नवा चित्रपट : 'उरी... द सर्जिकल स्ट्राईक'

नवा चित्रपट : 'उरी... द सर्जिकल स्ट्राईक'

भारतीय जवानांची शौर्यगाथा 

भारतीय लष्कराची शौर्यगाथा सांगणारे 'बॉर्डर', 'एलओसी...कारगील' असे काही चित्रपट आले आणि प्रेक्षकांनी त्यांचे चांगले स्वागत केले. त्यामुळे 'उरी...द सर्जिकल स्ट्राईक' या चित्रपटाबद्दल कमालीची उत्सुकता सगळ्यांना लागलेली होती. या चित्रपटाच्या ट्रेलरवरून या चित्रपटाने अधिकाधिक उत्कंठा वाढवीत नेली होती. अखेर हा चित्रपट प्रदर्शित झाला.

अंगावर रोमांच आणणारा... क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणारा...मनात देशाभिमान जागवणारा... धारदार संवाद असलेला चित्तथरारक असा हा चित्रपट आहे. जम्मू-काश्‍मीरमधील उरी येथे पहाटे अतिरेक्‍यांनी भारतीय सैनिकांवर हल्ला केला. त्यामध्ये 19 भारतीय जवान शहीद झाले. या हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायचे भारतीय सैन्याने ठरविले आणि केवळ अकरा दिवसांतच भारतीय सैनिकांनी सर्जिकल स्ट्राईक केला.

तीच भारतीय सैनिकांची शौर्यगाथा 'उरी...द सर्जिकल स्ट्राईक' या चित्रपटात मांडण्यात आली आहे. चित्रपटाची सुरुवातच दमदार संवादांनी होते. मेजर विहान शेरगिल (विकी कौशल) आणि कॅप्टन करण कश्‍यप ( मोहित रैना) यांच्या मणिपूरमधील कॅंपवर दहशतवादी हल्ला होतो. मेजर विहान आणि कॅप्टन करण या हल्ल्याला चोख उत्तर देतात.

विहानची आई (स्वरूप संपत) अल्जायमर्सने ग्रस्त होते आणि त्यामुळे तो बॉर्डरवरून दिल्लीत पोस्टिंग करून घेतो. याचदरम्यान उरीमध्ये दहशतवादी हल्ला होतो. या हल्ल्यात विहानचा जवळचा मित्र आणि बहिणीचा पती करण शहीद होतो. विहानच्या ही बातमी कानी पडताच तो सूडाने पेटून उठतो.

या भ्याड हल्ल्याला चोख उत्तर द्यायचे, असे भारत ठरवितो आणि नंतर सुरू होते सर्जिकल स्ट्राईकचे प्लॅनिंग. त्यानंतर काय आणि कशा घडामोडी होतात, त्यासाठी हा चित्रपट पाहावा लागेल. आदित्य धरने हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे.

विकी कौशल, परेश रावल, यामी गौतम, कीर्ती कुल्हारी, स्वरूप संपत आदी कलाकारांनी यामध्ये काम केले आहे. या सर्व कलाकारांची कामे छान झाली आहेत. विशेष म्हणजे विकी कौशलने आपल्या अभिनयाची चांगली चमक व धमक दाखवली आहे. त्याने विहानच्या भूमिकेसाठी घेतलेली मेहनत नक्‍कीच जाणवते.

सूडाने पेटलेल्या विहानच्या डोळ्यांतला राग व त्वेष त्याने सुरेख व्यक्त केला आहे. यापूर्वी त्याने 'राझी', 'मसान', 'संजू' आणि नुकताच आलेला 'मनमर्जियॉं' अशा काही चित्रपटात कामे केली असली, तरी विहानची ही भूमिका त्याच्या आतापर्यंतच्या करिअरमधली सर्वोत्तम असावी असे वाटते. यामी गौतमनेही आपली कामगिरी चोख बजावली आहे.

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची व्यक्तिरेखा परेश रावल यांनी केली आहे. ही भूमिकादेखील महत्त्वपूर्ण आहे. अन्य कलाकारांच्या वाट्याला छोट्या छोट्या भूमिका आलेल्या आहेत आणि त्यांनी त्या समरसून केल्या आहेत.

चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी उत्तम आहे. 'ये हिंदुस्थान अब चुप नही बैठेगा... ये नया हिंदुस्थान है... ये घर में घुसेगा भी और मारेगा भी...' असे काही झणझणीत आणि धारदार संवाद या चित्रपटात आहेत. मात्र चित्रपटाचे संगीत कमजोर आहे. केवळ दोनच गाणी आहेत; पण तीही लक्षात राहणारी नाहीत. चित्रपटाचा पूर्वार्ध संथ असला तरी उत्तरार्धात चित्रपट चांगली पकड घेतो. सप्टेंबर 2016 मध्ये भारतीय सैन्याने सर्जिकल स्ट्राईक केला. पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये घुसून तेथील दहशतवादी अड्डे भारतीय सैन्याने नष्ट केले. तिथून भारतीय जवान सहीसलामत परतले. त्यामुळे हॅट्‌स ऑफ भारतीय सैनिक....भारतीय सैनिकांची ही शौर्यगाथा सगळ्यांनी पाहावी अशीच आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com