'सुशांत उपचारांदरम्यान रडायचा, त्याला आत्महत्येचे विचार येत होते' सुशांतच्या डॉक्टरचा दावा

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Thursday, 3 September 2020

सुशांतला त्याच्या आजारापणाची माहिती होती मात्र तो हे स्विकारु शकत नव्हता. तो औषधं आणि उपचारही वेळेवर घेत नव्हता. उपचारांदरम्यान तो रडायला लागायचा.

मुंबई- सुशांत सिंह राजपूतवर उपचार करणा-या डॉ. सुजैन वॉकर यांनी मुंबई पोलिसांना दिलेला जबाब आता समोर आला आहे. या जबाबातून सुशांतच्या मृत्युआधी त्याची मानसिक स्थिती कशी होती आणि सुशांतच्या मृत्युचं कारण काय असू शकतं याचा अंदाज लावता येऊ शकतो.

हे ही वाचा: बिग बॉसच्या घरामध्ये घुमणार 'राधे राधे'चा गजर

सुशांत मृत्यु प्रकरणात मानसोपचारतज्ज्ञ डॉ. सुजैन वॉकर यांची सीबीआय चौकशी करत आहे. मात्र सुजैन यांनी मुंबई पोलिसांना १६ जुलै रोजी जो जबाब दिलो होता ती माहिती आता समोर आली आहे. मुंबई पोलिसांना दिलेल्या जबाबात त्यांनी म्हटलं आहे की, 'सुशांतने सांगितलं होतं की त्याच्या आईचा मृत्यु हा पॅनिक अटॅकमुळे झाला होता. तो त्याच्या आईच्या खूप जवळ होता. तेवढा तो वडिलांशी नव्हता. आई गेल्यानंतर तो त्याच्या बहीणींच्या खूप जवळ आला होता. मात्र एक गोष्ट स्पष्ट होती की तो बायपोलर डिसऑर्डरमधून जात होता. सुशांतला त्याच्या आजारापणाची माहिती होती मात्र तो हे स्विकारु शकत नव्हता. तो औषधं आणि उपचारही वेळेवर घेत नव्हता. उपचारांदरम्यान तो रडायला लागायचा. रडल्यानंतर त्याला स्वतः विषयीच खूप नकारात्मक जाणवायचं.' 

डॉ. वॉकर यांच्या जबाबानुसार, 'सुशांतचा बायपोलर डिसऑर्डर खूप जास्त प्रमाणात वाढला होता. आणि सुशांतला वाटत होतं की तो आता यातून कधीच बरा होणार नाही. त्याला असं वाटत होतं की तो यातून कधीच बाहेर येऊ शकणार नाही आणि त्यामुळे त्याला वाटत होतं की कुटुंबाला हे भोगावं लागू नये. त्याने कदाचित त्याच्या रिसॉर्टमध्ये बसून अंतिम निर्णय घेतला असावा. तो अंतराळ, खगोलशास्त्र याबद्दल बोलायचा. त्याची बोलण्याची पद्धत खूप वेगळी आणि फास्ट होती त्यामुळे मला कळालं की तो बायपोलर डिसऑर्डरमधून जातोय. इतकंच नाही तर त्यांनी सांगितलं की मला कळालं की गेल्या २० वर्षांपासून तो या आजाराच्या लक्षणांचा सामना करत आहे.

सुशांतने स्वतः वॉकर यांना तो अगदी तरुण असल्यापासून यातून जात असल्याचं सांगितलं होतं. हीच लक्षणं त्याला २०१३-१४च्या दरम्यान जाणवली होती. दरवेळी त्याची ही लक्षणं पहिल्यापेक्षा जास्त वाढत चालली होती.' वॉकर यांनी सांगितलं की 'बायपोलर डिसऑर्डर हा एक असा आजार आहे ज्यामध्ये वायफल खर्च करणं, चार-पाच दिवस झोप न येणं, सगळं काही गमवण्याची भिती आणि सगळं लवकर लवकर करण्याची इच्छा अशा गोष्टी होतात. सुशांतने सांगितलं होतं की त्याला १ मिनिटांचा वेळ देखील काही दिवसांसारखा वाटायचा आणि तो जास्त घाबरायला लागायचा.'

डॉ. वॉकर यांनी त्यांच्या जबाबात सांगितलं होतं की, 'सुशांतला जर बरं वाटलं की तो औषधं घेणं बंद करायचा. या आजाराविषयी त्याने खूप अभ्यास केला होता, वाचलं होतं. मी त्याला सांगितलं होतं की तो बरा होईल मात्र त्याला ते खरं वाटायचं नाही. त्याने औषधं घेणं बंद केल्याने त्याच्या आजार वाढत गेला. ज्यावेळी मला कळालं की त्याने आत्महत्या केली आहे तेव्हा मी हाच विचार केला की त्याला त्याच्या कुटुंबाला त्रास होऊ द्यायचा नव्हता म्हणून त्याने स्वतःचा जीव घेतला.'

या सगळ्यात वॉकर यांनी हे सुद्धा म्हटलं होतं की रिया चक्रवर्ती त्याला या आजापणातून बाहेर काढण्यासाठी खूप मदत करत होती. तीनेच माझी अपॉईंटमेटं घेऊन त्याच्यावर लवकर उपचार व्हावेत यासाठी प्रयत्न करत होती. तसंच तो औषधं घेतो की नाही याबद्दलही वॉकर यांना ती कळवायची.    

sushant singh rajput dr suzanne walker exclusive statement given to mumbai police  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sushant singh rajput dr suzanne walker exclusive statement given to mumbai police