शरद केळकर म्हणाला, शिवाजी नाही, छत्रपती शिवाजी महाराज! अन् पुढे...

वृत्तसंस्था
बुधवार, 20 नोव्हेंबर 2019

मंगळवारी ‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’ या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. त्यानंतर अजय देवगण, शरद केळकर, सैफ अली खान, दिग्दर्शक ओम राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

मुंबई : बॉलिवूडमध्ये सध्या ऐतिहासिक चित्रपटांचे वारे वाहू लागले आहेत. गेल्या काही काळात ‘पद्मावत’, ‘बाजीराव मस्तानी’, ‘मणिकर्णिका’, ‘केसरी’ असे अनेक चित्रपट येऊन गेले. त्यानंतर आता ‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’ या चित्रपटाची चर्चा आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. यामध्ये अजय देवगण तानाजी मालुसरेंची भूमिका साकारत आहे. तर अभिनेता शरद केळकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘तान्हाजी’ सिनेमाची स्टारकास्ट ट्रेलर रिलीजवेळी उपस्थित होती. मात्र, या सिनेमाच्या ट्रेलर रिलीजदरम्यान, एक किस्सा घडला, ज्यामुळे तिथे उपस्थित असलेल्या सर्वांनी अभिनेता शरद केळकरसाठी टाळ्या वाजवल्या.

मंगळवारी या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. त्यानंतर अजय देवगण, शरद केळकर, सैफ अली खान, दिग्दर्शक ओम राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना या सिनेमाबाबत विचारण्यात आलं. या सिनेमात अभिनेता शरद केळकर हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे शरद केळकरला शिवाजी महाराजांबद्दल प्रश्न विचारण्यात आला. मात्र, हा प्रश्न विचारताना पत्रकाराने शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला.

त्यावेळी शरद केळकरने त्यांची चूक सुधारत ‘छत्रपती शिवाजी महाराज’ असं म्हणायला सांगितलं. शरद केळकरने पत्रकाराची चूक सुधारताच त्याच्या मनातील शिवाजी महाराजांबाबतचा आदर पाहून सर्वच आवाक झाले. शरद केळकरसाठी सर्वांनी टाळ्या वाजवल्या.

(सौजन्य - मुव्हिज टॉकीज)

या घटनेचा व्हिडीओ मराठी रिट्विटच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला. त्यासोबत ‘हे जपलं पाहिजे, वाढविले पाहिजे’, असं कॅप्शनही देण्यात आलं आहे. या व्हिडीओवर अनेक कमेंट येत आहेत. यामध्ये सर्वचजण शरद केळकरचं कौतुक करत आहेत.

बच्चन यांच्याकडून महाराजांचा एकेरी उल्लेख-‘कौन बनेगा करोडपती’मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्यामुळे संतापाची लाट उसळली होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक महानायक अमिताभ बच्चन यांनी शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला होता. त्यानंतर ‘सोनी वाहिनी’ने त्यांच्या या चुकीसाठी सपशेल माफी मागितली. स्पर्धकाला प्रश्न विचारताना ऑप्शनमध्ये शिवरायांचा ‘शिवाजी’ असा उल्लेख केल्यामुळे सोशल मीडियावर टीकेची झोड उठली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sharad kelkar corrects reporter to say chhatrapati shivaji maharaj