तीन आठवड्यांत 'टकाटक'ने कमावला पंधरा कोटींचा गल्ला

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 जुलै 2019

-  ‘टकाटक’च्या उत्पन्नाचे आकडे पाहिले असता गेल्या सहामाहीतील तो सर्वाधिक कमाईचा ठरला.

- नवोदित कलाकार आणि कमी बजेटमध्ये बनवण्यात आलेल्या चित्रपटाने घसघशीत कमाई केली.

‘भाई’ आणि ‘ठाकरे’ मागे पडले वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजेच ४ जानेवारीला प्रदर्शित झालेला ‘भाई ः व्यक्ती की वल्ली’, ‘ठाकरे’ आणि ‘आनंदी गोपाळ’ सर्वात यशस्वी चित्रपट ठरले. ‘मिस यू मिस्टर’, ‘मोगरा फुलला’ आदी चित्रपटांनीही चांगला व्यवसाय केला. ‘टकाटक’च्या उत्पन्नाचे आकडे पाहिले असता गेल्या सहामाहीतील तो सर्वाधिक कमाईचा ठरला. नवोदित कलाकार आणि कमी बजेटमध्ये बनवण्यात आलेल्या चित्रपटाने घसघशीत कमाई केली.

पावसाळ्याचे दिवस आणि त्यातच विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेचा बोलबाला असतानाही मराठीतील खऱ्या अर्थाने सेक्‍स कॉमेडी म्हणता येईल अशा ‘टकाटक’ चित्रपटाने तरुणाईच्या जीवावर पहिल्या सहामाहीतील दमदार कामगिरी केली आहे. मराठीतील इतर सर्व चित्रपटांना मागे सारत ‘टकाटक’ने तब्बल १५ कोटींचा व्यवसाय केला. ‘आर्टिकल १५’ आणि ‘सुपर ३०’सारख्या दर्जेदार हिंदी चित्रपटांचे तगडे आव्हान परतावून लावत चौथ्या आठवड्यातही तो गर्दी खेचत आहे.

पर्पल बल एन्टरटेन्मेंट प्रा. लि., व्ही. पतके फिल्म्स आणि गांववाला क्रिएशन्सच्या बॅनरखाली ‘टकाटक’ चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. ‘येड्यांची जत्रा’सारखा यशस्वी चित्रपट देणाऱ्या मिलिंद कवडेने त्याचे दिग्दर्शन केले आहे. प्रथमेश परब, रितिका श्रोत्री, प्रणाली भालेराव, अभिजित आमकर, भारत गणेशपुरे या कलाकारांनी यात काम केले आहे. 

सेक्‍स कॉमेडीसारखा विषय याचित्रपटात हाताळण्यात आला आहे. विशेष म्हणजे कोणतीही कॉर्पोरेट कंपनी वा एखादा मोठा स्टुडिओ पाठीशी नसताना चित्रपटाने एवढा व्यवसाय केला. पहिल्याच आठवड्यात चित्रपट तीनशे ऐंशी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. त्याचे साडेपाच हजारांहून अधिक शो लागले. चौथ्या आठवड्यातही दोनशेहून अधिक थिएटरमध्ये त्याची घोडदौड सुरू आहे. तर दोन हजारपेक्षा जास्त खेळ राज्यभरात सुरू आहेत. 

‘टकाटक’ चित्रपटाचे वितरक समीर दीक्षित म्हणाले, की "चित्रपटाने मराठीमध्ये एक पायंडा टाकला आहे." स्वतंत्रपणे चित्रपट निर्माण करणाऱ्या चित्रपट निर्मात्यांना त्यामुळे उभारी आली आहे. मिलिंद कवडे म्हणाले, की "स्पायडरमॅन, सुपर ३० आणि आर्टिकल १५सारख्या चित्रपटांचे आव्हान नसते तर नक्कीच चित्रपटाने दुप्पट व्यवसाय केला असता."


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Taka tak movie earns fifteen crore in three weeks