कोल्हापूरनं दिले संयम अन्‌ सहनशीलता!

संभाजी गंडमाळे
रविवार, 21 एप्रिल 2019

मी कोल्हापूरच्या मातीत लहानाचा मोठा झालेला माणूस. सुरवातीला शाहूपुरीत आणि आता पाचगावला राहणारा. फिल्म इंडस्ट्रीतच करिअर करण्याचा निर्णय घेतला; पण या वाटेवर संघर्ष असणार आणि त्यावर मात करूनच पुढे जावे लागणार, याची जाणीवही होती. अर्थात अनेकदा अपमानही सहन करावा लागला; पण संयम आणि अपमान सहन करण्याची ताकद कोल्हापूरच्या मातीनंच नसांनसांत भिनवलेली आहे. त्याच जोरावर आजवरचा प्रवास सुरू ठेवला...

मी कोल्हापूरच्या मातीत लहानाचा मोठा झालेला माणूस. सुरवातीला शाहूपुरीत आणि आता पाचगावला राहणारा. फिल्म इंडस्ट्रीतच करिअर करण्याचा निर्णय घेतला; पण या वाटेवर संघर्ष असणार आणि त्यावर मात करूनच पुढे जावे लागणार, याची जाणीवही होती. अर्थात अनेकदा अपमानही सहन करावा लागला; पण संयम आणि अपमान सहन करण्याची ताकद कोल्हापूरच्या मातीनंच नसांनसांत भिनवलेली आहे. त्याच जोरावर आजवरचा प्रवास सुरू ठेवला...अभिनेता उमेश बोळके संवाद साधत असतात आणि त्यांच्या प्रवासातील विविध पदर उलगडत असतात. 

उमेश यांचं शिक्षण विक्रम हायस्कूल आणि त्यानंतर गोखले कॉलेजमध्ये झालं. त्यांना कोल्हापूरचेच दिग्दर्शक युवराज घोरपडे यांनी पहिल्यांदा संधी दिली, ती ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ या चित्रपटासाठी. आजवर त्यांनी ३४ मराठी चित्रपट, चार हिंदी चित्रपट, सात मराठी नाटकं, २२ मराठी मालिका आणि दहा हिंदी मालिकांत अभिनय केला आहे. सध्या ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेच्या शूटिंगमध्ये ते व्यस्त आहेत. चौदा वर्षांपूर्वी त्यांनी मुंबई गाठली. या झगमगत्या दुनियेत टिकायचं तर झपाटून काम केलं तरच आपण येथे ताठ मानेनं उभं राहू शकतो, याची जाणीव जपली. त्यामुळेच एक-दोन नव्हे, तर तब्बल अकरा वर्षे कोल्हापूर ते मुंबईचा प्रवास त्यांनी आपल्या दुचाकीवरूनच केला आणि मिळेल त्या कामाचं सोनं करून दाखवलं.

विधू विनोद चोप्रा यांचा ‘फेरारी की सवारी’, रोहित शेट्टींचा ‘सिंघम-२’, ‘वीकेंड’, ‘बेंजो’ या बॉलीवूडपटातील त्यांच्या भूमिकाही उल्लेखनीय ठरल्या. ‘प्यार की कहानी’, ‘जय श्रीकृष्ण’, ‘शू फिर कोई है’, ‘परिचय’, ‘लागी तुझ से लगन’, ‘उतरण’, ‘ससुराल सिमर का’, ‘सीआयडी’, ‘मन में है विश्‍वास’, ‘क्राईम पेट्रोल’ आदी हिंदी मालिकांतील त्यांच्या भूमिकाही गाजल्या. ते सांगतात, ‘‘कोल्हापूरनं भरभरून प्रेम दिलं. करिअरच्या वाटेवर अनेक अडचणी आल्या. त्यावर मात करत पुन्हा नव्या दमानं उभं राहण्याचं बळ दिलं. त्याच जोरावर आणि अनुभवाच्या शिदोरीवर येत्या काळातही बरेच काही करायचे आहे.’’

Web Title: Umesh Bolake interview in Amhi Kolhapuri