खलनायकीचे भावविश्‍व

‘प्युअर इव्हिल’मध्ये संशोधन करून, विचारपूर्वक विविध कालखंडातील अजरामर झालेल्या खलनायकांच्या भूमिका निवडल्या आहेत.
movie villains
movie villainssakal
Summary

‘प्युअर इव्हिल’मध्ये संशोधन करून, विचारपूर्वक विविध कालखंडातील अजरामर झालेल्या खलनायकांच्या भूमिका निवडल्या आहेत.

सिनेमाच्या स्टोरीत खरे रंग भरणाऱ्या खलनायकांचा, काळानुसार बदलत जाणाऱ्या त्यांच्या भूमिकांचा समग्र धांडोळा आजपर्यंत कुणी घेतला नव्हता. मात्र नुकतेच प्रकाशित झालेले ‘प्युअर इव्हिल- द बॅड मॅन ऑफ बॉलीवूड’ या पुस्तकातून सिनेमाची आवड असणारे बालाजी विट्टल यांनी १९२० ते २०२० पर्यंत गाजलेले भारतीय खलनायकांचे विश्व, त्यांच्या भूमिकेचे असंख्य पदर उलगडून दाखवले आहेत. या पुस्तकातील खलनायक, त्या-त्या कालखंडातील परिस्थिती आणि खलनायकांचे बदलते भावविश्‍व यावर बालाजी विट्टल यांची ही विशेष मुलाखत...

‘जो डर गया, समझो मर गया!’ (गब्बर सिंह), ‘सारा शहर मुझे लॉयन के नाम से जानता है...’ (अजित), ‘मोगँबो खूष हुआ!’ (अमरिश पुरी), ‘प्रेम नाम है मेरा...’ (प्रेम चोप्रा) हे बॉलीवूड सिनेमातील गाजलेले, पॉवरफूल खलनायक आणि त्यांचे डायलॉग.

असंख्य हिंदी चित्रपटांत नायकापेक्षा खलनायकाच्या भूमिका प्रेक्षकांच्या अधिक लक्षात राहिल्यात. हिंदी सिनेमा अजूनही नायकाच्या अवतीभवती फिरतो, खलनायक कितीही शक्तिशाली, स्मार्ट असला तरी सिनेमाच्या शेवटी नायक जिंकत असतो. सिनेमातील खलनायकामुळेच नायकाचे महत्त्व अधोरेखित होते. मात्र खलनायक नसेल तर हिरोचे अस्तित्व काय आहे? ‘शक्ती’ चित्रपटात पोलिस उपायुक्त अश्‍विनी कुमार (दिलीप कुमार), स्मगलर जे. के. वर्मा (अमरीश पुरी)ला म्हणतो ‘‘आप जैसे शरीफ लोगो के वजह से ही हम पोलिसवाले का काम चलता है! अगर आप लोग ना हो, हमारा यह डिपार्टमेंट बंद हो जाये!’’ या डायलॉगप्रमाणे खलनायक जेवढा बदमाश, क्रूर तेवढाच नायक पडद्यावर सज्जन, चांगला दिसतो.

‘प्युअर इव्हिल’मध्ये संशोधन करून, विचारपूर्वक विविध कालखंडातील अजरामर झालेल्या खलनायकांच्या भूमिका निवडल्या आहेत. यामध्ये डॉ. डँग (कर्मा), तेजा (जंजीर), मोगँबो (मिस्टर इंडिया), शाकाल (यादों की बारात), टोपीवाला (मेरी आवाज सुनो), लॉयन (कालीचरण), गब्बर (शोले), सुप्रीमो (परवरीश), बख्तावर (हम), छप्पन टिकली (सर), पॉपी सिंग (काला सोना), माखन सेठ (कयामत), कांचाचीना (अग्निपथ), हरे रामा हरे कृष्णा (ड्रोना), शेरा डाकू, राघवन (अक्स), सुखीलाला (मदर इंडिया), सर जुडास (कर्ज) अशा व्यक्तिरेखेचे, त्यावर सामाजिक परिस्थितीचे पडलेलं प्रतिबिंब, सखोल पण मनोरंजक विश्लेषणाबद्दल जाणून घेऊ बालाजी विट्टल यांच्याकडून...

बालाजी विट्टल हे सिनेमावर लिहिणारे नामवंत लेखक आहेत. आर. डी. बर्मन; द मॅन, द म्युझिक या पुस्तकांचे ते सहलेखक, सिनेमावरचं सर्वोत्कृष्ट पुस्तक हा राष्ट्रीय पुरस्कार या पुस्तकाने पटकावला. ‘गाता रहे मेरा दिल : ५० क्लासिक हिंदी फिल्म सॉंग’, ‘एसडी बर्मन : द प्रिंस-म्युझिशीयन’ ही त्यांची गाजलेली पुस्तके आहेत.

पुस्तकाचा प्रवास

बालाजी विट्टल : मानवी स्वभावाप्रमाणे वाईट गोष्टीकडे आपले लक्ष चटकन वेधलं जातं. चांगल्या माणसाला चौकटीत राहून काम करावे लागते, मात्र खलनायकांना असल्या चौकटी नसतात. त्यामुळे खलनायकासारखी चौकट नसावी अशा भावना सर्वांच्या मनात कुठे ना कुठे असते. २०११ मध्ये हार्पर कोलीन या प्रकाशन संस्थेकडून मला हे पुस्तक लिहिण्याची ऑफर मिळाली. आयडिया आवडली. प्रत्यक्ष कामाला २०१५ पासून सुरुवात केली. या कालावधीत बॅकग्राउंडमध्ये काम सुरू होतं. या सर्व कालखंडातील खलनायकांना घेऊन एक चांगली कथा विणण्याचे आव्हान होतं. सर्व खलनायकांच्या भूमिका, जॉनर्स, वेगवेगळा कालखंड, हा खूप मोठा पसारा. एका शतकातील गाजलेल्या खलनायकांच्या भूमिकेचे डॉट्स कनेक्ट करायचे होते. त्यामुळे पुस्तक लिखाणाला सात वर्षे लागली.

‘प्युअर इव्हिल’ का?

‘प्युअर इव्हिल’ या पुस्तकातील खलनायक हे काही छोटे-मोठे गुन्हेगार नाहीत. त्यांचे गुन्हे हे जन्मठेप किंवा फाशी होण्याच्या लायकीचे आहेत. बॉलीवूडमध्ये असंख्य छोटे-मोठे खलनायक होते. मात्र त्यातील केवळ भयंकर खलनायक, असे जे १०० टक्के वाईट आहेत. उदाहरणार्थ गब्बर सिंग हा प्युअर इव्हिल आहे, गब्बरमध्ये एकही चांगला गुण दाखवा, आयुष्यात त्याने एकही चांगले काम केलेले नसते. ‘मोगँबो’ हा वेश्याव्यवसाय सोडून जगातील सर्व वाईट धंदे करतो. हे सर्व अस्सल खलनायक आहेत. त्यामुळे या पुस्तकाला ‘प्युअर इव्हिल’ असं नावं दिलं.

मोठा कॅनवास

एक शतकाचा कॅनवास ३०० पानांमध्ये रेखाटणे हे एक मोठं आव्हानं होतं. त्यासाठी असंख्य चित्रपट पाहिले. एक्सेल शिटमध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीतील सिनेमांची यादी तयार केली. त्यासाठी मुंबईत जाणे-येणे करून जवळपास ५० मुलाखती घेतल्या. सिनेमाबद्दलचे जुने साहित्य, मुलाखती, पुस्तकं वाचून काढलीत.

ब्रिटिश, चिनी, डाकू ते सावकार

बॉलीवूडमध्ये कालखंडानुसार खलनायकाचे रोल बदलले. तत्कालीन आर्थिक, सामाजिक बदलानुसार खलनायकाचे पात्र आले. १९२० ते १९४७ या कालखंडात ब्रिटिश सत्ता असल्यामुळे चित्रपटात अभावाने ब्रिटिश खलनायक असायचे. कारण सेन्सॉर बोर्ड परवानगी देत नसत. स्वातंत्र्यानंतर आलेल्या चित्रपटांत मुख्यत: ब्रिटिश, पोर्तुगीज खलनायक असायचे. १९६२ ला भारत-चीन युद्ध झाल्यानंतर पहिल्यांदा चिनी व्हिलन पडद्यावर आलेत. या काळातील खलनायक अन्नधान्याचा काळाबाजार, शेतकऱ्यांच्या जमिनी, घरे हडपणारे सावकार असायचे. १९६० मध्ये आचार्य विनोबा भावे यांनी चंबलच्या डाकूंना शरण येण्याचे आवाहन केले, त्यानंतर मोठ्या प्रमाणात डाकू, दरोडेखोरांवर आधारित भूमिका आल्या.

स्मगलर्स -आयएसआय

७० च्या दशकापूर्वी चित्रपटात अभावाने स्मगलर्स दिसायचे. १९७० च्या आसपास हॉलीवूडमध्ये काऊबॉय हिरोची चलती होती, त्या धर्तीवर खोटे सिक्के, शोले असे सिनेमे आलेत. १९७१ नंतर बांगलादेश युद्धानंतर बहुतांश सिनेमांमध्ये पाकिस्तान लष्कर मुख्य व्हिलनच्या भूमिकेत गेलं. त्यानंतर युद्ध झालं नाही, मग चित्रपटात सीमेपलीकडून घुसखोरी, दहशतवादी हल्ले करणारे आयएसआय लष्कर-ए-तोयबा हे मुख्य खलनायक झाले.

पोलिस, माफिया, भ्रष्ट नेते

काही अपवाद वगळले तर १९८० पूर्वी सिनेमात एकही भ्रष्ट पोलिसवाला नसायचा. १९८० नंतर पोलिस म्हणजे बदमाश असं सूत्र झालं. ‘अंधा कानून’, ‘हम’ या सिनेमांत पोलिस आणि माफिया अशी युती दाखवली. यापूर्वी चित्रपटांत राजकारणी आदर्श असायचे. (बहारो के सपने, आंधी) १९८० मध्ये ‘किस्सा कुर्सी का’पासून अशा चित्रपटांची लाट आली, ज्यात राजकारण्यांना खलनायक, गुन्हेगार दाखवले गेले. ते समांतर माफियाराज चालवतात. अलिकडे आलेला ‘उडता पंजाब’मध्ये खासदार हा ड्रग्जचा सर्वात मोठा तस्कर असतो. खलनायकाच्या भूमिकेत झालेले बदल समजायला, त्या पात्रांचा मागोवा घ्यायला खूप वाचन करावे लागले, मात्र प्रवास मनोरंजक होता.

मुंबईतील गँगस्टर

१९८० पर्यंत ‘बैठीये मोहतरमा’ असं एकदम पॉलीश आणि अदबीने बोलणारा अजितसारखा खलनायक चित्रपटातून गायब झाला. १९८०-९० मध्ये मुंबईत अंडरवर्ल्ड, माफियाराज पसरले. मुंबईच्या रस्त्यांवर गँगस्टर धुमाकूळ घालत होते. अगदी जे जे रुग्णालयात घुसून गुंड गोळ्या घालत होते. गुलशन कुमारचा भरदिवसा खून झाला. या सर्वांचे प्रतिबिंब सिनेमावर पडले. त्या पद्धतीच्या भूमिका येत गेल्या. यामधील खलनायक दक्षिण भारतीय किंवा मराठी नावाचे होते. ‘अर्धसत्य’मधील रामा शेट्टी (सदाशीव अमरापूरकर), ‘परिंदा’मधील अन्ना (नाना पाटेकर), ‘सत्या’मधला भिकू म्हात्रे (मनोज वाजपेयी), ‘वास्तव’मधील रघू (संजय दत्त). शेवटी गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी मुबई पोलिसांना मोकळीक दिली गेली. असं म्हणतात की, त्यावेळी स्क्रिप्ट लिहिण्यासाठी फार कष्ट घेण्याची गरज नव्हती. दररोज शूटआऊट होत असायचं. वर्तमानपत्र हातात घ्या, तुमची पटकथा तयार.

खलनायकाला बरोबरीची संधी

सिनेमातील हिरोच्या भूमिकेत व्यापक बदल होऊ लागला. आताचा हिरो पहिल्याप्रमाणे ‘श्रीराम’सारखा नाही; तर खलनायक खलनायकासारखा राहिला नाही. हिरोचा चांगुलपणा उठून दिसण्यासाठी खलनायकाला पडलेला दाखवणाऱ्या स्क्रिप्ट लिहिल्या जायच्या. मात्र २००० नंतर यामध्ये बदल झाले. हृतिक रोशन, आमीर खान, जॉन अब्राहमसारखे स्मार्ट खलनायक आलेत. त्यांच्यामध्ये हिरोएवढीच योग्यता आहे. हिरो व्हिलनमध्ये आता बरोबरीचे युद्ध होते. त्यातून निकाल लागतो. यापूर्वी प्रेम चोप्रा-धर्मेंद्र असलेल्या चित्रपटांत काहीही झाले तरी धर्मेंद्र जिंकणार, हे ठरलेलं असायचं. ‘पडोसन’ या सिनेमात मेहमूदने मास्टरजी भूमिका केली, तो प्रशिक्षित क्लासीकल डान्सर असतो. कुठल्याही अर्थाने किशोर कुमारपेक्षा कमी नसतो. मात्र पटकथेत भोले (सुनील दत्त)ला जिंकणार हे ठरलं होतं. ‘धूम ३’मध्ये आमीर खान जिंकतो. हा मोठा बदल आहे, कथानक नायकधार्जीणं नाही. स्पर्धा बरोबरीची आहे.

शाहरूख आणि बाजीगर

अमिताभ बच्चन सोडला तर पूर्वी हिरो खलनायकाच्या भूमिका स्वीकारत नसायचे. प्रतिमेवर परिणाम पडेल अशी त्यांना भीती वाटायची. मग ब्लॅक रोल कोण करणार? अमोल पालेकरसारख्या अभिनेत्याने, राजेश खन्ना (रेड रोज) यांनी काही भूमिका निभावल्या. मात्र ‘बाजीगर’नंतर खलनायक हा सिनेमाची मुख्य व्यक्तिरेखा असू शकते, इमेजवर त्याचा काही फरक पडत नाही हा मोठा संदेश गेला. त्यानंतर नायकाचा आत्मविश्वास वाढला. म्हणून शाहरूखनने ‘बाजीगर’मध्ये साकारलेली भूमिका ही प्रवाह बदलवणारी ठरली. संजय दत्तने ‘वास्तव’मध्ये अशी भूमिका केली, ‘गुप्त’मध्ये काजोलने नकारात्मक भूमिका साकारली. या बदलाचे श्रेय शाहरूख खानला द्यायला पाहिजे.

मोगँबो, डॉ. डॅंग

मोगँबो हा परदेशी खलनायक होता. यापूर्वी हे रोल परदेशी अभिनेते करायचे. मात्र या भूमिका प्रेक्षकांच्या नजरेत तेवढ्या ठसल्या नाही. मोगँबो बघा, ‘मिस्टर इंडिया’ सिनेमा आठवला तर तुमच्या डोक्यात पहिले मोगँबोचा चेहरा येईल, अनिल कपूर नंतर. त्याच पद्धतीने ‘कर्मा’मधील मायकेल डँग. त्यापूर्वी १९७७ मध्ये आलेल्या ‘शतरंज के खिलाडी’मध्ये जनरल ओट्राम या इंग्लीश अधिकाऱ्याची भूमिका सर रिचर्ड एटनबेरो यांनी साकारली. त्या रोलमध्ये वेगवेगळे आयाम आहेत. बुद्धिबळ खेळाच्या माध्यमातून त्याला नवाबला अवधमधून बाहेर पळवून लावायचे आहे. मात्र त्याला हे चुकीचे आहे याची जाणीव आहे. ते बोलून दाखवतो.

‘कर्मा’तील अनुपम खेर यांनी साकारलेला डॉ. मायकेल डँग आजही लक्षात राहतो. आता लम्हा, नाम शबाना, बेबी या सिनेमांत मुख्य खलनायक आयएसआय, लष्कर-ए-तोयबा आहे. मात्र खलनायक म्हणून ते लक्षात राहत नाहीत. ९० च्या दशकापूर्वीचे खलनायक आठवतात; मात्र २००० नंतरचे खलनायक आठवणीतून गायब झालेत.

‘कर्ज’मधील कामिनी

अनेक चित्रपटांत महिला खलनायिका आहेत. ललिता पवारपासून ते बिंदूपर्यंत. मात्र सिमी ग्रेवालची भूमिका हटके होती आणि तिने या भूमिकेत प्राण ओतले. अंत्यत सूक्ष्म पद्धतीने ती आपल्या पतीच्या खुनाचा कट आखते. म्हणजे लग्न करणार आणि लग्नाच्या पहिल्याच रात्री पतीला मारून टाकणार. सुभाष घई यांनी सिमी ग्रेवालला केवळ ड्रिंक तयार करणे आणि डान्स करण्यापुरते मर्यादित ठेवले नाही. कामिनी जरी प्रेमनाथने वापरलेली महिला असेल तरी घई यांनी या भूमिकेला त्यांनी स्वतंत्र अस्तित्व दिलं. त्यामुळे ही भूमिका जबरदस्त गाजली. एवढी थंड डोक्याने आपले काम करणारी महिला असू शकते, हे सिमीने या भूमिकेच्या माध्यमातून दाखवून दिलं.

व्हिलन फूट सोल्डर

बॉलीवूडमध्ये मुख्य खलनायकाच्या व्यतिरिक्त उपमुख्य खलनायकांची एक मोठी फौज होती. मोहन शेट्टी, मॅकमोहन, युसूफ खान, डॅन धनोआ, भारत गोपी, अन्वर हुसेन, सुधीर भगवान आणि सलीम घाऊस अशी मोठी नावं आहेत. मात्र त्यांचे काम हे मुख्यतः बॉसने सांगितलेले काम यस बॉस, ओके बॉस म्हणत करणे एवढी असतात. ‘दिवार’मधील विजय सर्व वाईट धंदे करतो, मात्र त्यात शेट्टी हा फूट सोल्जर असतो. त्याचे काम हिरोकडून मार खाणे. शेट्टीला मारताना प्रेक्षक टाळ्यांचा कडकडाट करतात. ‘शोले’मधील सांभा म्हणजे मॅकमोहनचे दोन डॉयलॉग होते. मात्र एवढ्या वर्षानंतर ते लक्षात राहतात. मला दु:ख वाटते हे सर्व लोक छोटे मोठे रोल करून निघून गेले. त्यांच्या वाट्याला मोठ्या डॉनच्या भूमिका आल्या नाहीत. फिल्मच्या रोलप्रमाणे जीवनातही तसेच रोल होते. मात्र तरीही त्यांचे महत्त्व नाकारू शकत नाही.

बुरे काम का नतिजा बुरा

फिल्मकार, लेखक भूमिका लिहितो, तो पात्रासोबत उठतो, बसतो. त्यामुळे त्याचे या भूमिकांसोबत एक वेगळं भावनिक नातं तयार होतं. अनेक वर्षांपासून पुस्तकावर काम करत असल्यामुळे मलाही वाटतंय या खलनायकाची काहीतरी मजबुरी असेल. मात्र त्यांच्याबद्दल सहानुभूती वाटणे चुकीचे आहे. शेवटी हे पुस्तक मुलं वाचणार आहेत. या पात्रांना ग्लोरीफाय केलंय असं त्यांना वाटायला नको. शेवटी बुरे काम का नतीजा बुरा होता है. त्यामुळे मी ते टाळलं. तुरुंगात गेल्यावर काही कैदी चांगले वाटू शकतात, मात्र तुरुंगाबाहेर पडल्यावर आपण त्यांना सोडून द्यायला पाहिजे असं म्हणत नाही. शेवटी ते काहीतरी वाईट केल्यामुळे तुरुंगात आलेत.

पडद्यावरचे व्हिलन, ऑफस्क्रीन जंटलमेन

सिनेमात क्रूर दिसणारे खलनायक वास्तविक आयुष्यात खूप जंटलमेन आहेत. सिरीयल रेपर म्हणून प्रसिद्ध असणारा रंजित अत्यंत साधा माणूस आहे. रंजितने कित्येक बलात्काराचे सिन केलेत. मात्र आजपर्यंत एकाही नायिकेने त्यांच्याविरुद्ध तक्रार केली नाही. एकदा शुटिंगदरम्यान एका हिरोईनचे कपडे फाटले, रंजितने लागलीच लाईट बंद करायला सांगितले, ब्लँकेट आणून नायिकेला दिले. रंजित, अमरिश पुरी, प्रेम चोप्रा यांच्याबद्दल आजपर्यंत एकही तक्रार किंवा गॉसिप आले नाही. के. के. मेमन, यशपाल शर्मा हे कमालीचे सज्जन व्यक्ती म्हणून प्रसिद्ध आहेत. महत्त्वाचे म्हणजे हिरो, त्यांची मुलं वादात अडकले; मात्र एकाही खलनायकाचा मुलगा वादात सापडला नाही. ते भूमिकेत शिरतात, एकजीव होतात, म्हणून ते अभिनेता म्हणून यशस्वी आहेत.

पडद्यामागचे किस्से

या पुस्तकात खलनायकासोबत, पडद्यामागचे अनेक मनोरंजक किस्से उलगडून दाखवलेत.

1अनुपम खेर यांनी मोगँबोच्या भूमिकेसाठी ४० टक्के शुटिंग पूर्ण केलं. मात्र त्यानंतर अमरिश पुरींना त्यांच्या जागी घेण्यात आलं.

2‘लगान’मधील कॅप्टन रसेलची भूमिका पॉल ब्लॅकथोर्नला हिंदी येत नव्हती. इंग्लीशमेन असून त्याला क्रिकेट खेळता येत नव्हते. गब्बरचे सर्व साहित्य मुंबईच्या चोर बाजारमधून आले.

3लगे रहो मुन्ना भाईमधील भूमिका समजून घेण्यासाठी बोमन इराणी लॅमींग्टन रोडवरील एका गॅरेजमध्ये दिवसभर बसले होते.

4‘कर्ज’मधील कामिनीच्या रोलसाठी सुभाष घई १८ महिने सिमी ग्रेवालच्या मागावर होते.

5रजनीगंधा, छोटीसी बात, चितचोर असे तिने सलग हिट चित्रपट देणाऱ्या कॉमन माणसाचा हिरो अमोल पालेकर याने अचानक भूमिका या चित्रपटात केशव दळवी नावाची एक निगेटिव्ह भूमिका साकारली.

vinod.raut@esakal.com

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com