राज्य नाट्य स्पर्धाः सहा नव्या संघांची दमदार एंट्री..!

राज्य नाट्य स्पर्धाः सहा नव्या संघांची दमदार एंट्री..!

कोल्हापूर - शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे होणाऱ्या हौशी राज्य नाट्य स्पर्धेला गेल्या तीन-चार वर्षांत सहभागी संघांसह प्रेक्षकांचाही मोठा प्रतिसाद मिळतो आहे. गुरुवार (ता. १५)पासून राज्यभरातील १९ केंद्रांवर स्पर्धेची प्राथमिक फेरी रंगणार असून, येथील केंद्रावर यंदा २४ संघांचा सहभाग आहे. त्यातही सहा नवे संघ यंदा दमदार एंट्री करणार आहेत. 

दरम्यान, राज्यातील प्रत्येक केंद्रावर किमान १५ ते २५ संघांचा सहभाग असेल. साहजिकच, सुमारे पाच ते सहा हजारांवर कलाकार व तंत्रज्ञांचा आविष्कार स्पर्धेच्या निमित्ताने अनुभवायला मिळणार आहे.  हौशी राज्य नाट्य स्पर्धा म्हणजे हौशी कलाकारांसाठीचे हक्काचे व्यासपीठ. ही स्पर्धा जरी असली तरी यानिमित्त हौशी कलाकारांकडून आपली कला सादर करण्यासाठीचे प्रामाणिक प्रयत्न होत असतात. कोल्हापूर केंद्राचाच विचार केल्यास पूर्वी दहा ते पंधरा संघांचा सहभाग असायचा. पण, आता किमान २५ प्रवेशिका या केंद्रावर हमखास येतात. किमान महिनाभर तीन पिढ्यांचा हा नाट्यजल्लोष सुरू राहणार आहे. राज्यातील सर्व केंद्रांच्या तुलनेत येथील केंद्रासह सांगली, कल्याण, पिंपरी-चिंचवड,  पुणे आणि मुंबई केंद्रावर यंदाही सर्वाधिक प्रयोग होणार आहेत. 

लोकल टू ग्लोबल..!
स्पर्धा हौशी कलाकारांची असली तरी यानिमित्त ‘लोकल टू ग्लोबल’ नाटकांची अनुभूती घेता येणार आहे. स्पर्धेत नव्याच संहिता असायला हव्यात, अशी अपेक्षा असली तरी जगभर गाजलेल्या कलाकृती यानिमित्त नव्या पिढीसमोर येणार आहेत. येथील केंद्रावरील स्पर्धेचा प्रारंभच फ्रेंच कादंबरीकार व प्रसिद्ध नाटककार अल्बर्ट कामू यांच्या ‘कॅलिगुला’ या नाटकाने होणार आहे. अभिरुची नाट्य संस्था हे नाटक घेऊन स्पर्धेत उतरली आहे. जितेंद्र देशपांडे यांनी नाटकाचा अनुवाद केला. भुयेवाडी (ता. करवीर) येथील संस्कार बहुउद्देशीय संस्था यंदा स्पर्धेत असून, अस्सल ग्रामीण बाज असलेला ‘हॅलो मी चेअरमन बोलतोय’ हा प्रयोग सादर करणार आहे. एकूणच, ‘लोकल टू ग्लोबल’ रंगभूमीवरील विविध प्रवाह स्पर्धेतून अनुभवायला मिळणार आहेत.  

कोल्हापूर केंद्र तीन-चार वर्षांत सर्वाधिक प्रेक्षकांचा सहभाग असलेले केंद्र ठरले आहे. यंदाही स्पर्धेत किमान २४ संघांचा सहभाग आहे. सायंकाळी सातला प्रयोगाची संकल्पना कोल्हापूरकरांनी यशस्वी केली आहे. 
- मिलिंद अष्टेकर,
स्थानिक समन्वयक 

दृष्टिक्षेपात स्पर्धा...
सहभागी संस्था २४
सहभागी कलाकार-तंत्रज्ञ ५५०
तरुणाईचा सहभाग ६५ टक्के

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com