"टायगर भी जिंदा है और साप भी.."; सलमानचं वडिलांना मजेशीर उत्तर | Salman Khan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Salim Khan, Salman Khan

"टायगर जिंदा है और साप भी.."; सलमानचं वडिलांना मजेशीर उत्तर

अभिनेता सलमान खानला (Salman Khan) शनिवारी पहाटे ३च्या सुमारास त्याच्या पनवेलमधील वाजेपूर या गावातील फार्महाऊसमध्ये सर्पदंश झाला. मात्र साप बिनविषारी असल्याचं स्पष्ट झालं. सर्पदंशानंतर त्याला कामोठे इथल्या एमजीएम रुग्णालयात दाखल केलं होतं. त्याच्यावर प्राथमिक उपचार करून त्याला रविवारी सकाळी ९ला घरी सोडण्यात आलं. रविवारी रात्री पापाराझी आणि फोटोग्राफर्ससाठी सलमान फार्महाऊसबाहेर पडला. 'एएनआय'ला दिलेल्या मुलाखतीत सलमानने नेमकं काय घडलं, त्याविषयी सांगितलं. "फार्महाऊसमध्ये साप आल्याने सर्वचजण घाबरले होते. त्यामुळे मी काठीने सापाला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. काठीवरून तो साप माझ्या हातावर आला आणि त्याला हातावरून काढत असताना त्याने तीन वेळा दंश केला", असं तो म्हणाला.

सलमानच्या वाढदिवसानिमित्त त्याचे कुटुंबीय आणि मित्रपरिवार त्याच्या पनवेलच्या फार्महाऊसमध्ये मुक्कामास आहेत. शनिवारी रात्री ख्रिसमस सेलिब्रेशननंतर तो आणि त्याचे काही मित्र गप्पा मारत मारत होते. त्यावेळी सलमानच्या हाताला सर्पदंश झाला. सर्पदंश झाल्याचं कळताच त्याच्या खासगी डॉक्टरांच्या पथकाने कामोठे इथल्या एमजीएम रुग्णालयात दाखल केलं. त्याच्या रक्ताचे नमुने घेतल्यावर त्याला बिनविषारी सापाने दंश केल्याचं निष्पन्न झालं. जवळपास सहा तास रुग्णालयात राहिल्यानंतर आता ठीक असल्याचं सलमानने स्पष्ट केलं.

हेही वाचा: सहावीच्या प्रश्नपत्रिकेत तैमुरबाबत प्रश्न; पालकांची शाळेवर कारवाईची मागणी

"माझ्या वडिलांनी मला विचारलं की काय झालं? साप जिवंत आहे का? त्यावर मी मस्करीत त्यांना म्हणालो, टायगर भी जिंदा है, साप भी जिंदा है," असं सलमान म्हणाला. सापाला पाहिल्यानंतर बहीणसुद्धा खूप घाबरली होती, असं त्याने सांगितलं. बहिणीची मस्करी करत तो म्हणाला, "माझी सापासोबत मैत्री झाली."

सलमान नुकताच 'दबंग रिलोडेड' टूरनंतर भारतात परतला आहे. 'किक २', 'टायगर ३' या चित्रपटांचीही तयारी सुरू आहे. सलमानने 'एक था टायगर' आणि 'टायगर जिंदा है' या दोन्ही चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या होत्या.