दोघात आली तिसरी; सुव्रत-सखीने सांगितली आनंदाची बातमी 

सकाळ ऑनलाइन
Friday, 26 February 2021

व्हिडीओ पोस्ट करत सुव्रतने व्यक्त केला आनंद

अभिनेता सुव्रत जोशी व त्याची पत्नी सखी गोखले यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांना आनंदाची बातमी सांगितली. 'आमच्या दोघांमध्ये तिसरी आली', असं म्हणत सुव्रतने हा व्हिडीओ शेअर केला आहे आणि त्याचसोबत भलीमोठी पोस्टसुद्धा लिहिली आहे. या दोघांनी मिळून नवीन कार खरेदी केली असून त्याचाच आनंद सुव्रत-सखीने चाहत्यांसोबत शेअर केला आहे. '१९९६ मध्ये कार घेण्याचं माझ्या आईचं स्वप्न होतं. आता २५ वर्षांनंतर तिचं स्वप्न सत्यात उतरलं आहे', असं सुव्रतने या पोस्टच्या सुरुवातीला लिहिलं. यासोबतच गाडी घेण्यामागचं कारणसुद्धा त्याने सांगितलं. 

'अनेक वर्षे गाडी न घेता राहण्याचा प्रयत्न केला पण पब्लिक ट्रान्सपोर्टवर अवलंबून राहणं शक्य झालं नाही. पुन्हा विजेवर चालणारी गाडी घेतली तर त्याला पूरक अशा साधन यंत्रणा भारतात अजून तरी उपलब्ध नाहीत. शेवटी मी पेट्रोलवर चालणारी गाडी घेतली. मग माझ्या समाधानासाठी मी एक गोष्ट केली. मी माझ्या गाडीचे एनर्जी ऑडिट करून घेतले. मी साधारण गाडी किती वापरणार याचा अंदाज बांधून मी किती धूर हवेत सोडणार हे काही तज्ज्ञांकडून समजून घेतले. तो धूर शोषून घ्यायला पुढच्या ५-६ वर्षात साधारण शंभरेक झाडे लावायचा मानस आहे. काल त्याची सुरूवात म्हणून गाडीचे पेढे वाटण्याआधी काही वृक्ष लावायला म्हणून एक रक्कम प्रदान केली आहे. असेच दर सहा महिन्याला घडावे अशी इच्छा आहे. मग ही झाडं मी गाडी वापरायची थांबवल्यावरही धूर शोषत राहतील. तुम्हाला ही कल्पना आवडली असल्यास, मी तर म्हणेन ही नव्या युगाची परंपरा म्हणून आपण अध्यरुत करूया. दरवेळी नवीन गाडी घेतली की पुढची काही एक वर्षे आपण झाडे लावायची. आपला धूर आपणच शोषून घ्यायचा. अर्थात हे थोडे तज्ज्ञांच्या सल्ल्याने व्हायला हवे म्हणजे त्याचा पुरेपूर फायदा होईल. अन्यथा चुकीची वृक्षलागवड केल्याने तोटाही होऊ शकतो. असो. तुमच्या प्रेमाबद्दल धन्यवाद. आपण फक्त ऐहिक यशावर स्वतःचे मूल्यमापन करू नये पण तरी माझ्यासारख्या मध्यमवर्गीय मुलाला अशा गोष्टी आयुष्यात आल्यावर आनंद होतोच,' अशी पोस्ट लिहित सुव्रतने हा आनंद व्यक्त केला. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sula (@suvratjoshi)

हेही वाचा : इंडस्ट्रीतला नवरा नको गं बाई!

प्रार्थना बेहरे, भाग्यश्री लिमये, सायली संजीव, मिथिला पालकर, सुयश टिळक यांसारख्या सेलिब्रिटींनी कमेंट करत सुव्रत व सखीला शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचसोबत सुव्रतच्या या नवीन कल्पनेचं नेटकऱ्यांनीसुद्धा स्वागत केलं. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: suvrat joshi and sakhi gokhale says a third one arrived between us two