esakal | मदतकार्यात सुष्मिताचा खारीचा वाटा; उपलब्ध करून दिले ऑक्सिजन सिलेंडर्स

बोलून बातमी शोधा

Sushmita Sen
मदतकार्यात सुष्मिताचा खारीचा वाटा; उपलब्ध करून दिले ऑक्सिजन सिलेंडर्स
sakal_logo
By
स्वाती वेमूल

देशभरात कोरोनाचा वेगाने फैलाव होत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे उपलब्ध वैद्यकीय सुविधाही अपुऱ्या पडू लागल्या आहेत. अनेक ठिकाणी बेड्स, ऑक्सिजन यांची कमतरता भासू लागली आहे. मनोरंजन विश्वातील सेलिब्रिटींपासून इतरही अनेकजण आपापल्या परीने मदतीचा हात पुढे करत आहेत. अभिनेत्री सुष्मिता सेननेही अशीच मदत केली आहे. दिल्लीतल्या एका रुग्णालयात ऑक्सिजनचा तुडवटा असल्याचं सुष्मिताला ट्विटरच्या माध्यमातून समजलं. त्यासाठी तिने काही ऑक्सिजन सिलेंडर्सची व्यवस्था केल्याचं ट्विटरवर सांगितलं. मात्र ते सिलेंडर्स मुंबईहून दिल्लीला नेण्यासाठी तिच्याकडे कोणताच पर्याय उपलब्ध नव्हता. यासाठी तिने चाहत्यांना ही सोय उपलब्ध करून देण्याचं आवाहन केलं.

'हे खरंच काळीज पिळवटून टाकणारं आहे. सगळीकडे ऑक्सिजनची कमतरता भासतेय. मी काही ऑक्सिजन सिलेंडर्स उपलब्ध केले आहेत. पण त्यांना मुंबईतून दिल्लीत पोहोचवण्याची व्यवस्था नाही. काही मार्ग असेल तर मला सांगा,' असं ट्विट सुष्मिताने केलं. नेटकऱ्यांनी तिला अनेक मार्ग सुचवले. मात्र काहींनी तिला ट्रोलसुद्धा केलं. मुंबईतही ऑक्सिजनचा तुडवटा असताना दिल्लीसाठी सिलेंडर्स का पाठवत आहे, असा सवाल तिला एका नेटकऱ्याने केला.

हेही वाचा : 'रिकामी घरे, बंगले, हॉल, गाळे कोरोना रुग्णांसाठी द्या'; भरत जाधवचं आवाहन

संबंधित युझरला सुष्मिताने ट्विट करत उत्तर दिलं. 'मुंबईत अजूनही ऑक्सिजनचा साठा उपलब्ध आहे. म्हणूनच मला सिलेंडर्स मिळू शकले. सध्या दिल्लीला ऑक्सिजनची गरज आहे, विशेषकरून छोट्या रुग्णालयांमध्ये त्याची फार गरज आहे. त्यामुळे तुम्हाला शक्य असल्यास मदत करा', असं तिने लिहिलं.