समीक्षकांनी धुतले; तरीही 'झिरो'ची कमाई दणदणीत! 

वृत्तसंस्था
मंगळवार, 25 डिसेंबर 2018

यापूर्वी 'बागी-2', 'पद्मावत', 'ठग्ज ऑफ हिंदुस्तान', 'रेस-3' आणि 'संजू' या चित्रपटांनी ही कामगिरी केली आहे. 

मुंबई : प्रचंड हवा निर्माण करून प्रत्यक्षात बहुतांश प्रेक्षकांचा अपेक्षाभंग करणाऱ्या शाहरुख खानच्या 'झिरो'ने अखेर कमाईच्या बाबतीत 100 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला. भारतामध्ये या चित्रपटाची कमाई फारशी झाली नसली, तरीही परदेशातील प्रेक्षकांनी हात दिल्यामुळे 'झिरो'ने 100 कोटींहून अधिक कमाई केली आहे. 

'झिरो' या चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण झाली होती. आनंद एल. राय दिग्दर्शित या चित्रपटामध्ये शाहरुखने एका बुटक्‍या माणसाची भूमिका केली होती. या चित्रपटात शाहरुखसह अनुष्का शर्मा आणि कॅतरिना कैफ यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. पण या चित्रपटाने अपेक्षाभंगच केला असल्याचे बहुतांश प्रेक्षकांचे मत झाले. 

या चित्रपटापूर्वी शाहरुखचा शेवटचा चित्रपट 2017 च्या ऑगस्टमध्ये झळकला होता. त्यामुळे जवळपास दीड वर्षाने रुपेरी पडद्यावर परतणाऱ्या शाहरुखला समीक्षकांच्या पसंतीच्या बाबतीत मात्र निराश व्हावे लागले. 

पहिल्याच दिवशी 'झिरो'ने 20.14 कोटी रुपयांची कमाई केली. दुसऱ्या दिवशी 18.22 कोटी, तर तिसऱ्या दिवशी रविवार असूनही 20.71 कोटी इतकीच कमाई केली. परदेशात मात्र या चित्रपटाची कमाई चांगली झाल्यामुळे जगभरातील थिएटर्समध्ये मिळून 'झिरो'ने 107 कोटी रुपये मिळविले. यंदाच्या वर्षात 100 कोटी क्‍लबमध्ये दाखल होणारा 'झिरो' हा केवळ सहावा चित्रपट आहे. 

यापूर्वी 'बागी-2', 'पद्मावत', 'ठग्ज ऑफ हिंदुस्तान', 'रेस-3' आणि 'संजू' या चित्रपटांनी ही कामगिरी केली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shah Rukh Khans Zero into the 100 Crore club