दिल, दोस्ती : जोडी हरहुन्नरी कलाकारांची!

अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड मनोरंजन सृष्टीतील टॅलेंटेड अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेत तिनं साकारलेल्या येसूबाईंच्या भूमिकेचं आजही प्रेक्षक कौतुक करतात.
दिल, दोस्ती : जोडी हरहुन्नरी कलाकारांची!
Summary

अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड मनोरंजन सृष्टीतील टॅलेंटेड अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेत तिनं साकारलेल्या येसूबाईंच्या भूमिकेचं आजही प्रेक्षक कौतुक करतात.

- सुमीत पुसावळे, प्राजक्ता गायकवाड

अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड मनोरंजन सृष्टीतील टॅलेंटेड अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेत तिनं साकारलेल्या येसूबाईंच्या भूमिकेचं आजही प्रेक्षक कौतुक करतात. सध्या ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ या मालिकेत बाळूमामांची भूमिका साकारात प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळवत असलेल्या अभिनेता सुमीत पुसावळेनं ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेत छत्रपती शिवाजी महाराजांचे जावई हरजीराजे महाडीक यांची भूमिका साकारली. एकाच मालिकेत काम करत असताना या दोघांची चांगली मैत्री झाली.

प्राजक्ता म्हणाली, ‘‘सुमीतनं ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेत उत्तमप्रकारे भूमिका साकारली. एक सहकलाकार म्हणून तो बेस्ट आहे. त्या मालिकेत एकत्र काम करताना आम्ही आमचा प्रत्येक सीन शूट करणं एन्जॉय केलं. ऑफस्क्रीनही आमची खूप मजा मस्ती चालायची. आताही त्याचं ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ या मालिकेतलं काम मी बघते आणि मला ते खूप आवडतं. सगळ्या प्रेक्षकांप्रमाणं मीही त्याची फॅन आहे. त्याची पर्सनॅलिटी फार छान आहे, तो ऑल राउंडर आहे. सध्या तो बाळूमामांच्या भूमिकेत आपल्या भेटीला येत असला, तरी सोशल मीडियावर त्याचे डॅशिंग अंदाजातले फोटो तो शेअर करत असतो. त्यामुळं त्याची वेगळी बाजूही प्रेक्षकांसमोर येत असते. त्याचा स्वभावही खूप छान आहे. तो अतिशय कूल आहे. तो त्याचं काम अगदी मनापासून आणि मेहनत घेऊन करतो, पण त्याचा ताण येऊ देत नाही. कितीही कठीण प्रसंग असला तरी शांतपणे आणि प्रत्येक गोष्टीचा सर्व बाजूनं विचार करून तो निर्णय घेतो. त्याचा हा गुण मला अतिशय आवडतो. त्याच्या बोलण्यानं सगळ्यांना तो पटकन आपलेसं करतो. कोणातही तो भेदभाव करत नाही. तो जितका चांगला कलाकार आहे तितकाच चांगला माणूस आहे.’’

सुमीतनं सांगितलं, ‘‘माझी ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेत एंट्री होण्याआधीही आमच्या घरी सगळेजण ही मालिका आवडीनं बघायचे. या मालिकेतलं प्राजक्ताचं काम आमच्या घरी सगळ्यांना आवडायचं. या मालिकेच्या सेटवर आम्ही पहिल्यांदा भेटल्यावर प्राजक्ता आपणहून माझ्याशी आधी बोलायला आली. तिनं माझ्या भूमिकेबद्दल मला विचारलं. तिचं बोलणं इतकं आपुलकीचं होतं, की आम्ही पहिल्यांदा भेटत आहोत हे मला जाणवलंच नाही. ती कायम हसतमुख असते. तिच्याकडं नुसतं पाहिल्यानं आपल्याला सकारात्मकता जाणवते. ती खूप प्रामाणिक, प्रेमळ आणि मनमिळाऊ आहे. ‘मी सेलिब्रिटी आहे,’ याचा तिला किंचितही गर्व नाही. तिच्या फॅन्सशी ती खूप छान प्रकारे कनेक्टेड असते. बाहेर कुठं गेल्यावर अनेकदा तिचे फॅन्स तिच्याशी बोलायला, तिच्याबरोबर फोटो काढायला येतात; त्या सगळ्यांशी ती खूप नम्रपणे आणि आपुलकीने बोलते. कामाच्या बाबतीत ती अत्यंत मेहनती आहे. ती फार डेडिकेशनने प्रत्येक भूमिका साकारते. तिने साकारलेल्या सगळ्याच भूमिका मला आवडल्या, पण ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेतलं तिचं काम मला विशेष भावलं. त्या भूमिकेसाठी तिनं खूप मेहनत घेतली होती. त्यासाठी ती घोडेस्वारी आणि शस्त्रास्त्र चालवायलाही शिकली. ती वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारून नेहमी स्वतःला आव्हानं देत असते आणि ती त्यात यशस्वीही होते. तिच्याकडं बघून मलाही नेहमी असं वाटतं, की आपणही स्वतःला असं चॅलेंज करत राहावं. ती एक हरहुन्नरी कलाकार असल्यानं भविष्यातही ती उत्तमोत्तम भूमिका साकारेल.’’

(शब्दांकन : राजसी वैद्य)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com