तब्बल दोन वर्षांनी उघडणार 'शिवाजी मंदिर'चा मखमली पडदा, हे आहेत नवे बदल.. | shivaji mandir theater reopen after two years | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

shivaji mandir theater reopen after two years

तब्बल दोन वर्षांनी उघडणार 'शिवाजी मंदिर'चा मखमली पडदा, हे आहेत नवे बदल..

मराठी व्यावसायिक नाटक मुंबई पुण्यातअधिक रुजले आणि वाढले. नाटक कोणतेही असो पण त्या नाटकाचा प्रयोग दादरच्या शिवाजी मंदिरात व्हावा अशी अनेक रंगकर्मींची इच्छा असते. किंबहुना कित्येक रंगकर्मी शिवाजी मंदिरातच (shivaji mandir) आपल्या नाटकाचे उदघाटन करतात. कलाकारांसाठी शिवाजी मंदिर हे एखाद्या धार्मिक स्थळाइतकेच पवित्र आणि जिव्हाळ्याचे आहे.

परंतु करोनाचा (covid 19) (corona) प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर १४ मार्च २०२० रोजी हे नाट्यगृह बंद करण्यात आले. त्या दिवशी 'एका लग्नाची पुढची गोष्ट' या नाटकाचा प्रयोग होणार होता. तो रद्द करण्यात आला. पुढे नाट्यगृह बराच काळ बंद ठेवण्यात आले. वापरात नसल्याने नाट्यगृहातील रंगमंच, वातानुकूलित यंत्रणा आणि इतर बरीच डागडुजीची कामे निघाली. २ फेब्रुवारी २०२१ रोजी नाट्यगृहाच्या नूतनीकरणाचे काम सुरू झाले. परंतु लॉकडाउन असल्याने साहित्य आणि मजूर मिळण्यात अनेक अडचणी आल्या. त्यामुळे हे काम रखडत गेले. सध्या दुरुस्तीचे काम झाले असून तब्बल दोन वर्षांनी हे नाट्यगृह प्रेक्षकांसाठी सज्ज झाले आहे.

सध्या नाट्यगृहाला नवी झळाळी प्राप्त झाली असून कोपऱ्यातील खुर्च्यांवर बसणाऱ्या प्रेक्षकांना नाटक व्यवस्थित पाहता यावे म्हणून आवश्यक ते बदल करण्यात आले आहेत. तसेच ध्वनीव्यवस्थेचे आधुनिकीकरण करण्यात आले आहे. आता बाल्कनीतूनही कार्यक्रम व्यवस्थित पाहता येईल अशी व्यवस्था केली आहे. वातानुकूलित मेकअपरुप, रंगमंचाचे विस्तारीकरण, खुर्च्यांना नवे कव्हर, नवी प्रकाश व्यवस्था, अंतर्गत सजावट असे नाविन्यपूर्ण बदल करण्यात आले आहेत. या बदलामुळे आसनक्षमता दहाने कमी झाली आहे.

नाटक सुरु होणार असल्याने आता शिवाजी मंदिराबाहेर नाटकाच्या पाट्या झळकल्या आहेत. गेली दोन वर्षे प्रेक्षक याच दिवसाची वाट पाहत होते. या नाटकांच्या फलकांचे अनावरण सूत्रधार गोट्या सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच त्यांच्याच हस्ते श्रीफळ वाढवून नाटकांच्या बुकिंगचाही श्रीगणेशाही करण्यात आला. सुमारे २ वर्षे २ महिन्यांनंतर आज, २९ एप्रिलला हे नाट्यगृह पुन्हा खुले होणार होत आहे. प्रशांत दळवी लिखित आणि चंद्रकांत कुलकर्णी (chandrakant kulkarni) दिग्दर्शित 'संज्या छाया' या नाटकाने हा मखमली पडदा उघडणार आहे.

तर ३ मे रोजी नाट्यगृहाचा ५८ व्या वर्धापनदिनाचा कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. या वर्धापन सोहळ्यातही 'संज्या छाया' (sanjya chhaya) या नाटकाचा प्रयोग होणार आहे. या कार्यक्रमाला सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख (amit deshmukh), उद्योग आणि मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई (subhash desai) , उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत (uday samant) आणि अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.