'ए दिल है मुश्‍किल'ला विरोध नको: नाडियादवाला

पीटीआय
शनिवार, 15 ऑक्टोबर 2016

मुंबई: 'पाकिस्तानी कलाकारांचा सहभाग असलेले भारतीय चित्रपट प्रदर्शित न करण्याची थिएटर चालकांची भूमिका दुर्दैवी आहे. या निर्णयाचा फेरविचार करण्याची विनंती त्यांना करू,' अशी प्रतिक्रिया निर्माते साजिद नाडियादवाला यांनी आज (शनिवार) व्यक्त केली. उरीमधील दहशतवादी हल्ल्यानंतर गेले काही दिवस भारतामध्ये काम करणाऱ्या पाकिस्तानी कलाकारांविरोधातील वातावरण तापले आहे.

निर्माते-दिग्दर्शक करण जोहर यांच्या आगामी 'ए दिल है मुश्‍किल' या चित्रपटामध्ये फवाद खान या पाकिस्तानी अभिनेत्याने काम केले आहे. यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसह काही थिएटर मालकांनीही या चित्रपटाचे प्रदर्शन होऊ देणार नसल्याची भूमिका घेतली होती. तसेच, 'पाकिस्तानी कलाकारांचा सहभाग असलेले चित्रपट महाराष्ट्र, गुजरात, गोवा आणि कर्नाटकमध्ये प्रदर्शित करणार नाही,' असा निर्णय 'सिनेमा ओनर्स एक्‍झिबिटर्स असोसिएशन ऑफ इंडिया' या संघटनेने काल (शुक्रवार) जाहीर केला होता. यामुळे 'ए दिल है मुश्‍किल'च्या प्रदर्शनावर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.

यासंदर्भात साजिद नाडियादवाला म्हणाले, "करण जोहर यांच्या या चित्रपटाचे चित्रिकरण दोन वर्षांपूर्वी सुरू झाले होते. त्यावेळी पाकिस्तानी कलाकारांविषयी अशी भावना नव्हती. करण जोहर हे भारतीय आहेत. त्यांच्या चित्रपटांमध्ये काम करणारे इतर कलाकारही भारतीय आहेत. त्यामुळे त्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी आम्ही प्रत्येकाकडे जाऊन विनंती करू.''

विशेष म्हणजे, भारतीय जनता पक्षाचे खासदार आणि ज्येष्ठ अभिनेते परेश रावळ यांनीही करण जोहर यांची बाजू उचलून धरली आहे. परेश रावळ यांनी ट्‌विटरवरून आपले मत व्यक्त केले आहे. 'पाकिस्तानमधील कलाकार इथे आले, पैसे कमावले आणि सुरक्षितरित्या मायदेशी परतलेही. इथे आपण आपल्याच लोकांना त्यांनी न केलेल्या चुकीची शिक्षा देत आहोत. पाकिस्तानी कलाकारांना चित्रपटासाठी करारबद्ध केले तेव्हाचे वातावरण, परिस्थिती वेगळी होती. त्यामुळे आता या निर्मात्यांना दोष देणे योग्य नाही,' असे मत परेश रावळ यांनी मांडले आहे.

Web Title: Will request Theater association for Aye Dil Hai Mushkil, says Sajid Nadiadwala