esakal | अरुणाचलच्या आमदाराला 'चिनी' म्हणणाऱ्याचा वरुण, राजकुमारने घेतला समाचार
sakal

बोलून बातमी शोधा

Rajkummar Rao and Varun Dhawan

अरुणाचलच्या आमदाराला 'चिनी' म्हणणाऱ्याचा वरुण, राजकुमारने घेतला समाचार

sakal_logo
By
स्वाती वेमूल

एका युट्यूबरने अरुणाचल प्रदेशच्या Arunachal Pradesh आमदारावर वर्णभेदी टिप्पणी केल्यानंतर वरुण धवन Varun Dhawan, राजकुमार राव Rajkummar Rao या अभिनेत्यांनी त्याचा समाचार घेतला आहे. युट्यूबर पारस सिंह ऊर्फ बंटीने त्याच्या व्हिडीओमध्ये अरुणाचल प्रदेशचे आमदार निनॉन्ग इरिंग यांचा उल्लेख 'गैर भारतीय' असा केला. त्यानंतर सर्वच स्तरांतून त्याच्यावर टीका होऊ लागली. अभिनेता वरुण धवन आणि राजकुमार राव यांनीसुद्धा युट्यूबरवर संताप व्यक्त केला. (Varun Dhawan rajkummar rao slams YouTuber for racist remark against Arunachal MLA)

'अरुणाचलमध्ये बराच वेळ घालवल्यानंतर आता इतरांना ही गोष्ट शिकवण्याची वेळ आली आहे की हे किती अयोग्य आणि चुकीचं आहे', अशा शब्दांत वरुणने नाराजी व्यक्त केली. वरुण त्याच्या एका चित्रपटाच्या शूटिंगनिमित्त काही दिवस अरुणाचल प्रदेशमध्ये राहत होता. 'स्त्री' या चित्रपटाचे दिग्दर्शक अमर कौशिक यांनीसुद्धा सोशल मीडियावर लिहिलं, 'आपल्या देशाबद्दल अनभिज्ञ असणं म्हणजे मूर्खपणा आहे. सर्वांनीच अशा अज्ञानी लोकांचा निषेध केला पाहिजे.' अमर कौशिक यांची पोस्ट शेअर करत 'असा अपमान अमान्य आहे', असं राजकुमार रावने म्हटलं.

हेही वाचा: Shruti Haasan : 'बरं झालं आईबाबांनी घटस्फोट घेतला'

नेमकं काय आहे प्रकरण?

अरुणाचल प्रदेशचे आमदार निनॉन्ग इरिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक पत्र लिहिलं. या पत्रात त्यांनी बॅटलग्राऊंड्स मोबाइल इंडियाच्या रुपात पुन्हा एकदा लाँच होणाऱ्या पबजी गेमवर बंदी आणण्याची मागणी केली. याच मुद्द्यावर बंटीने व्हिडीओ पोस्ट केला आणि त्यात निनॉन्ग यांच्यावर वर्णभेदी टिप्पणी केली. इतकंच नव्हे तर अरुणाचल प्रदेश हा भारताचा भाग नसून चीनचा होता असंदेखील वादग्रस्त वक्तव्य त्याने केलं.