सुबोधमधल्या दिग्दर्शकाचा सोनालीला झाला फायदा

टीम ई सकाळ
सोमवार, 28 ऑगस्ट 2017

'या सिनेमाचे चित्रीकरण चालू गाडीमध्येच जास्त झाले आहे. ज्यात मी आणि सुबोध असेच होतो. आमच्या मागे दिग्दर्शकाची गाडी असायची, त्यामुळे फोनद्वारे संवाद आणि इतर गोष्टींचे मार्गदर्शन आम्हा दोघांना त्यांच्याकडून दिले जायचे. पण ते नेहमी शक्य होत नव्हतं, त्यामुळे कोणत्यावेळी काय बोलायला हवे, आणि आपली काय रीअॅक्शन्स असायला हवी हे मी आणि सुबोध स्वतःच ठरवायचो. विशेष म्हणजे सुबोध स्वतः उत्कृष्ट दिग्दर्शक असल्याकारणामुळे त्याने मला त्यासाठी खूप मदत केली.'

मुंबई : राहुल आणि अंजली या रॉमेंटिक कपलची लग्नानंतरची अनरॉमेंटिक स्टोरी सांगणारा 'तुला कळणार नाही' हा सिनेमा येत्या ८ सप्टेंबरला सर्वत्र प्रदर्शित होत आहे. सुबोध भावे आणि सोनाली कुलकर्णीची प्रमुख भूमिका असलेला हा सिनेमा नवरा-बायकोच्या होणा-या छोट्या मोठ्या कुरबुरीवर भाष्य करतो. प्रेमाचा गुलमोहोर लग्नानंतर कसा गळून पडतो, याचे वर्णन या सिनेमात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाबद्दल सांगताना सोनाली भरभरून बोलते.

हा सिनेमा अर्ध्या अधिक प्रवासावरच बेतलेला आहे. सुबोधबरोबर पहिल्यांदाच मी काम करत असून, त्याच्यासोबत मुंबई टू गोवा असा केलेला  'तुला कळणार नाही' मधला प्रवास खूप अविस्मरणीय आहे, असे ती सांगते.

'या सिनेमाचे चित्रीकरण चालू गाडीमध्येच जास्त झाले आहे. ज्यात मी आणि सुबोध असेच होतो. आमच्या मागे दिग्दर्शकाची गाडी असायची, त्यामुळे फोनद्वारे संवाद आणि इतर गोष्टींचे मार्गदर्शन आम्हा दोघांना त्यांच्याकडून दिले जायचे. पण ते नेहमी शक्य होत नव्हतं, त्यामुळे कोणत्यावेळी काय बोलायला हवे, आणि आपली काय रीअॅक्शन्स असायला हवी हे मी आणि सुबोध स्वतःच ठरवायचो. विशेष म्हणजे सुबोध स्वतः उत्कृष्ट दिग्दर्शक असल्याकारणामुळे त्याने मला त्यासाठी खूप मदत केली.' असे सोनाली सांगते. 'खरं तर लाईव्ह बोलताना, एकमेकांचे बाँडिंग खूप महत्वाची असते. आपण नेमके काय बोलतोय आणि ते समोरच्याला आवडेल का, इथून सुरुवात असते. मात्र सुबोधने अगदी चातुर्याने ते सारे हाताळून घेतले आणि आमच्या या प्रवासातील गप्पांचे चित्रीकरण सिनेमात झाले' असे सोनालीने सांगितले. 

नवरा-बायकोच्या नात्यातील जीवनप्रवास प्रत्येक विवाहीत जोडपे आपल्या उभ्या आयुष्यात करत असतात. प्रेम, अबोला, वादविवाद, हेवेदावे आणि जबाबदारी अशा अनेक पैलूंमुळे चकाकणाऱ्या या नात्याची, दुस-या कोणत्याच नात्यासोबत तुलना करता येत नाही. म्हणूनच तर, मोडीत निघालेल्या ओढीची... गोष्ट वेड्या जोडीची' असे उपशिर्षक असलेला हा सिनेमा प्रत्येकाला आपलीच कहाणी असल्यासारखी वाटेल. सक्षम फिल्म्स आणि जीसिम्स प्रस्तूत तसेच सिनेकोर्न इंडियाचे सौजन्य लाभलेल्या ह्या सिनेमाला स्वप्नील जोशी, कार्तिक निशानदार, अर्जुन बरन तसेच श्रेया योगेश कदम या निर्मात्यांची मोठी नांदी लाभली आहे, शिवाय  निरव शाह, इलाची नागदा आणि जयेश मुझुमदार यांनी सहनिर्मितीची धुरा संभाळली असून, स्वप्ना वाघमारे जोशी यांच्या दिग्दर्शकीय नजरेतून साकार झालेला हा सिनेमा प्रत्येक नवरा बायकोची बायोपिक मांडण्यास सज्ज झाला आहे.

Web Title: tula kalnaar nahi movie Sonalee Kulkarni Subodh Bhave esakal news