
‘द कश्मीर फाईल्स’ या चित्रपटाला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे; पण..
'कश्मीर फाईल्स बनत असेल, तर लखीमपूर फाइल्स का नाही?'
विवेक अग्निहोत्रींनी दिग्दर्शित केलेल्या 'द कश्मीर फाईल्स' (The Kashmir Files) या चित्रपटाबद्दल सध्या सर्वत्र चर्चा सुरूय. चित्रपटाच्या बाजूचे आणि चित्रपटाच्या विरोधातले असे दोन गट पडले आहेत. बाजूचे हा चित्रपट सर्वांनी पाहावा यासाठी प्रचार करताहेत, तर विरोधातले या चित्रपटावर बंदीपर्यंत पोहोचलेत. समाजमाध्यमांवर या दोन्ही गटांमध्ये तुंबळ युद्ध सुरूय. त्याला आता राजकीय रंगही मिळालाय.
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी पहिल्यांदाच माध्यमांशी संवाद साधलाय. ते म्हणाले, समाजवादी पक्षानं निवडणुकीत नैतिक विजय मिळवला असून मतांच्या टक्केवारीत मोठी वाढ झाली आहे, असं त्यांनी सांगितलं. यादरम्यान अखिलेश यांनी 'द कश्मीर फाईल्स' या चित्रपटावरही भाष्य केलंय. जर 'कश्मीर फाईल्स' बनत असेल, तर 'लखीमपूर फाइल्स' (Lakhimpur Files) बनवायला काय हरकत आहे? असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय.
हेही वाचा: The Kashmir Files : चित्रपटावरून रंगलेला वाद नेमका काय?
निवडणुकीनंतर (Uttar Pradesh Assembly Election) पहिल्यांदाच अखिलेश यादव सीतापूरला पोहोचले आहेत. यादरम्यान त्यांनी जनतेशी संवाद साधलाय. माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव म्हणाले, कश्मीर फाईल्स बनवता येत असेल, तर लखीमपूरमध्ये जीप खाली चिरडून मारलेल्या शेतकऱ्यांच्या फाईल्स का होत नाहीत? असा सवाल त्यांनी केलाय. लखीमपूरच्या हिंसाचारावरही 'लखीमपूर फाइल्स' बनायला हवी. कारण, या घटनेत शेतकऱ्यांना जीप खाली चिरडून मारण्यात आलंय. ही घटना देखील समोर यायला हवी. निवडणुकीच्या मुद्यावर अखिलेश म्हणाले, अशा निकालाची कल्पना कोणीही केली नव्हती. भाजपच्या धक्कादायक विजयानंतर अनेकांनी विष प्राशन केलंय, काहींनी पैज हारलीय. पण, या निकालानं समाजवाद्यांचा नैतिक विजय झालाय, असं त्यांनी सांगितलं. माजी मंत्री आणि सपा नेते नरेंद्र वर्मा यांचे मोठे बंधू महेंद्र वर्मा यांच्या एका कार्यक्रमात अखिलेश यादव सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
हेही वाचा: The Kashmir Files:1975 नंतर पहिल्यांदाच घडलं; काय म्हणतायत Trade Analyst
सत्य समोर आणणारे असे आणखी चित्रपट बनले पाहिजेत : नरेंद्र मोदी
‘द कश्मीर फाईल्स’ या चित्रपटाला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे. विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) दिग्दर्शित या चित्रपटाचे सर्वजण कौतुक करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) नुकतीच चित्रपटाच्या टीमचीही भेट घेतली होती. मंगळवारी झालेल्या भाजप संसदीय दलाच्या बैठकीत पंतप्रधान मोदींनी ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटावरही चर्चा केली. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘चित्रपटात जे दाखवलंय, ते सत्य नेहमीच दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.’ या चित्रपटातून सत्य समोर आणण्यात आल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. या चित्रपटाचे कौतुक करताना त्यांनी असंही म्हटलंय की, ‘हे सत्य दडपण्यासाठी एक इकोसिस्टम काम करते. सत्य समोर आणण्यासाठी असे आणखी चित्रपट बनवले पाहिजेत.’
Web Title: Up Samajwadi Party Akhilesh Yadav Said That Make Lakhimpur Files Movie The Kashmir Files
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..