एका फक्कड प्रयोगाची अनुभूती 'नटरंग'ने दिली

संभाजी गंडमाळे
सोमवार, 18 नोव्हेंबर 2019

स्पर्धेच्या दुसऱ्याच दिवशी आनंद यादव यांच्या कादंबरीवर आधारित "नटरंग' या प्रयोगाने रसिक अक्षरशः दंग झाले. एका फक्कड खेळाची अनुभूती यानिमित्तानं मिळाली.

कोल्हापूर - राज्य नाट्यस्पर्धेच्या दुसऱ्याच दिवशी आनंद यादव यांच्या कादंबरीवर आधारित "नटरंग' या प्रयोगाने रसिक अक्षरशः दंग झाले. एका फक्कड खेळाची अनुभूती यानिमित्तानं मिळाली. वसुंधरा सामाजिक कौशल्य विकास संस्थेच्या बॅनरखाली या नाटकाचा प्रयोग रंगला. मात्र, प्रयोग सादर करणारा संघ देवरूखचा होता आणि गेल्या वर्षी हाच प्रयोग त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत रत्नागिरी केंद्रावर सादर केला होता. असे असले तरी रसिकांना मात्र एक सुंदर खेळ अनुभवता आला.

 दहा वर्षांपूर्वी पडद्यावर झळकलेल्या 'नटरंग' चित्रपटाने केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर जगभरातल्या मराठी मुलखात अक्षरशः खचाखच गर्दी खेचली. अभिनेता अतुल कुलकर्णी यांच्या गुणा कागलकरनं तर साऱ्यांनाच भुरळ घातली. आनंद यादव यांच्या कादंबरीवर आधारित हा संगीतप्रधान चित्रपट; मात्र त्याची नाट्यानुभूती यंदाच्या स्पर्धेच्या निमित्तानं घेता आली. गुणा कागलकरच्या कलासंघर्षाची ही कथा. अर्थात सारं नाटक गावगाड्यात घडतं. चित्रपट आणि नाटक ही माध्यमे वेगवेगळी. साहजिकच नाटकाला पूरक काही प्रसंग आणि आवश्‍यक ते बदल होतेच; पण एकापाठोपाठ एक घडत जाणारे प्रसंग आणि ढोलकीच्या साथीनं प्रसंगानुरूप येणाऱ्या लावण्यांसह ध्वनी-प्रकाशाचा सुंदर मिलाफ साधत वेगानं हे नाटक पुढं सरकतं. सळसळत्या ऊर्जेचे उमदे कलाकार आणि त्यांनी साकारलेल्या आपापल्या भूमिका चोखच ठरल्या. संहितेतील काही इरसाल शब्द तर अगदी बेधडकपणे वापरले गेले. याबाबत प्रत्येकाची मतं वेगळी असू शकतात; मात्र एकूणच एका फक्कड प्रयोगाची अनुभूती "नटरंग'ने दिली. 

‘थिंक पॉईंट’ नाटकात घेतलाय या प्रश्नांचा वेध 

स्पर्धेचे निकष काय सांगतात? 

सांस्कृतिक कार्य संचालनालयाने स्पर्धेची केंद्रनिहाय रचना करताना त्या त्या जिल्ह्यासाठी आणि काही अपवादात्मक परिस्थितीत इतर जिल्ह्यातील संघांचा विचार आवर्जून केला आहे. यंदा कोल्हापूरबरोबरच रत्नागिरी केंद्रावरही प्राथमिक फेरी रंगणार आहे. गेल्या वर्षी याच केंद्रावर संगमेश्‍वर तालुका सांस्कृतिक कला मंच या संस्थेच्या माध्यमातून "नटरंग'चा प्रयोग सादर झाला आणि यंदा हाच प्रयोग कोल्हापूर केंद्रावर सादर करताना स्थानिक संस्थेच्या बॅनरचा वापर केला. स्पर्धेत नाटक सादर करणाऱ्या संस्थेची अधिकृत नोंदणी असावी लागते. नियम म्हणून त्याचे पालन झालेच पाहिजे; पण एकाच संस्थेने दोन-दोन केंद्रांवर दोन बॅनर घेऊन सहभागी व्हावे का, असा सवाल यंदाच्या स्पर्धेच्या निमित्ताने पुन्हा उपस्थित होऊ लागला आहे. कोल्हापूर केंद्रावर यापूर्वी असाच प्रयत्न पुण्यातील काही संस्थांनीही केला होता. 

पात्र परिचय... 

सुधीर सावंत (गुणा), रूपाली सावंत (दारकी), संजय सावंत (म्हातारा, माने), वैदेही सावंत (म्हातारी, पत्रकार), लुब्धा सावंत (दया), गौरव कनावजे (राजा), संजय नटे (सासरा), सुरेश कदम (मुख्यमंत्री), महेश चव्हाण (इशन्या), अगस्ती कुमठेकर (किसन्या), प्रशांत धामणस्कर (शंकर), मनीष कदम (वशा), जगदीश गोरुले (धामुड्या), समीर महाडिक (मारुती), रोहित मोर्डेकर (नाना), प्रथमेश गुढेकर (दादू), कुमार भजनावले (पांडबा), रोहन सावंत (दिन्या, सकपाळ), विजय जाधव (पातरे-निवेदक), तेजश्री मुळ्ये (यमुनाबाई), अश्‍विनी कनावजे (नयना), सानिका सावंत (शोभना), साक्षी सावंत (चंदा), पूजा कदम (मंदा), संजय भडेकर (मुकादम), क्षितिज जाधव (चहावाला). 

 लेखक - विलास पडळकर 
 दिग्दर्शक - संजय सावंत 
 सूत्रधार - वैदेही सावंत 
 संगीत - आनंद लिंगायत 
 ढोलकी - संदेश पारधी 
 पार्श्‍वगायिका - सायली सावंत 
 नेपथ्य - संजय सावंत 
 प्रकाश योजना - सुनील मेस्त्री 
 नृत्य दिग्दर्शक - नीलेश वाडकर 
 विशेष साहाय्य - दिलीप गवंडी 

आज रंगणार "वारणेचा वाघ' प्रयोग 
स्पर्धेत आज (सोमवारी) सादळे येथील सिद्धेश्‍वर सहकारी दूध संस्थेचा संघ हरिश्‍चंद्र पाटील लिखित "वारणेचा वाघ' हा प्रयोग सादर करणार आहे. नाना पाटील यांचे दिग्दर्शन आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आजही अतिशय लोकप्रिय असलेले अस्सल ग्रामीण ढंगातील हे नाटक असून, गावगाड्यातील कलाकारांना अजूनही अशा नाटकांची भुरळ आहे. संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात सायंकाळी सातला हा प्रयोग होईल. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In State Drama Competition Auditions Was Enjoyed Natrang Show