मी तर मराठी मुलगी! 

shraddha kapoor
shraddha kapoor

बॉलीवूडची "आशिकी गर्ल' श्रद्धा कपूर चेतन भगत यांच्या कादंबरीवर आधारित "हाफ गर्लफ्रेंड' चित्रपटातून दमदार एन्ट्री घेतेय. मोहित सुरी दिग्दर्शित या चित्रपटात ती पहिल्यांदाच "इशकजादा' अर्जुन कपूरसोबत दिसणार आहे. त्यानिमित्ताने श्रद्धा कपूरचं मनोगत... 

मी पहिल्यांदाच एका गाजलेल्या कादंबरीवर आधारित चित्रपटात काम करतेय. "हाफ गर्लफ्रेंड' चित्रपटाचं शूट सुरू होण्यापूर्वी मी कादंबरी वाचलेली नव्हती; पण कादंबरी वाचायला नुकतीच सुरुवात केली होती. तेव्हाच मोहित सुरी यांनी सांगितलं की आता ही कादंबरी वाचू नकोस. चित्रपटाची पटकथा वाच. कारण चित्रपट कादंबरीप्रमाणे पटकथेच्या मागणीनुसार थोडेफार बदल केलेत. त्यामुळे काम करताना तू गोंधळून जाशील. त्यामुळे मी "हाफ गर्लफ्रेंड' कादंबरी वाचली नाही. "हाफ गर्लफ्रेंड' शीर्षक हे चित्रपटाबद्दल बरंच काही सांगून जाते.

मी चित्रपटात माधव (अर्जुन)ला सांगते की मी फक्त तुझी हाफ गर्लफ्रेंडच बनू शकते. कारण काही अडचणींमुळे किंवा काही कारणास्तव मी पूर्णपणे नाते निभावू शकत नाही. ही बाब आपल्या समाजात आणि आयुष्यात पूर्वीपासूनच पाहायला मिळतेय. त्यात काही नवीन नाही; पण त्या दृष्टिकोनातून आपणच कधी त्याकडे बघत नाही. हे माझ्याबाबतीतही घडलंय. मी कोणाला तरी पसंत केलंय; पण मी त्याची गर्लफ्रेंड बनू शकले नाही. कारण, मला वाटलं की चित्रपट व कामामध्ये व्यग्र असल्यामुळे मी जास्त वेळ देऊ शकणार नाही. असं बऱ्याच जणांसोबत घडत असतं. काही नाती अपूर्णच राहतात. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे; पण मी तुझी गर्लफ्रेंड बनू शकत नाही. हेच चित्रपटात दाखवलंय. यात मी रिया सोमानीची भूमिका साकारलीय. ती बास्केटबॉलपटू असते आणि ती दिल्लीतील एका श्रीमंत घरातील मुलगी आहे. तिच्याकडे पैसा, गाडी सगळं काही आहे. बाहेरून तिच्याबाबतीत खूप चांगलं चाललं आहे, असं वाटतं; पण आतून ती अजिबात खूश नाहीये. शाळेत असताना मी बास्केटबॉल खेळले आहे; पण चित्रपटासाठी मी बास्केटबॉलचं ट्रेनिंग घेतलं.

एनबीएच्या प्रशिक्षकांनी आम्हाला काही तंत्रं शिकवली आणि प्रशिक्षण दिलं. मी जवळपास पंधरा दिवसांत दोन-तीन तास प्रशिक्षण घेत होते. त्यामुळे या चित्रपटात चांगल्याप्रकारे भूमिका साकारू शकले. दिग्दर्शक मोहित सुरी नेहमीच मला पसंती देतात, असं बोललं जातं; पण मला त्याबद्दल खरंच माहीत नाही. तरीही त्यांनी मला "हाफ गर्लफ्रेंड' चित्रपटासाठी विचारलं नसतं, तर नक्कीच दु:ख झालं असतं. रेडिओवरील एका मुलाखतीत मोहित सुरींनी मी त्यांची प्रेरणा आहे, असं सांगितलं होतं. हे ऐकून मला खूप छान वाटलं. आम्ही एकमेकांना खूप चांगल्याप्रकारे समजतो. तसंच आमचे विचारही छान जुळतात. त्यांच्यासोबत काम करताना खूप समाधान मिळतं. अर्जुनबरोबर मी पहिल्यांदाच काम केलंय. त्याच्यासोबत काम करायला खूप मजा आली. तो खूप चांगला कलाकार आहे. त्याने वेळ काढून या चित्रपटातील भूमिकेची तयारी केली. बिहारी भाषेचे आणि बास्केटबॉलचे प्रशिक्षण घेतलं. या चित्रपटासाठी त्यानेही खूप मेहनत घेतलीय. "हाफ गर्लफ्रेंड' चित्रपटातील सगळीच गाणी खूप छान आहेत. माझी गाणं गाण्याची इच्छा होती; पण यात मी गाणं गायलेलं नाही. माझ्या कामाबद्दल मी नेहमी वडिलांना (शक्ती कपूर) विचारते आणि ते मला मनापासून खरीखुरी प्रतिक्रिया देतात. त्यामुळे त्यांनी दिलेल्या सल्ल्यांकडे मी गांभीर्याने पाहते आणि ते प्रत्यक्षात अमलात आणण्याचा प्रयत्न करते.

सध्या बॉलीवूडमध्ये स्त्रीकेंद्रित चित्रपट बनताहेत ही खूप चांगली बाब आहे. "क्वीन' असेल किंवा आता प्रदर्शित झालेला "बेगमजान' असे बरेच चित्रपट आहेत. आता मीही "हसीना द क्वीन ऑफ मुंबई' या चित्रपटात काम करतेय. अशा चित्रपटांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. माझं आडनाव कपूर आहे...

आम्ही पंजाबी आहोत; पण खरंतर मी मराठी मुलगी आहे. आमच्या घरापासून माझ्या आईचं माहेर खूपच जवळ आहे. त्यामुळे मी आजी-आजोबांकडे लहानाची मोठी झाले. मराठी चांगलं बोलू शकत नाही याची मला खंत वाटते; मात्र मी चांगलं मराठी बोलण्याचा प्रयत्न करीत असते. आता आजी-आजोबा नाहीत. त्यामुळे मराठीत बोलण्याची जास्त संधी मिळत नाही; पण आमच्या घरी महाराष्ट्रीयन स्टाफ आहे. त्यांच्याशी मी मराठीत बोलते. 

'ओके जानू' चित्रपटातील माझ्या "हम्मा हम्मा...' या गाण्यातील डान्ससाठी मला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. रसिकांचं भरभरून प्रेम मिळालं. त्यामुळे खूप छान वाटलं. मला डान्स करायला फार आवडतं. बॉलीवूडमध्ये माधुरी दीक्षित, श्रीदेवी, करिश्‍मा कपूर (दिल तो पागल है), ऐश्‍वर्या राय या माझ्या डान्स आयडॉल आहेत. हाफ गर्लफ्रेंड चित्रपटात नृत्य आणि गाण्यांची पर्वणी आहेच. मला खात्री आहे प्रेक्षकांना हा चित्रपट नक्कीच आवडेल... 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com