
Vikram Gokhale Funeral: विक्रम गोखले अनंताच्या प्रवासाला, चाहत्यांना अश्रू अनावर...
Vikram Gokhale Funeral: मराठी आणि हिंदी विश्वात आपल्या अभिनयाचा दरारा निर्माण करणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे वयाच्या ७७ वर्षी निधन झाले. गेल्या १५ ते २० दिवसांपासून ते पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत होते. पण उपचारानंतरही त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली होती,त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. पण अखेर मृत्यूशी सुरू असलेली त्यांची झुंज थांबली आणि त्यांनी २६ नोव्हेंबर,२०२२ रोजी अखेरचा श्वास घेतला. (Vikram Gokhale Funeral)
विक्रम गोखले यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी ६.३० वाजता विद्युत दाहिनीच्या माध्यमातून अंत्यसंस्कार करण्यात आले. अभिनयातील या नटसम्राटाला अखेरचा निरोप देताना अनेकांच्या डोळ्यात अश्रू दाटले होते.विक्रम गोखले यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी पुण्यातील बाल गंधर्व रंगमंदिरात ठेवण्यात आले होते. यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आणि अखेर अभिनयाचा हा बादशहा अनंतात विलीन झाला. विक्रम गोखले यांचे अखेरचं दर्शन घ्यायला काही कलाकार मंडळी देखील हजर होती.
विक्रम गोखले यांनी मराठी नाटक,मालिका,चित्रपट अशा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर आपल्या अभिनयाच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन केले. विक्रम गोखले केवळ उत्तम नट नव्हते तर उत्तम लेखक आणि दिग्दर्शकही होते. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या 'आघात' या चित्रपटाचे विशेष कौतूक झाले होते. २०१३ साली 'अनुमती' या चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कारानं देखील गौरविण्यात आलं होतं. बॉलीवूडमधील 'हम दिल दे चुके सनम' मधील त्यांच्या भूमिकेपुढे तर सलमान-ऐश्वर्या देखील फिके पडले होते.