
सिद्धार्थने अभिनेत्री मिताली मयेकरशी नुकतीच लग्नगाठ बांधली. लग्नापूर्वी दोन वर्षे हे दोघं लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते
मराठी चित्रपटसृष्टीचा 'चॉकलेट बॉय' म्हणून अभिनेता सिद्धार्थ चांदेकरची ओळख आहे. अत्यंत मनमिळाऊ स्वभाव आणि कोणत्याही व्यक्तीशी कधीही वाद न घालणारा अभिनेता म्हणून त्याचं कौतुक केलं जातं. सिद्धार्थने अभिनेत्री मिताली मयेकरशी नुकतीच लग्नगाठ बांधली. लग्नापूर्वी दोन वर्षे हे दोघं लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. पण लग्न करणार म्हटल्यावर धडधड वाढतेय, अशा शब्दांत सिद्धार्थने त्याच्या भावना व्यक्त केल्या. अभिनेत्री सुरेखा तळवलकर यांच्या 'दिल के करीब' या चॅट शोमध्ये त्याने हजेरी लावली होती. या मुलाखतीत त्याने त्याच्या खासगी आयुष्याविषयी बऱ्याच गोष्टी मनमोकळेपणाने सांगितल्या.
लग्नाची तारीख जवळ आल्यावर मनात काय भावना आहेत असा प्रश्न सिद्धार्थला विचारला असता तो म्हणाला, "आता बॅचलर लाइफ संपली. आता एक व्यक्ती आयुष्याचा भाग म्हणून सदैव सोबत राहणार आहे. तसं आम्ही दोन वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहतच होतो. खरंतर लग्नानंतरही फार काही बदलणार नाहीये. फार फार तर घराचे पडदे बदलतील. पण मनातील भावना सगळ्या गोष्टी बदलून टाकतात. लग्नानंतर जबाबदारी वाढते, नाती जुळतात, दोन कुटुंब एकत्र येतात, असे शब्द कानी पडले की अजून धडधड वाढते."
हेही वाचा : 'तुम्ही एका ट्विटमुळे डगमगत असाल तर..'; तापसी पन्नूचा सणसणीत टोला
२०१८ मध्ये 'व्हॅलेंटाइन डे'ला सिद्धार्थने मितालीला प्रपोज केलं होतं. तेव्हापासून हे दोघं लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. त्यानंतर २०१९ मध्ये मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत सिद्धार्थ- मितालीचा साखरपुडा पार पडला. करोना महामारी आणि लॉकडाउनमुळे त्यांनी लग्नाची तारीख पुढे ढकलली होती. २४ जानेवारी २०२१ रोजी या दोघांनी लग्नगाठ बांधत आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली.