esakal | चित्रपटसृष्टीत 'सन्नाटा'; किशोर नांदलस्कर यांचे कोरोनाने निधन

बोलून बातमी शोधा

kishor nandlaskar
चित्रपटसृष्टीत 'सन्नाटा'; किशोर नांदलस्कर यांचे कोरोनाने निधन
sakal_logo
By
स्वाती वेमूल

ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचे कोरोनाने निधन झाले. ठाण्यातील रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं होतं. मंगळवारी दुपारी त्यांनी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. किशोर यांनी आतापर्यंत सुमारे ४० नाटकं, २५ हून अधिक मराठी आणि हिंदी चित्रपट आणि २० हून अधिक मालिकांमध्ये काम केलंय. 'हळद रुसली कुंकू हसली', 'शेजारी शेजारी', 'सारे सज्जन' यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या आहेत. तर 'पाहुणा', 'श्रीमान श्रीमती', 'वन रुम किचन', 'भ्रमाचा भोपळा' यांसारख्या नाटकांमधून त्यांनी प्रेक्षकांना खळखळून हसवलं. महेश मांजरेकर यांच्या 'वास्तव' या चित्रपटातून नांदलस्कर यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. ‘जिस देश में गंगा रहता है’, ‘तेरा मेरा साथ है’, ‘खाकी’, ‘ये तेरा घर ये मेरा घर’, ‘हलचल’, ‘सिंघम’ या चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या होत्या.

किशोर नांदलस्कर यांचा मुंबईत जन्म झाला होता. मुंबईतील लॅमिंग्टन रोड, नागपाडा, घाटकोपर आणि अन्य काही भागात त्यांचं लहानपण गेलं. त्यांचे वडील खंडेराव यांच्याकडूनच त्यांना अभिनयाचा वारसा मिळाला होता. लहानपणापासूनच नांदलस्कर यांना अभिनयाचं वेड लागलं होतं. एक दिवस त्यांनी वडिलांना मलाही नाटकात काम करायचं आहे, असं सांगितलं. वडिलांनीही होकार दिला आणि १९६०-६१ च्या सुमारास सादर झालेल्या 'आमराई' या नाटकात काम करण्याची संधी त्यांना मिळाली. नंतर ते नोकरी करत नाटकात काम करत होते.

नांदलस्कर यांनी अनेक वर्षे अभिनयविश्वात काम करूनही त्यांना छोट्या छोट्या भूमिकाच मिळत गेल्या. मात्र त्यांच्या वाट्याला आलेली प्रत्येक भूमिका त्यांनी जीव ओतून साकारली. प्रत्येक भूमिकेवर त्यांनी त्यांच्या दमदार अभिनयाची छाप पाडली आणि म्हणूनच ती आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत.