Pradeep Patwardhan आणि विजय पाटकर यांच्यातील वाद काय होता? वाचा सविस्तर Vijay patkar | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pradeep Patwardhan, Vijay Patkar

Pradeep Patwardhan आणि विजय पाटकर यांच्यातील वाद काय होता? वाचा सविस्तर

Pradeep patwardhan: मराठीतील हरहुन्नरी कलाकार प्रदीप पटवर्धन यांचे अचानक जाणे आज मनोरंजनविश्वालाच नाही तर त्यांच्या असंख्य चाहत्यांना चटका लावून गेले आहे. वयाच्या ६४ व्या वर्षी प्रदीप पटवर्धन यांचे हृद्यविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. गेली अनेक वर्ष आपल्या हसऱ्या स्वभावानं आणि उत्तम कॉमेडी टाईमिंगने रसिकांचं निखळ मनोरंजन करणारा अभिनेता आज जाताना मात्र आपल्या चाहत्यांच्या मनाला चटका लावून गेला.(Vijay Patkar on the demise of Pradeep Patwardhan, Shares Old Memories)

प्रदीप पटवर्धन यांच्या निधनानंतर अभिनेते,निर्माते,दिग्दर्शक विजय पाटकर यांनी प्रदीप पटवर्धन यांच्या भूतकाळातल्या अनेक रम्य आठवणी सकाळ डिजिटल सोबत शेअर केल्या. आपल्यापैकी कदाचित अनेकांना माहित असेल किंवा माहित नसेलही पण प्रदीप पटवर्धन हे बॅंकेत कामाला होते. आणि तिथूनच त्यांच्या अभिनयाचा प्रवास सुरु झाला. तो काळ त्यांच्या एकांकिकांनी गाजवला. याविषयीच्याच प्रदीप पटवर्धन यांच्या आठवणी विजय पाटकर यांनी शेअर केल्या आहेत.

विजय पाटकर म्हणाले, ''मी आणि पट्या, हो आमच्यासाठी तो प्रदीप पटवर्धन नंतर आधी पट्याच. आम्ही दोघेही बॅंकेत कामाला होतो. तेव्हा बॅंक ऑफ इंडियाच्या ज्या दरवर्षी एकांकिका स्पर्धा व्हायच्या त्यात आम्ही दोघंही हिरीरीनं सहभागी व्हायचो. पण तिथंही एक किस्सा आहे. आम्ही त्यावेळी एकमेकांच्या कामांना नावं ठेवायचो,कडाडून भांडायचो, एकमेकांच्या चुका मुद्दामहून दाखवून द्यायचो. पण गंमत होती त्यात,कारण इतकं सगळं एकमेकांविरोधात करुनही प्रदीप पटवर्धनला दरवर्षी त्या स्पर्धांमध्ये उत्कृष्ट अभिनेता म्हणून पारितोषिक मिळायचं आणि मला उत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून. आणि मग काय पारितोषिक स्विकारताना दोघंही चेहऱ्यावर कोणताही भाव न आणता..'ठीक आय,छान आहे,पारितोषिक मिळालं', असं म्हणत गप्प बसायचो. कारण पट्या मला नेहमी म्हणायचा,'तू बालनाट्य बसवतोस, तर मी नेहमी त्याला म्हणायचो,'तुला अभिनय म्हणजे काय हे माहितच नाही'. असो, तो सगळा त्या वेळचा वेडेपणा. पण प्रदीप पटवर्धन हा आमच्या काळातला बाप अभिनेता होता. त्याच्यामुळे विनोदाचे अनेक अंग मला नव्यानं तेव्हा कळले''.

सिद्धार्थ कॉलेजच्या प्रदीप पटवर्धन यांच्यासोबतच्या आठवणी शेअर करताना विजय पाटकर पुढे म्हणाले, ''प्रदीप पटवर्धन म्हणजे मराठीतला राजेश खन्ना. स्टारसारखं कसं वागायचं ते त्याला तेव्हाही उत्तम माहित होतं. मला आजही आठवतो सिद्धार्थ कॉलेजचा तो गेट,जिथं पट्या उभा राहिला की येणाऱ्या-जाणाऱ्या नजरा त्याच्याकडं पाहण्यासाठी वळल्याशिवाय राहायच्या नाहीत. आम्हाला मात्र त्याच्यासारखं राहण अजूनही जमलं नाही. तो मात्र आजतागायत तसाच राहिला. पट्याच्या बाबतीतली आणखी एक आठवण म्हणजो तो जेव्हा अभिनेता झालाही नव्हता तरीदेखील संबंध गिरगाव आणि गिरगावकर दहीहंडीत केवळ त्याचा दहा मिनिटांचा तो डान्स परफॉर्मन्स पाहण्यासाठी गर्दी करुन राहायचे. तो यायचा,नाचायचा अन् सर्वांना जिंकून जायचा. असा होता पट्या,आपल्याभोवती प्रसिद्धिचं वलय त्यानं अभिनयसृष्टीत येण्यापूर्वीच निर्माण केलं होतं''.

''आज त्याच्या जाण्यानं आपला एक तारा निखळल्याचं दुःख कायम मनात राहिल पण त्याच्या तगड्या अभिनयाच्या डोंगराएवढ्या आठवणी मनाला नेहमीच आनंद देऊन जातील''.