'घाईघाईने RIP लिहिण्याच्या या जगात..'; सिंधुताईंच्या निधनानंतर तेजस्विनीची विनंती | Tejaswini Pandit | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tejaswini Pandit and Sindhutai Sapkal

'घाईघाईने RIP लिहिण्याच्या या जगात..'; सिंधुताईंच्या निधनानंतर तेजस्विनीची विनंती

अनाथ मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आपलं आयुष्य वेचणाऱ्या आणि अनाथांची माय या नावानेच ओळखल्या जाणाऱ्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ (Sindhutai Sapkal) यांचं हृदयविकाराच्या झटक्याने मंगळवारी निधन झालं. त्या ७४ वर्षांच्या होत्या. सिंधुताईंच्या जीवनावर आधारलेला 'मी सिंधुताई सपकाळ' हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यामध्ये अभिनेत्री तेजस्विनी पंडितने (Tejaswini Pandit) सिंधुताईंची भूमिका साकारली आहे. सिंधुताईंच्या निधनानंतर तेजस्विनीने सोशल मीडियावर पोस्ट लिहित तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

तेजस्विनी पंडितची पोस्ट-

'अनेक लोकांनी विचारलं तू अजून कसं काही लिहिलं नाहीस. पोस्ट नाही केलं? पटकन जज करतो ना आपण त्यांच्या सोशल मीडियावरुन माणसाला? पण कुटुंबातल्या माणसांना घरातलं कुणी गेल्यावर सोशल मीडियावर पोस्ट करण्याची मनःस्थिति आणि वेळ खरंच असतो? माझीही काहीशी अशीच अवस्था झाली. रात्री ममता ताईच्या फोनवरुन बातमी कन्फर्म झाल्यावर काही क्षण पायातली ताकदच गेली. थक्क झाले होते. खूप वेळ फोन वाजत होता. प्रतिक्रियेसाठी. काही जड छातीने उचलले, काही नाही उचलता आले. कारण ती वेळ खरंच नाजूक होती. माई आणि मी रोज संपर्कात होतो का तर नाही. पण तुमच्या आयुष्यात एखादी अशी व्यक्ती येऊन जाते, की तुमचं आयुष्यच बदलून जातं आणि ह्यात त्यांचा हातभार आहे ह्याचं त्यांना भान ही नसतं. चित्रपटानंतर काही वेळा त्यांना भेटण्याचा योग आला. कधीच कुणाला नावाने हाक न मारता "बाळा" म्हणणार्‍या माईंना माझं नाव मात्र पाठ होतं. हातात हात घेऊन माझी पाठ थोपटायच्या. मला चित्रपट बघून कायम म्हणायच्या "मी हे आयुष्य जगले आहे पण तू मला जिवंत केलंस."

'अभिनेत्री' म्हणून, एक तेजस्विनी पंडित आहे बरंका इथे, अशी ओळख मला मी सिंधुताई सपकाळ ह्या चित्रपटाने दिली. अनेक आंतराष्ट्रीय, राष्ट्रीय पुरस्कार आम्ही पटकावले. अभिमान वाटतो की ज्या कलाक्षेत्रात मी काम करते, त्यातून माईंचं हे महान कार्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचा खारीचा का असेना पण मला वाटा उचलता आला आणि एक व्यक्ती म्हणून त्यांचा तो अविस्मरणीय प्रवास मी स्क्रीनवर जगू शकले. त्यातून बरंच काही शिकू शकले ह्याचा आनंद आहे. परकाया प्रवेश म्हणतात ना तेच! कळत नकळत खूप काही दिलं तुम्ही मला माई. महाराष्ट्र तुमच्या जाण्याने पोरका झाला! पण माझ्यासाठी तुम्ही जिवंतच असाल आणि तुमच्यावर आधारित असलेला चित्रपट तुमच्या लढवय्या वृत्तीची, तुमच्या संघर्षाची ग्वाही, प्रेरणा माझ्या रूपी देत राहील,' अशा शब्दांत तेजस्विनीने भावना व्यक्त केल्या.

हेही वाचा: सिंधुताई सपकाळ : मुलगी नको असल्याने आई-वडिलांनी ठेवले होते चिंदी नाव

या पोस्टमध्ये तिने चाहत्यांना एक विनंतीसुद्धा केली. 'लोकहो एक विनंती... घाई घाईने RIP लिहिण्याच्या ह्या जगात त्यांचंही एक कुटुंब आहे (आणि ते खूप मोठं आहे) ते अत्यंत अवघड परिस्थितीतून जात आहे ह्याचा आपल्याला विसर पडण्याची शक्यता आहे. त्यांना वेळ द्या. तब्येत बरी नसल्यामुळे उद्या त्यांच्या अंत्यदर्शनासाठी जाता येणार नाही. पण ईश्वर चरणी प्रार्थना- माईंच्या आत्म्यास शांती लाभो आणि ममता ताई, दीपक दादा, ममता बाल सदनच्या कुटुंबाला ह्या अवघड परिस्थितीशी लढण्याची ताकद देवो,' असं तिने पुढे लिहिलं.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top