलै 2020

सध्याची परिस्थिती अतिशय गंभीर आहे, अशावेळी एकमेकांना मदत करणे, मानसिक आधार देणे खूप गरजेचे आहे. चित्रपटसृष्टीतील सगळ्यांना याचा त्रास झाला असला तरी यातील पडद्यामागील तंत्रज्ञ वर्गाला याचा विशेष फटका बसला आहे.

मुंबई : देशभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. संपूर्ण चित्रपटसृष्टी ठप्प झाली आहे. कोरोनाच्या महामारीत लॉकडाउनमुळे चित्रपटसृष्टीतील गरजू कलाकार व तंत्रज्ञ यांना मदत करण्याच्या उद्देशाने चित्रपटसृष्टीतील अनेक आघाडीचे कलाकार मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. 

अभिनेता सुशांतचे शेवटचे गाणे येणार लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; वाचा सविस्तर...

प्रसिद्ध अभिनेते जॅकी श्रॉफ यांनी देखील जीवनावश्यक वस्तूंचे किट अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या सभासदांसाठी देऊन आपली सामाजिक बंधिलकी जपली आहे. महामंडळाच्या सहकार्यवाह चैत्राली डोंगरे यांच्याकडे ही मदत सुपूर्द करत तंत्रज्ञांना मदतीचा हात दिला आहे.

ज्येष्ठ अभिनेते जगदीप यांना अखेरचा निरोप; माझगाव कब्रस्थानात झाला दफनविधी...

'सध्याची परिस्थिती अतिशय गंभीर आहे, अशावेळी एकमेकांना मदत करणे, मानसिक आधार देणे खूप गरजेचे आहे. चित्रपटसृष्टीतील सगळ्यांना याचा त्रास झाला असला तरी यातील पडद्यामागील तंत्रज्ञ वर्गाला याचा विशेष फटका बसला आहे. त्यांना माझ्याकडून जास्तीत जास्त मदत करण्याचा माझा प्रयत्न आहे,' अशा भावना जॅकी श्रॉफ यांनी बोलून दाखविली. अकिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांनी जॅकी श्रॉफचे आभार मानले आहेत. यापूर्वी रितेश आणि जेनेलिया देशमुख तसेच अमिताभ बच्चन यांनीही मदत केली आहे.
---
संपादन ः ऋषिराज तायडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: senior actor jackey shroff helps to needy film artist and technicians amid lockdown