esakal | 'श्री कृष्ण'मधील 'भीष्म पितामह' आर्थिक संकटात; कुटुंबीयांनीही सोडली साथ

बोलून बातमी शोधा

Sunil Nagar

'श्री कृष्ण'मधील 'भीष्म पितामह' आर्थिक संकटात; कुटुंबीयांनीही सोडली साथ

sakal_logo
By
स्वाती वेमूल

कोरोनाचं संकट आणि लॉकडाउन यामुळे अनेकांवर आर्थिक संकट उद्भवलं. यामध्ये मनोरंजनविश्वात काम करणारेही असंख्य कलाकार आहेत. अनेक पौराणिक मालिकांमध्ये भूमिका साकारणारे आणि लोकप्रिय 'श्री कृष्ण' मालिकेत भीष्म पितामह साकारणारे अभिनेते सुनील नागर हेसुद्धा आर्थिक अडचणीत सापडले आहेत. अत्यंत कठीण परिस्थितीतून जात असल्याचा खुलासा त्यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत केला. मुंबईतील ओशिवरा इथलं स्वत:चं घर विकून ते सध्या भाड्याच्या घरात राहत आहेत. मात्र त्या घराचं भाडे भरायलाही त्यांच्याकडे पैसे नाहीत.

गेल्या दोन वर्षांपासून सुनील यांना काम मिळत नाहीये. त्यांनी जमा केलेले सर्व पैसे खर्च झाले आणि गेल्या दहा महिन्यांपासून त्यांनी घराचं भाडं भरलं नाही. सुनील यांच्याकडे आता दररोजच्या गरजांसाठीही पैसे शिल्लक नाहीत.

'मी कोणाला मदत मागू इच्छित नव्हतो, पण आता खरंच परिस्थिती बिघडली आहे. कोणाला दोष देऊ ते समजत नाही. जेव्हा मी काम करत होतो, तेव्हा खूप पैसा कमावला, अनेक हिट शोज दिले. मात्र आज इंडस्ट्रीमध्ये माझ्यासाठी काम नाही. काही दिवसांपूर्वी मला एका रेस्टॉरंटमध्ये गाणं गाण्याची संधी मिळाली होती. तिथेच मला राहायला आणि खायला-प्यायला मिळायचं. पण लॉकडाउनमुळे तो रेस्टॉरंट बंद झाला', अशी पोस्ट त्यांनी लिहिली आहे. अशा परिस्थितीत कुटुंबीयांनीही साथ सोडल्याचं त्यांनी सांगितलं. 'माझ्या कुटुंबीयांनीही माझी साथ सोडली. मी माझ्या मुलाला कॉन्वेंट शाळेत शिकायला पाठवलं आणि पाहा आज माझी काय अवस्था आहे. माझे भाऊ-बहीणसुद्धा आहेत, मात्र कोणालाच माझी पर्वा नाही. देवाच्या कृपेने मला अजून कोरोना नाही झाला. मात्र मला इतर आरोग्याशी निगडीत समस्या आहेत', असं ते म्हणाले.

हेही वाचा : वडील मोहन गोखलेंसाठी सखीची भावनिक पोस्ट

सुनील यांची ही पोस्ट वाचून CINTAA (सिने अँड टीव्ही आर्टिस्ट्स असोसिएशन)ने त्यांच्याशी संपर्क साधला आणि मदत करण्याचं आश्वासन दिलं. सुनील यांनी 'ताल', 'चतुरसिंह टू स्टार' आणि 'यू आर माय जान' या चित्रपटांमध्ये काम केलं. तर 'ओम नम: शिवाय', 'श्री गणेश' आणि 'कुबूल है' या मालिकांमध्ये भूमिका साकारल्या.