
यापूर्वीही मिर्झापुर मालिकेच्या विरोधात उत्तर प्रदेशातील न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्या भागात राहणा-या अरविंद चतुर्वेदी यांनी ही याचिका दाखल केली.
मुंबई - ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रसिध्द होणा-या वेबसीरिजचे काही खरे नाही असे सध्या दिसते आहे. गेल्या काही दिवसांपासून तांडव मालिकेवरुन सुरु झालेला वाद शमलेला नाही. त्यात पुन्हा गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या मिर्झापूर मालिकेच्या निर्माते आणि दिग्दर्शक यांना कोर्टाची पायरी चढावी लागणार आहे. विशेष म्हणजे प्रेक्षकांमध्ये ही मालिका कमालीची लोकप्रिय झाली होती. त्याला चांगला प्रतिसादही मिळाला होता.
यापूर्वीही मिर्झापुर मालिकेच्या विरोधात उत्तर प्रदेशातील न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्या भागात राहणा-या अरविंद चतुर्वेदी यांनी ही याचिका दाखल केली. त्यात त्यांनी असे म्हटले होते की, मिर्झापुर मालिकेच्या माध्यमातून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. तसेच मालिकेमुळे सामाजिक वातावरण दुषित झाले आहे. आता सर्वोच्च न्यायालयानंही मिर्झापुरच्या निर्मात्यांना फटकारले असून त्यांच्याकडे उत्तर मागितले आहे. त्यांना एक नोटीस पाठवण्यात आली असून त्यावर त्यांनी तातडीनं आपलं उत्तर पाठवावं असे म्हटले आहे. मिर्झापुर ही मालिका अॅमेझॉन प्राईमवर प्रदर्शित झाली होती. सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली ही याचिका मिर्झापुर गावातील एका व्यक्तीनं केली आहे. त्यात याचिकाकर्त्यानं ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेल्या या मालिकेतील आक्षेपार्ह भाग वगळण्याची मागणी केली आहे.
याचिकाकर्ता एस के कुमार यांनी सांगितले की, मिर्झापुर मालिकेत त्या शहराला आतंकवादी शहर असे म्हणून सादर करण्यात आले आहे. यामुळे त्या शहराची प्रतिमा मलिन झाली आहे. हिंसक स्वरुपाच्या कारवाया सतत मिर्झापुरमध्ये होत आहेत असे चित्र निर्माण करण्यात आले आहे. त्यामुळे उत्तर प्रदेश राज्याची प्रतिमा अराजकतामय दाखविण्यात आली आहे. यावर मुख्य न्यायाधीश शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखाली असणा-या खंडपीठाने मिर्झापुरच्या निर्माते आणि दिग्दर्शक यांना नोटीस पाठवून त्यांच्याकडून उत्तर मागवले आहे.
अजय देवगणची 'थँक गॉड' ची तयारी, मधुर, तुषार कपूरच्या चित्रपटांची घोषणा
मिर्झापुरच्या एका पोलीस ठाण्यात मिर्झापुरचे दिग्दर्शक, निर्माते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी युपीचे तीन पोलीस अधिकारी बुधवारी मुंबईत आले होते. मालिकेचे निर्माते रितेश साधवानी, फरहान अख्तर आणि भौमिक गोंडालिया यांची चौकशी करणार आहे.