
नमाज पठण करणाऱ्याच्या बाजूला माधवनचं गायत्री मंत्र जप; व्हिडीओ चर्चेत
नेटफ्लिक्सवरील 'डीकपल्ड' (Decoupled) ही वेब सीरिज सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. या सीरिजला सकारात्मक आणि नकारात्मक अशा संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत. यामध्ये अभिनेता आर. माधवन (R Madhavan)आणि सुरवीन चावला प्रमुख भूमिकेत आहेत. आर. माधवनने या सीरिजमध्ये आर्य अय्यरची भूमिका साकारली आहे. नुकतंच या सीरिजमधील एक व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये, माधवन दिल्ली विमानतळावरील प्रार्थना कक्षेत व्यायाम करताना दिसत आहे. (Decoupled Viral Video)
या सीरिजमधील आर्य अय्यर या लेखकाला पाठदुखीचा त्रास असतो. त्यामुळे ते स्ट्रेचिंग व्यायाम करण्यासाठी मोकळी जागा शोधत असतो. जागा शोधताना तो विमानतळावरील प्रार्थना कक्षेत जातो. तिथे खोलीत आणखी एक व्यक्ती नमाज पठण करत असते. माधवन जेव्हा त्याच्या बाजूला स्ट्रेचिंग व्यायाम सुरू करतो तेव्हा तो माणूस चिडतो. हे प्रार्थना कक्ष आहे, इथे व्यायाम करू शकत नाही, असं तो माधवनला म्हणतो. माधवन त्याला सांगण्याचा प्रयत्न करतो की पाठदुखीचा त्रास असल्याने विमानात बसण्यापूर्वी तो स्ट्रेचिंग करत आहे. माधवन त्या माणसाला समजावण्याचा खूप प्रयत्न करतो, पण तो व्यक्ती त्याचं ऐकत नाही.
हेही वाचा: 'बिग बॉस मराठी'च्या इतिहासात पहिल्यांदाच घडणार असं काही..
नमाज पठण करणारी ती व्यक्ती अखेर विमानतळावरील कर्मचाऱ्याकडे माधवनची तक्रार करते. त्यानंतर तो कर्मचारी आर माधवनला सांगतो की तो तिथे व्यायाम करू शकत नाही. ही खोली केवळ प्रार्थनेसाठी आहे असं तो कर्मचारी म्हणताच, माधवन गायत्री मंत्राचा जप करायला सुरू करतो. हे पाहून त्या दुसऱ्या व्यक्तीला राग येतो, मात्र तो त्याला थांबवूही शकत नव्हता. विमानातील संपूर्ण प्रवासात तो व्यक्ती चिडलेला दाखवला आहे. सतत तो माधवनशी बाचाबाची करत असतो आणि एअर होस्टेससोबत गैरवर्तनही करतो.
आर. माधवनच्या सीरिजमधील ही व्हिडीओ क्लिप सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून त्यावर नेटकरी विविध प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.
Decoupled ही सीरिज स्तंभलेखक आणि लेखक मनू जोसेफ यांनी लिहिली आहे. सुप्रसिद्ध लेखक चेतन भगत यांनीदेखील सीरिजमध्ये भूमिका साकारली आहे. ८ भागांच्या या सीरिजची कथा प्रसिद्ध लेखक आर्य अय्यर आणि त्यांची पत्नी श्रुती यांच्याबद्दल आहे, जी एक यशस्वी व्यावसायिकदेखील आहे. हे जोडपं घटस्फोट घेण्याच्या विचारात असतं.
Web Title: Video Clip Of Namaz And Gayatri Mantra From R Madhavan Web Series Decoupled Goes Viral
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..