
'Jai Bhim' पुन्हा कायद्याच्या कचाट्यात, आता साऊथ स्टार सूर्याच्या विरोधात FIR
Jai Bhim: गेल्या वर्षी रिलीज झालेल्या जय भीम (Jai Bhim)सिनेमाच्या अडचणी काही कमी व्हायचं नाव घेत नाहीयत. २ नोव्हेंबर २०२१ रोजी अॅमेझोन प्राइमवर रिलीज झालेला हा सिनेमा पुन्हा कायद्याच्या कचाट्यात अडकला आहे. चेन्नई पोलिसांनी आता या सिनेमावर कथा चोरल्याचा आरोप लावत दिग्दर्शक टीजे ज्ञानवेल सोबतच निर्माती ज्योतिका आणि तिचा पती सुपरस्टार सुर्या विरोधात FIR दाखल केली आहे. हाती आलेल्या वृत्तानुसार कळत आहे की,एका व्यक्तीनं कॉपीराईट्सच्या अॅक्ट अंतर्गत जय भीमच्या निर्माते-दिग्दर्शकांविरोधात तक्रार दाखल केली आहे.(Suriya Starrer Jai bhim lands into legal trouble chennai police files fir against makers under copyright act)
मीडियाला मिळालेल्या माहितीनुसार, जय भीम सिनेमाचा दिग्दर्शक टीजे ज्ञानवेल आणि प्रॉडक्शन हाऊस २ डी एंटरटेन्मेंटच्या विरोधात चेन्नईच्या शास्त्री नगर पोलिस स्टेशनमध्ये 63(A) कॉपीराइट अॅक्ट अंतर्गत एफआयआर दाखल केली गेली आहे. ही तक्रार वी कुलंजियाप्पनने दाखल केली आहे,कारण सिनेमात त्याच्याशी संबंधित असलेली व्यक्तिरेखा दाखवली गेली होती. तक्रारीत निर्मात्यांवर आरोप लावला गेला आहे की,''जय भीमच्या मेकर्सनी माझी कथा चोरली आहे. कारण निर्मात्यांनी वचन दिलं होतं की ते माझ्या कथेच्या बदल्यात रॉयल्टी देतील पण त्यांनी तसं काहीच केलं नाही''.
तक्रारदाराने दावा केला आहे की २०१९ साली दिग्दर्शकाने त्याची भेट घेतली होती आणि रॉयल्टी म्हणून ५० लाख रुपये आणि सिनेमाच्या नफ्यातील शेअर देण्याचं कबूल केलं होतं. पण जेव्हा हा सिनेमा हिट झाला आणि लोकांनी पसंत केला तेव्हा मेकर्सनी त्याला काहीच दिलं नाही. जय भीम हा सिनेमा याआधी देखील वन्नियार समाजाच्या भावना दुखावल्यानं वादात फसला होता. अनेक महिने कायद्याची लढाई लढल्यानंतर काही दिवसांपूर्वीच जय भीम स्टार सूर्या,निर्माती ज्योतिका आणि दिग्दर्शक ज्ञानवेलच्या विरोधात सुरु असलेल्या केसमधून मद्रास हायकोर्टानं त्यांची सुटका केली आहे.
सिनेमाच्या टीमला एक कायदेशाीर नोटीस पाठवून काही सीन त्यातून वगळण्याबाबतही सांगण्यात आलं होतं. इतकंच नाहीतर ५ करोड रुपये नुकसान भरपाईची देखील मागणी झाली होती. जय भीमचं कथानक तामिळनाडूमधील एका समाजाविरोधातील भेदभावावर आधारित आहे. बोललं जातं की ही कथा १९९३ मधील एका सत्य घटनेपासून प्रेरित आहे. तेव्हा काही आदिवासी लोकांना अटकही करण्यात आली होती. आणि पोलिसांकडून त्यांचे खूप हालही तेव्हा करण्यात आले होते. सूर्या या सिनेमात वकील चंद्रूच्या भूमिकेत दिसला होता, जो कोर्टात आदिवासींची केस लढताना दिसतो आणि त्यांना सोडवण्यासाठी मदत करतो. सूर्या व्यतिरिक्त लिजोमोल जोस,मणिकंदन,राजिशा विजयन,प्रकाश राज आणि राव रमेश यांच्या देखील सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.