शशांक केतकरच्या बहिणीचं मालिकेत पदार्पण; चाहत्यांमध्ये उत्सुकता

सकाळ ऑनलाइन
Friday, 19 February 2021

शशांकने पोस्ट लिहित व्यक्त केला आनंद

मराठी मालिका आणि चित्रपटातून प्रेक्षकांचं मन जिंकणारा कलाकार म्हणजे शशांक केतकर. 'होणार सून मी या घरची' या मालिकेतील श्रीच्या भुमिकेमुळे शशांकला लोकप्रियता मिळाली. आता शशांकची बहीण मालिकेत पदार्पण करणार आहे. शशांकने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ' तू सौभाग्यवती हो' या मालिकेच्या प्रोमोचा आहे. सोनी मराठी वाहिनीवर 'तू सौभाग्यवती' ही नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत शशांकची बहीण दीक्षा केतकर मुख्य भूमिका साकारणार आहे. 

शशांकने सोशल मीडियावर पोस्ट लिहित बहिणीच्या पदार्पणाचा आनंद व्यक्त केला. 'मी खूप उत्सुक आहे. मला तुझा खूप अभिमान वाटतो', असं कॅप्शन त्याने या प्रोमोच्या व्हिडीओला दिलं आहे. या मालिकेत दीक्षा केतकरसोबत ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर दिसणार आहेत. ज्योती चांदेकर या मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडितच्या आई आहेत. या मालिकेतून पदार्पण करण्यापूर्वी दीक्षाने बालकलाकार म्हणून काम केलं आहे. तसंच तिने नाटकांमध्येही तिच्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. 

हेही वाचा : "आम्ही दोघं"; बाळासाहेब ठाकरेंच्या नातवासोबत जोडलं जातंय अभिनेत्रीचं नाव

हेही वाचा : कोणत्याही क्षणी करीना देऊ शकते 'गुड न्यूज'; भेटवस्तूंचा वर्षाव 

शशांकने मालिकांमधून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. आता त्याची बहीणसुद्धा या क्षेत्रात आपली वेगळी छाप सोडण्यात यशस्वी होणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. शशांकची 'हे मन बावरे' ही मालिकासुद्धा लोकप्रिय ठरली. या मालिकेतील मृणाल दुसानिससोबतची त्याची जोडी प्रेक्षकांना फार आवडली. तो आता लवकरच पाहिले न मी तुला या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shashank ketkar is excited for sister deeksha ketkars tv debut says super proud of you