'झोपेचं काय करायचं?'; 'वहिनीसाहेब' धनश्री कडगावकरला पडला प्रश्न 

स्वाती वेमूल
Friday, 19 February 2021

धनश्रीच्या घरात चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं असून सध्या तिचं पूर्ण कुटुंब त्या पाहुण्याची काळजी घेण्यात व्यग्र आहे.

'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेत वहिनीसाहेबांची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री धनश्री कडगावकर सध्या खऱ्या आयुष्यात आईच्या भूमिकेत आहे. धनश्रीच्या घरात चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं असून सध्या तिचं पूर्ण कुटुंब त्या पाहुण्याची काळजी घेण्यात व्यग्र आहे. धनश्रीने बाळंतपणानंतरचा तिचा अनुभव चाहत्यांना सांगितला आहे. आयुष्यात त्या चिमुकल्या पाहुण्याचं आगमन होताच आईवडिलांचा प्राधान्यक्रम पूर्णपणे बदलतो आणि दिवसरात्र त्याची काळजी घेण्यात दोघंही गुंतून जातात. 

धनश्रीने इन्स्टा स्टोरीमध्ये स्वत:चा फोटो पोस्ट करत लिहिलं, 'झोपेचं काय करायचं यार!' "मी आयुष्यात कधीच इतकी बिझी झाले नव्हते. आईचं काम दिवसातील २४ तास सुरुच असतं. प्रत्येक पाच मिनिटांनी काहीतरी होतंय आणि आम्ही सर्वजण त्या चिमुकल्याची काळजी घेण्यासाठी धावपळ करतोय. पती दुर्वेशसुद्धा घरातूनच काम करत असल्याने तोसुद्धा बाळाकडे लक्ष देत असतो", असं तिने 'टाइम्स ऑफ इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. 

हेही वाचा : शशांक केतकरच्या बहिणीचं मालिकेत पदार्पण; चाहत्यांमध्ये उत्सुकता
 

धनश्रीने दुर्वेश देशमुखशी लग्न केलं आहे. सोशल मीडियावर तिने काही दिवसांपूर्वीच दुर्वेशचा बाळासोबतचा एक फोटो पोस्ट केला होता. ज्यामध्ये तो एकीकडे लॅपटॉपवर काम करतोय आणि दुसऱ्या हातात त्याने बाळाला कडेकर घेतलं आहे. 'बाबा.. दुहेरी जबाबदारी पेलताना' असं कॅप्शन तिने या फोटोला दिलं होतं. या दोघांनी अजून बाळाचं नाव जाहीर केलं असून येत्या काही दिवसांत त्याच्या बारशाचं आयोजन करण्यात येणार असल्याचं धनश्रीने सांगितलं.

हेही वाचा : ‘स्वाभिमान’ मालिकेतून आसावरी जोशींचं छोट्या पडद्यावर कमबॅक

‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेत गायकवाड घराण्याची धाकटी सून नंदिता वहिनीची भूमिका साकारणारी धनश्री अल्पावधीतच प्रसिद्ध झाली. राणा व अंजलीच्या प्रेमात नेहमी अडथळा आणणाऱ्या नंदिता वहिनी म्हणून तिची घराघरात ओळख झाली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: tujhyat jeev rangala actress dhanashri kadgaonkar explains her busiest life after being mother