‘वेब सीरिज’साठीही कोल्हापूरचीच भुरळ !

कोल्हापूर ः येथील एका जुन्या इमारतीत चित्रीकरणासाठी साकारलेले सरकारी कार्यालय.
कोल्हापूर ः येथील एका जुन्या इमारतीत चित्रीकरणासाठी साकारलेले सरकारी कार्यालय.

कोल्हापूर - मनोरंजन क्षेत्रातील सर्वांत ॲडव्हान्स प्लॅटफॉर्म समजल्या जाणाऱ्या वेब सीरिज्‌च्या दुनियेलाही आता येथील लोकेशन्सची भुरळ पडली आहे. एका बिगबजेट सीरिज्‌च्या शूटिंगला येथे नुकताच प्रारंभ झाला असून, किमान वीस दिवस येथील विविध लोकेशन्सवर शूटिंग चालणार आहे. त्याशिवाय येत्या महिन्याभरात आणखी दोन हिंदी बिगबजेट सीरिजच्या शूटिंगला येथे प्रारंभ होणार आहे. 

येथील चित्रनगरीत सध्या फारसे शूटिंग नसले तरी दोन टीव्ही मालिकांचे शूटिंग शहर परिसरातील दोन गावांत सुरू आहे. या ठिकाणी शंभरहून अधिक स्थानिक कलाकार व तंत्रज्ञांनाना रोजगार मिळाला आहे. एका मराठी चित्रपटाचे शूटिंगही नुकतेच पूर्ण झाले. वेब सिरीज्‌च्या माध्यमातून आणखी किमान पन्नास जणांना रोजगार उपलब्ध झाला आहे. सुहास शिरवळकरांच्या ‘समांतर’ या कादंबरीवर ही सिरीज्‌ होणार असून अभिनेता स्वप्नील जोशी, तेजस्विनी पंडित, अजिंक्‍य देव आदी तगडी स्टारकास्ट त्यात असेल. त्याशिवाय स्थानिक कलाकारांनाही संधी दिली जाणार आहे. 

वर्षभरात हजारो भारतीयांनी टीव्ही सोडून डिजिटल प्लॅटफॉर्मला पसंती दिली आहे. तरुणाई मोठ्या संख्येने डिजिटलशी जोडली गेली असल्याने ‘वेब सीरिज’ या माध्यमाकडे जगभरातील प्रेक्षकांबरोबरच बहुतांश सेलीब्रिटींचाही वाढता कल आहे. या पार्श्‍वभूमीवर येथील काही तरुणांनी वेब सीरिजच्या माध्यमातून काही कलाकृतींवर भरही दिला आहे. मात्र, आता बिगबजेट बॅनर शूटिंगसाठी येथे येऊ लागल्याने एकूणच चित्रपट व्यवसायाला चालना मिळणार आहे. 

मोबाईलवरील मनोरंजनावर येत्या काळातही अधिक भर असणार आहे. या पार्श्‍वभूमीवर डिजिटल प्लॅटफॉर्मला अधिक पसंती मिळणार आहे. त्यामुळेच आता चित्रपट, मालिकांसह या माध्यमातील शूटिंग येथे अधिक कशा होतील, त्यादृष्टीने येथील लोकेशन्सचे मार्केटिंग करणार असल्याचे मिलिंद अष्टेकर, सर्जेराव पाटील यांनी सांगितले.

शूटिंगसाठी अनुभवी तंत्रज्ञ आणि कलाकार म्हंटलं, की सर्वांत पहिलं नाव पुढे येते, ते कोल्हापूर. आजवर अनेक प्रोजेक्‍ट येथे केले. वेब सिरीज्‌साठीही अर्थातच कोल्हापूरला पहिली पसंती होती. सध्या सुरू असलेल्या शूटिंगचे चाळीस दिवसांचे शेड्यूल असून त्यापैकी निम्म्याहून अधिक शूटिंग येथील लोकेशन्सवर केले जाणार आहे. 
- सतीश राजवाडे,
दिग्दर्शक

कोल्हापूर आवडतं ठिकाण. त्यामुळं येथे शूटिंग म्हटलं, की एक वेगळाच अनुभव असतो. गाव आणि शहराची संस्कृती एकाच ठिकाणी येथे अनुभवायला मिळते. येथील विविध लोकेशन्स असो किंवा एकूणच वातावरण, सिनेनिर्मितीसाठी खूप पोषक आहे. त्यामुळे अधिकाधिक निर्मात्यांनी कोल्हापूरला शूटिंगसाठी पसंती दिली पाहिजे.
- स्वप्नील जोशी,
 अभिनेता

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com