हवा कुनाची रं? हवा फक्त आपलीच रं!; टीझरने उडवला 'धुरळा'

टीम ईसकाळ
बुधवार, 20 नोव्हेंबर 2019

मराठीतील तगडी स्टारकास्ट 'धुरळा' चित्रपटात बघायला मिळेल. टीझरमधील गाण्यावरून 'धुरळा'मधली ही निवडणूक चांगलीच रंगणार असं दिसतंय.

गेल्या आठवडाभर #पुन्हानिवडणूक या हॅशटॅगने धुमाकूळ घातला होता. पण ज्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हा हॅशटॅग वापरला गेला त्या 'धुरळा'चा टीझर आज रिलीज झालाय. राजकारणाची रणधुमाळी दाखवणारा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर पण धुरळा करेल हे टीझरवरून कळतंय. मराठीतील तगडी स्टारकास्ट या चित्रपटात बघायला मिळेल. टीझरमधील गाण्यावरून 'धुरळा'मधली ही निवडणूक चांगलीच रंगणार असं दिसतंय.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

#पुन्हानिवडणूक? हा हॅशटॅग वापरण्याचं 'हे' आहे खरं कारण..

निवडणूकीची रणधुमाळी, प्रचाराची लगबग, राजकीय शत्रुत्व, महिलांचं राजकारणातलं अस्तित्व, विजयाचा गुलाल, राजकारणात डोकावू पाहणारी तरूणाई असे राजकारणाचे विविध रंग या ट्रेलरमध्ये दिसत आहेत. अलका कुबल, अंकुश चौधरी, प्रसाद ओक, सई ताम्हणकर, सिद्धार्थ जाधव, सुलेखा तळवळकर, सोनाली कुलकर्णी, अमेय वाघ, प्रियदर्शन जाधव असे दिग्गज कलाकार या चित्रपटात दिसतील. राजकीय भूमिकांमुळे प्रत्येकाच्या अभिनयाचा कस लागलाय.

आधी #पुन्हानिवडणूक गाजली; आता 'धुरळा' उडणार!

झी स्टुडिओज, अनिश जोग, रणजित गुगळे यांची निर्मिती असलेला आणि समीर विद्वांस दिग्दर्शित आणि क्षितीज पटवर्धन लिखित 'धुरळा' 3 जानेवारी 2020 मध्ये प्रदर्शित होईल. अनेक दिवसांनी मराठीत राजकाराणावर चित्रपट येत असल्याने तो कसा असेल, याकडे मराठी प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणातही धुरळा उठत आहे. सत्तासंघर्ष सुरू आहे. अशातच राजकारणाची रणधुमाळी आणि #पुन्हानिवडणूक अशी पंचलाईन असलेल्या या चित्रपटात नक्की काय असेल हे बघण्यासाठी मराठी प्रेक्षक उत्सुक आहेत.  

#पुन्हानिवडणूक मुळे झाला होता गोंधळ
चित्रपटातील या कलाकारांनी काही दिवसांपूर्वी #पुन्हानिवडणूक असा हॅशटॅग ट्विटवर शेअर केला होता. यातून अनेक गैरसमज पसरले. खऱ्या राजकारणासाठी कलाकारांचा उपयोग केला जातो, अशा वावड्या उठल्या, पण झी स्टुडिओजने हा चित्रपट असल्याचे सांगितल्यावर वातावरण शांत झाले. लेखक क्षितीज पटवर्धन दिग्दर्शक समीर विद्वांस हे दोघं मिळून महाराष्ट्रात धुरळा उडवून देण्यासाठी तयार आहेत. चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच ज्या चित्रपटाने इतका 'धुरळा' उडवला, तो चित्रपट प्रदर्शनानंतर काय कमाल करेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Teaser of Marathi movie Dhurala released