
'अशा लोकांना पकडून मारलं पाहिजे'; निधनाच्या अफवा पसरवणाऱ्यांवर 'शक्तीमान' संतप्त
गेल्या काही दिवसांपासून कलाविश्वातील अनेक दिग्गज कलाकारांच्या निधनाच्या अफवा सोशल मीडियावर पसरत आहेत. आता 'शक्तीमान'च्या Shaktimaan भूमिकेमुळे लोकप्रिय झालेले अभिनेते मुकेश खन्ना Mukesh Khanna यांच्या निधनाच्या अफवा पसरल्या आहेत. या अफवांवर आता खुद्द मुकेश यांनीच उत्तर दिलं आहे. "मी खरंच आता वैतागलो आहे. अशा अफवा पसरवणाऱ्यांना काय मिळतं? जवळपास माझ्या सर्व मित्रांनी आणि कुटुंबीयांनी मला फोन करून तब्येतीची विचारपूस केली", अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला. (Shaktimaan actor Mukesh Khanna on his death hoax)
मुकेश खन्ना यांनी इन्स्टाग्रामवरही व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांना विनंती केली. 'माझी तब्येत ठीक आहे. अशा अफवा पसरवणाऱ्यांना पकडून मारलं पाहिजे. तुम्हा सर्वांच्या प्रार्थनांमुळे मी एकदम ठणठणीत आहे', असं त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं.
हेही वाचा : 'तारक मेहता..'मधील 'टप्पू'च्या वडिलांचं कोरोनाने निधन
अनेक सेलिब्रिटींच्या निधनाच्या अफवा
सध्या कोरोनामुळे सर्वत्र चिंतेचं आणि भितीचं वातावरण आहे. अशातच अनेकांच्या निधनाच्या अफवांना पेव फुटत आहेत. याआधी अभिनेत्री तबस्सुम, मिनाक्षी शेषाद्री, गायक लकी अली, रामायणात रावणाची भूमिका साकारणारे अभिनेते अरविंद त्रिवेदी यांच्याही निधनाच्या अफवा पसरल्या होत्या.